- मेघना ढोके(संपादक, लोकमत, सखी डॉट कॉम)
नाशिकच्या कुंभमेळ्यात एक नव्वदीला टेकलेले, पार कमरेतून वाकलेले, ‘इच्छा भिक्षा व्रत’ घेतलेले साधूबाबा भेटले होते. अंगावरचा एक पंचा आणि एक वाडगा सोडला तर त्यांच्याकडे दुसरं काहीही नव्हतं. अयोध्येतून आलेल्या एका खालशात उतरले होते. सकाळी उठून कुठल्याही खालशासमोर जाऊन उभे राहायचे. कुणी मूठभर तांदूळ दिले वाडग्यात तर आणायचे, दुसरं काहीही कुणी दिलं तर तिथेच ठेवून निघून येत; पण ‘मला तांदूळ द्या’ म्हणत नसत. कधी-कधी दिवसदिवस तांदूळ मिळत नसत. मग ‘आज परमेश्वराची हीच इच्छा’ म्हणून त्यांना उपास घडे. मूठभर तांदूळ मिळाले की, त्या दिवशी काट्याकुट्यांची तीन दगडांची चूल करून भात शिजवायचा आणि दिवसातून एकदाच खायचा.
त्यांना विचारलं, ‘बाबा, जर तुम्ही गेली सत्तर वर्षे असंच जगताय म्हणता तर या जत्रेत कसे येता?’ ते म्हणाले, ‘मनुष्य को सबसे जादा भाती है लोकेषणा! दुसरे का कहना की, आप अच्छे हो! ये जो भीड लगती है ना आजूबाजू, ये ताकद देती है, अपनी पीडा सहने की... नहीं तो अंधेरे मे कौन रोया, कौन देखा?’ - साधूबाबांचं म्हणणं होतं की, ‘कितीही पळा, पण इतरांनी आपली केलेली स्तुती, त्यानं वाटणारं सुख यातून सुटका नसते. ते मला नको असं म्हणणं हे ढोंग!’ माणसांचा गराडा, कौतुकाच्या नजरांसाठी व्रतस्थ साधूही आपापल्या जगातून बाहेर पडून कुंभाच्या जत्रेत येतात. अनेक हटयोगी बाबांचे फोटो प्रसिद्ध होतात, आता तर व्हिडीओही व्हायरल होतात.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ‘आयआयटी बाबा’ व्हायरल झाला! त्याची आयआयटीची कहाणी, त्याची पूर्वाश्रमीची मैत्रीण, आई-वडिलांची भांडणं आणि त्यानं सुखाच्या शोधात निघणं ही सारी कथा सनसनाटी व्हायरलला चटावलेल्या काळात वेगाने पसरली. पण त्याच्या आखाड्याने शिस्तभंगाची कारवाई करून ‘आयआयटी बाबा’ला आखाड्यातून काढून टाकलं. सध्या ॲम्बिसिडर बाबा, काँटेवाला बाबा, एन्व्हायर्नमेंट बाबा, रबडी बाबा, रुद्राक्ष बाबा आणि सुंदरी साध्वी हर्षा रिछारिया यांची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यापैकी काहींवर आखाड्यांनी कारवाई केली. त्यांना तातडीने कुंभाबाहेर जाण्याचे आदेश दिले. कारण संसारी समाजाप्रमाणेच साधूसमाजाचेही काही नियम असतात. त्यात एक शब्द अत्यंत अपमानास्पद म्हणून वापरला जातो : ‘मनमुखी’.
गुरूमुखी आणि मनमुखी असे दोन प्रकार. गुरूमुखी म्हणजे साधू परंपरेतले साधू. ते गंडाधारी शिष्य परंपरेत विशिष्ट नियमांचं पालन करून मग पुढे जाऊन महंत, महामंडलेश्वर आदी होतात. संसार सोडून पूर्णत: आपापल्या आखाड्यांशी, खालसांशी बांधलेले असतात. साधू समाजात गुरूमुखी साधूंना मोठा मान. गुरूनं दीक्षा दिल्यानं साधू बनलेले ते सगळे गुरूमुखी. या साधूंचीही वंशावळ बनते.
आणि मनमुखी? - ते एक दिवस स्वत:च्या मनानंच ‘साधू’ बनतात, म्हणून ते मनमुखी. त्यांचा कुणी गुरू नसतो. ते आखाड्यांच्या व्यवस्थांशी जोडलेले नसतात. गुरूमुखी साधू या ‘मनमुखीं’ना किल्लस मानतात, त्यांच्याविषयी रागाने, तिरस्काराने बोलतात. कुंभमेळ्यात खरा मान फक्त गुरूमुखींना असतो. पण टीव्ही, मागोमाग समाजमाध्यमं आली, त्यानंतर सगळे संदर्भच बदलले. मनमुखी साधू टीव्हीवर झळकू लागले. लोकप्रिय झाले. त्यांचा भक्तपरिवार, शिष्यपरिवार वाढला. पैसा-ग्लॅमर आलं.
साधू समाज अशा मातब्बर मनमुखी साधूंना वैतागला आहे. अनेक कुंभांत मनमुखी साधूंनी काढलेल्या मिरवणुकीवरून वाद, भांडणं होतात. त्यांना साधुग्रामात स्थान देऊ नये, अशा मागण्या होतात. अनेक मनमुखी साधू प्रचंड गर्दी खेचतात. त्यांच्याकडे पैसाही जास्त असतो. तिथली गर्दी सुशिक्षित, शहरी, पैसेवाली. जुन्या परंपरेतले खालसे गरीब. खालशात ‘पंगत’ धरून बसणाऱ्या गोरगरीब लोकांचीच गर्दी जास्त. त्यात प्रश्न आता फक्त पैसा, ग्लॅमरचा राहिलेला नाही, तर पारंपरिक व्यवस्थेत बाहेरच्या मनमुखींनी येऊन मनमर्जी वागण्याचा आणि गर्दी खेचण्याचाही झाला आहे. meghana.dhoke@lokmat.com