मुलांच्या पाठीवर आठ-दहा किलोचे ओझे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 09:18 AM2022-10-06T09:18:29+5:302022-10-06T09:19:10+5:30

नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी दप्तराचे वजन असायला हवे; पण हा नियम कोणीही पाळताना दिसत नाही. 

why is the burden of 8 10 kg on the back of children | मुलांच्या पाठीवर आठ-दहा किलोचे ओझे कशासाठी?

मुलांच्या पाठीवर आठ-दहा किलोचे ओझे कशासाठी?

googlenewsNext

- टिळक उमाजी खाडे, माध्यमिक  शिक्षक, नागोठणे (जि. रायगड) 

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची अधूनमधून चर्चा होत असते. न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.  शासनानेही यासंदर्भात काही उपाययोजना जाहीर केल्या. काही शाळांनीही यासंदर्भात काही प्रयोग केले;  पण अजून तरी म्हणावे तसे यश आले नाही. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी यासाठी पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडण्याचा अभिनव उपाय नुकताच सुचवला आहे. हा उपाय कितपत यशस्वी व व्यवहार्य ठरेल हे येणारा काळच ठरवेल ! सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण जेव्हा पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झाले तेव्हा त्यांनी  विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा मुद्दा राज्यसभेत मांडला होता. 

नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी दप्तराचे वजन असायला हवे; पण हा नियम पाळतो कोण? या नियमाची सर्रास व सर्वत्र पायमल्ली होताना दिसते. लिहिणे म्हणजे अभ्यास या पारंपरिक कल्पनेला छेद द्यायला हवा. त्यासाठी पालकांची व शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी. इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा व इतर मंडळाच्या शाळा यांच्यात एक अदृश्य स्पर्धा सुरू झाली आहे. विद्यार्थी परीक्षार्थी असावा की ज्ञानार्जन करणारा असावा याचे प्रामाणिक उत्तर आपण कधी व कसे शोधणार? विद्यार्थ्यांच्या पाठीवरील आठ-दहा किलो वजनाचे दप्तराचे ओझे पाहून मुले शाळेत शिकायला जातात की दमायला जातात, असा प्रश्न पडतो !
दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांमध्ये आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. भविष्यात मान, पाठीचा कणा  इत्यादी व्याधी विद्यार्थ्यांमध्ये बळावू शकतात. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उंची वाढण्यास अडथळे निर्माण होत आहेत.  वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उभे राहण्याची पद्धतच बदलली आहे. किंबहुना या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक ठेवण बदलत आहे असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा केल्यावर दप्तराचे ओझे वाढण्याची अनेक कारणे पुढे आली.  मोठ्या आकाराची जाडजूड वह्या-पुस्तके, वाढलेले विषय व त्यामुळे वाढलेली वह्या-पुस्तके, प्रकल्प वह्या, संस्थेने वा शाळेने खासगी प्रकाशकांशी ‘हातमिळवणी’ करून विद्यार्थ्यांच्या माथी मारलेल्या अनावश्यक नोंदवह्या व कृतिपुस्तिका, लोहचुंबक असलेले जड पेन्सिल बाॅक्स, दप्तरात कोंबलेली खासगी शिकवणीची वह्या-पुस्तके, पाण्याची जड व मोठी बाटली, जेवणाचे २ - २ डबे, जड स्कूल बॅग्ज यांसारख्या अनेक बाबींच्या एकत्रित परिणामामुळे दप्तराचे ओझे वाढते.  

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही सर्वमान्य उपाय सुचवावेसे वाटतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वप्राथमिक विभागाची (नर्सरी, शिशूवर्ग इत्यादी) शाळा ‘दप्तरविरहित’ असावी. इयत्ता आठवीपर्यंत आठवड्यातून एक दिवस ‘दप्तरमुक्त  शाळा’ असावी. काही शाळांनी हा प्रयोग केला आहे व तो यशस्वीही झाला आहे. साधारणपणे २० वर्षांपासून शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतची पुस्तके मोठ्या आकारात काढली आहेत. त्यांचा आकार पुन्हा कमी करावा. सर्वच पाठ्यपुस्तकातील अनावश्यक धडे, माहिती, चित्रे, आकृत्या, तक्ते कमी करावेत. फक्त महत्त्वाच्या बाबींचाच पाठ्यपुस्तकात अंतर्भाव करावा. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील पानांची संख्या आपोआप कमी होईल.  प्रत्येक इयत्तेसाठी सत्रनिहाय पाठ्यपुस्तकाची रचना करावी. पाठ्यपुस्तकाचे वजन निम्म्याने कमी होईल ! 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: why is the burden of 8 10 kg on the back of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा