२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:14 IST2025-07-16T07:11:41+5:302025-07-16T07:14:17+5:30
छोट्या पडद्यावरून ‘मोठ्या’ झालेल्या स्मृती इराणी यांना निर्मम राजकारणाने विजयाबरोबरच पराभवाचीही मात्रा दिली. त्या आता ‘तुलसी’ म्हणून परतत आहेत.

२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
या देशाच्या सार्वजनिक जीवनाच्या अवाढव्य रिंगणात, पन्नाशीच्या उंबरठ्यावरील स्मृती इराणी यांच्याइतकी कडवी झुंज देत, यशाचे इतके उंच शिखर आणि अपयशाची इतकी खोल दरी क्वचितच कुणी गाठली असेल. आणि तरीही इतक्या सहजतेने आणि दिमाखाने ‘पुनश्च हरी ओम’ म्हणण्याची धमक, धडाडी आणि चलाखीही क्वचितच कुणापाशी असेल.
‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा २९ जुलैपासून होणारा नवारंभ हा स्मृती इराणी यांच्या पुनर्जन्माचा पुकारा आहे. राजकारणातील पुनरागमने ही प्रतीकात्मकतेत लपेटलेली, सूचितार्थाने भारलेली आणि प्रतिसादाच्या अपेक्षेने रचलेली असतात. इराणींचे हे तुलसीरूप पुनरुज्जीवन हा काही स्मरणरंजनाचा खेळ नाही. एकेकाळी तुलसी ही छोट्या पडद्यावरील संस्कारी सम्राज्ञी होती. आता पुन्हा तुलसी होऊन त्या सामर्थ्य, अस्तित्व आणि व्यक्तित्त्वाचे एक धूर्त पुनर्योजन साकारत आहेत.
दिल्लीतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्मृती इराणींनी सारे काही शून्यातून स्वतः मिळवलेले आहे. मॅकडोनाल्डमध्ये टेबले पुसण्यापासून सुरुवात करून पुढे थेट एकता कपूरच्या सांस्कृतिक महानाट्यातील तुलसी विराणीच्या रूपात त्या प्राइम टाइमवर अधिराज्य गाजवू लागल्या. २००३ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रारंभी साऱ्या देशाने त्यांची खिल्ली उडवली, पण मन घट्ट करून त्या अथकपणे कार्यरत राहिल्या. भारताची ही एकेकाळची लाडकी बहु मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात दणादण धोरणे चालवीत होती.
दूरचित्रवाणीवरील डझनावारी तारे चमकून विझून जात असताना इराणींनी मात्र आपला करिश्मा परिणामकारक बनवला. त्या केवळ टीव्ही सम्राज्ञी न राहता भगव्या पक्षाच्या चिकाटीचे प्रतीक बनल्या. आरंभी भाजपच्या निरीक्षकांनीही मतांच्या हाकाऱ्यांत सामील होणारी आणखी एक तारका म्हणून त्यांना मोडीत काढले होते. पण इराणींनी आपले वक्तृत्व हे आपले शस्त्र बनवले. आपली पहिली निवडणूक हरल्या, पण अनेकांना असंभाव्य वाटलेली गोष्ट त्यांनी २०१९ मध्ये करून दाखवली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत राहुल गांधी यांचा चक्क पराभव केला. एका झटक्यात त्या जायंट किलर ठरल्या.
२०१४ ते २०२४ या काळात त्यांनी शिक्षण, वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक, महिला आणि बालविकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. २०२० चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात त्यांचा सहभाग होता. बालकल्याणविषयक चर्चांना त्यांनी नवा आकार दिला. त्या कृतिशील मंत्री होत्या. पण निर्मम राजकारणाने त्यांना विजयाबरोबरच पराभवाचीही मात्रा चाटवली. २०२४ साली डाव उलटला. गांधी कुटुंबाशी निष्ठावंत असलेल्या किशोरीलाल शर्मा या सौम्य गृहस्थांनी अमेठी परत मिळवली. इराणींचा तब्बल १.६८ लाख मतांनी पराभव झाला. मोदींच्या कॅबिनेटमध्ये काही पराभूत मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळाले, पण उघडपणे जाणवेल, अशा पद्धतीने इराणी बाईंना बाजूला सारण्यात आले.
- तरीही रुसून न बसता त्यांनी नवी ‘कथा’ लिहायला घेतली. ‘तुलसी परत येणार’ ही त्यांची घोषणा म्हणजे पराभूताची मुसमुस नव्हे तर युद्धारंभीची आरोळी होय. या कामाला त्या ‘जोडप्रकल्प’ म्हणतात, पण ते काम २०२९ च्या निवडणुकीपूर्वीच पूर्ण व्हावे, असे नियोजन त्यांनी करून ठेवले आहे. हा योगायोग म्हणावा की विचारपूर्वक केलेली सांस्कृतिक आखणी?
काहीही असो, इराणीबाईंना सार्वत्रिक प्रेमादर मुळीच लाभलेला नाही, हे मात्र खरे. वस्तुतः भाजपला तडफदार स्त्री नेतृत्वाची तीव्र गरज असूनही पक्षाने या सर्वात चमकदार महिलेला बाजूला कशासाठी केले असावे? की ही तात्पुरती विश्रांती आहे? की ‘तुलसी २.०’ हा इराणींना पुन्हा घराघरात आणि मनामनात पोहोचवण्यासाठी सोडलेला एक ट्रोजन हॉर्स आहे? त्यांच्या सांस्कृतिक वापसीची परिणती त्यांच्या राजकीय पुनरुत्थानात होईल काय?
२०२९ उजाडेतो भाजपचे अनेक नेते मावळतीला लागलेले असतील. अशा वेळी पक्षाच्या विचारसरणीशी घट्ट जुळलेले, राहुल गांधींशी पुन्हा एकदा दोन हात करून पुनरागमनाची कथा रचू शकणारे योग्य महिला नेतृत्व स्मृती इराणी यांच्याखेरीज अन्य कुठले असू शकेल? प्रभावी महिला नेत्यांची वानवा असलेल्या या पक्षात स्मृती इराणी या सुषमा स्वराज यांच्या खंबीर वारस बनू शकतील. पण ही गरज पक्षाला बहुदा अजून उमगली नसावी.
स्मृती इराणी केवळ ‘तुलसी’ म्हणून पुन्हा येताहेत इतकेच नव्हे, तर त्या एक प्रदीर्घ खेळी खेळताहेत. नाट्य आणि आठवणी यांच्या तालावर डोलणाऱ्या लोकशाहीत, छोट्या पडद्यावरील दर्शनाची किंमत जाणणाऱ्या सांस्कृतिक गुंतवणूकदाराचे हे हिशेबी गणित आहे. त्या भारताच्या ‘सांस्कृतिक अर्थव्यवस्थे’चा लाभ उठवत आहेत.
आता कॅमेरे फिरू लागतील. ‘क्यूँ की सांस भी कभी बहू थी’ हा आता भावक्षोभक कार्यक्रम उरलेला नाही, ते एक रूपक आहे. तुलसी आता केवळ सून नाही; ती सामाजिक संदेशाचे वहन करावयाचे एक साधन आहे. या मालिकेचे एकूण १५० भाग प्रक्षेपित होतील. पुढची सार्वत्रिक जवळ येताच ती संपेल. याहून अचूक वेळ दुसरी कुठली असेल?