will digambar kamat give a new life to goa congress | दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

-राजू नायक 

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची गोव्याचे विरोधी पक्षनेते म्हणून झालेली निवड काँग्रेस पक्षासाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे. पुढच्या दोन वर्षात गोव्यात निवडणुका व्हायच्या आहेत. राजकीय निरीक्षक, सध्याची गोव्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्या वर्षभरात होतील, असे सांगू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या जहाजातून १० आमदारांनी सत्ताधारी बाजूने उड्या टाकल्यानंतर या पक्षाच्या अस्तित्वाबद्दल तीव्र शंका व्यक्त केल्या जात आहेत. या परिस्थितीत कामत पक्षाला नवे वळण कसे देतात याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 

सध्याच्या काँग्रेस पक्षात तसे मूळ काँग्रेसमन कोणी सापडणार नाहीत. स्वत: कामत भाजपातून तर प्रतापसिंग राणे, रवी नाईक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आले. परंतु भाजपातून फुटताच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कामत यांना कधी माफ केले नाही. त्यांच्या विरोधात चौकशांचा ससेमिरा लावला. कामत यांना अटक करण्यासाठी जंग जंग पछाडले. वस्तुत: पर्रीकर यांनी केसेस दाखल केलेले, चौकशा चालवलेले, गुन्हे दाखल केलेले व अटकही झालेले अनेक काँग्रेसजन सध्या भाजपात आहेत आणि महत्त्वाची मंत्रीपदेही भूषवताहेत. परंतु हे घडतेय पर्रीकरांच्या पश्चात. राज्यात भाजपाने पर्रीकरांचा संपूर्ण वारसा टाकून देण्याचा प्रयत्न चालविल्याची टीका होते. परंतु तसे असले तरी नूतन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारला आश्वासक चेहरा दिला आहे. चालू विधानसभा अधिवेशनातही ते अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून वाखाणले गेले. या परिस्थितीत सरकारला विधायक विरोध करतानाच काँग्रेस पक्षाची गेलेली पत पुन्हा निर्माण करणे  व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावणे ही कामे कामत यांना अनुक्रमे करावी लागणार आहेत. 

कामत यांचे वैशिष्ट्य असे की ते कार्यकर्त्यांना, नेत्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतात. ते नेमस्त आणि मनमिळावू आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण पाच वर्षे आश्वासक चेहरा दिला व या काळात काँग्रेस कार्यकर्ते खुश होते. गोव्यातील काँग्रेस पक्षाचे दुर्दैव असे की जे नेते निर्माण झाले त्यांनी आपल्यापुरते पाहिले व या पक्षाला संघटनात्मक बळ कधी लाभू दिले नाही. भाजपाचे तसे नाही. सरकार त्या पक्षाचे असतानाही, त्यांनी संघटनात्मक कामाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. सध्या भाजपाच्या संघटनात्मक कामाची धुरा पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड चालवतात. पर्रीकरांच्या काळात एका बाजूला सरकार चालविताना त्यांचा स्वत:चा संघटनेवरही वरचष्मा असे. पर्रीकरांच्या शेवटच्या काळात, भाजपाचे संघटनेकडे दुर्लक्ष झाले असे या पक्षाची कोअर समितीही मान्य करते. त्या दृष्टीने सतीश धोंड यांनी सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम जोरदारपणे हाती घेतले असून पक्षाच्या अडगळीत टाकलेल्या अनेक नेत्यांना पुन्हा संघटनात्मक कामास जुंपून घेतले जात आहे. 

हीच कार्यपद्धत कामत यांना सुरू करावी लागेल. ते भाजपातून आल्याने त्यांना संघटनात्मक कामाचाही अनुभव आहे. त्यांनी विधानसभेत इतर विरोधी पक्षांशी समन्वयाने कार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु विविध मतदारसंघांतील संघटनात्मक बळ व कमजोरी हेरून नवे नेते तयार करणे व विधिमंडळ तसेच संघटना यातील समन्वय वाढविणे व हा पक्ष आक्रमक बनवणे, रस्त्यावर उतरून व विविध आंदोलनांमधील ताकद वाढवणे ही कामे त्यांना करावी लागणार आहेत. पक्ष सोडून गेलेल्या काही तडफदार व प्रामाणिक नेत्यांनाही त्यांना परत आणावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्ष विधानसभेत केवळ पाच सदस्यांचा असून तो विलक्षण कमकुवत बनला आहे. बहुसंख्य ख्रिस्ती आमदार सत्तास्थाने मिळवण्यासाठी भाजपात गेले आहेत. त्यांच्या विरोधातील लोकांच्या असंतोषाला आकार देणेही भाग आहे. केवळ काँग्रेस पक्षाला ताकदवान बनविण्यासाठी हे द्वंद्व महत्त्वाचे नसून लोकशाहीच्या बळकटीसाठीही आवश्यक आहे. लोकांचा राग पाहता ते अशा लढवय्या काँग्रेसला निश्चितच पाठिंबा देतील. परंतु त्यांचे प्रश्न मांडणे आणि सरकारला नामोहरम करण्याची एकही संधी न दवडणे ही कामे कामत यांना करावी लागतील. लोकांचा राग पाहता येत्या वर्षभरात निवडणुका झाल्यास त्यांना सामोरे जाणे भाजपाला निश्चितपणे कठीण असणार आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)
 

Web Title: will digambar kamat give a new life to goa congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.