- धनाजी कांबळेजातिअंताचा लढा आजही ज्या ताकदीने उभा राहायला हवा होता, तसा तो उभा राहिलेला नाही. जात, वर्ग, स्त्रीदास्य यांबरोबरच लिंगभावावर आधारित शोषण संपविले पाहिजे. त्यासाठी स्त्रीमुक्तीची जनचळवळ उभी राहायला हवी, असा सूर पुण्यात नुकत्याच झालेल्या महिलांच्या ‘साहित्य संवाद’मध्ये उमटला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने ‘स्त्रीवादी संभाषिते : सिद्धांत, आंदोलने आणि संस्कृती’ या विषयावर मंथन झाले. राज्यातील महिला कार्यकर्त्या, विचारवंत, लेखक यांच्यासह देशपातळीवर काम करणाऱ्या बुद्धिजीवी आणि प्रत्यक्ष जनतेमध्ये काम करणारे लोक यात सहभागी झाले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रवाहात स्त्रीवादी सिद्धांत, स्त्रीवादी आंदोलने आणि स्त्रीवादी सांस्कृतिक अभिव्यक्ती याबाबत विस्तृत चर्चा झाली. विद्यापीठीय चर्चासत्रांमधून पथदर्शी कार्यक्रम तयार होतो. प्रत्यक्षात सिद्धांत व्यवहारात आणताना कोणत्या समस्या, प्रश्न उभे ठाकतील, त्यातील आव्हानांना कशाप्रकारे तोंड देता येईल, हे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्या अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. आज देशात आणि राज्यातही कोणत्याही संघर्षात स्त्रीला पुढे करून पुरुषार्थ गाजवण्याला जनमान्यता मिळाल्यासारखं वातावरण आहे. यात स्त्रियांचं व्यक्त होणं, न पटलेल्या विचाराला प्रत्युत्तर देणं हे व्यवहार्य आहे का, परंपरेला धरून आहे का, असे विचारणारी पुरुषी मानसिकता आजही आघाडीवर दिसते. त्यामुळेच आज संकुचित झालेल्या स्त्रीवादी चळवळींना उभारी येण्यासाठी सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर मांडणी होण्याची आवश्यकता आहे. सांगली-सातारा जिल्ह्यात क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर यांनी केलेले काम असेल, किंवा अहमदनगर जिल्ह्यात निशा शिऊरकर यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. त्यांच्या कामांचा अभ्यास करून नव्या पद्धतीची व्यापक स्त्रीवादी चळवळ संघटित आणि विस्तारित करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यायला हवा.
स्त्रीमुक्तीच्या चळवळीसाठी आधुनिक मुली तटून उभ्या राहतील का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 06:35 IST