शाळांना कुलुपे ठोकायची बेजबाबदार घाई कशासाठी?

By अतुल कुलकर्णी | Published: January 15, 2022 10:11 AM2022-01-15T10:11:27+5:302022-01-15T10:11:37+5:30

दोन वर्षे झाली, आज आदेश निघतो आणि उद्यापासून शाळा बंद होतात. मुले साधीसाधी कौशल्ये गमावून बसली आहेत, त्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण?

Why the irresponsible rush to lock schools? | शाळांना कुलुपे ठोकायची बेजबाबदार घाई कशासाठी?

शाळांना कुलुपे ठोकायची बेजबाबदार घाई कशासाठी?

Next

- अतुल कुलकर्णी

एका गावात शाळा सुरू होती. मुले शिकत होती. शिक्षक त्यांना शिकवत होते. त्याच गावात शहरातले काही पर्यटक आले. त्यांनी शाळा सुरू असलेली पाहून थेट शिक्षकांनाच प्रश्न केला. ‘शाळा बंद करण्याचा निर्णय असताना तुम्ही शाळा कशी काय सुरू केली..?’ शिक्षक उलट उत्तर देऊ शकले असते, ‘की, काहो, पर्यटनावर बंदी असताना तुम्ही कसे फिरायला आलात..?’ मात्र त्यांनी तसे केले नाही. एकाच आठवड्यात असा प्रश्न त्या शिक्षकास किमान दहा लोकांनी केला. शेवटी त्यांनी ती शाळा कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी सुरू केली. काही दिवसांनी गावातल्या काही उडाणटप्पू लोकांनी ती शाळा बंद केली. 

ही घटना महाराष्ट्रातील एका छोट्या गावात घडलेली आहे. आई-वडिलांसोबत मुले मॉलमध्ये  फिरायला गेलेली चालतात. मात्र, तीच मुले शाळेत आल्यानंतर त्यांना कोरोना कसा होतो.., असा प्रश्न  मुंबईतल्या पालकांच्या गटाने केला होता. जे लोक  कामधंदा करून घरी येतात; ते कोरोना घेऊन येत नसतील कशावरून..? त्यांच्यामुळे मुले बाधित होत नसतील का? कोरोना काय फक्त शाळेत गेल्यानंतरच होतो का?  या आणि अशा अनेक प्रश्नांनी सध्या जागृत पालकांना त्रस्त करून सोडले आहे. शाळा चालू झाल्या पाहिजेत. मुलांचे शिक्षण व्यवस्थित झाले पाहिजे, असे वाटणाऱ्या पालकांची व शिक्षकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, कोणालाही हा प्रश्न गंभीरपणे सोडविण्याची इच्छा नाही. ग्रामीण भागात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

गेली दोन वर्षे, आज आदेश निघतो आणि उद्यापासून शाळा बंद होतात. एक शिक्षिका पोटतिडकीने सांगत होत्या, ‘त्यांच्या चौथीच्या मुलांना त्यांना तिसरीचे शिक्षण द्यावे लागत आहे. तेदेखील मुलांना कळत नाही.’ एका गावात तर ‘शाळा सुरू का राहिल्या?’ अशी विचारणा करणारे अर्ज माहिती अधिकारात आले. त्यामुळे चांगले शिक्षकही विनाकारण भानगड नको म्हणून काम करायलाच तयार नाहीत. 
 शाळा बंद असल्यामुळे चारचौघांत वागण्याचे कौशल्य मुले गमावत चालली आहेत. संवादाची क्षमता  हरवत चालली आहेत.नर्सरीसारख्या वर्गात मुले एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात, त्या बोलण्यातून त्यांची बोलण्याची क्षमता विकसित होते. ती प्रक्रिया गेली दोन वर्षे पूर्णपणे ठप्प झाली आहे. एकाग्रतेने काम करण्याची क्षमता, लेखनाची  क्षमता मुले विसरून गेली आहेत. दोन तासही मुले एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. मानसिक ताण घेण्याची क्षमता  नष्ट होत चालली आहे.  

चांगल्या दर्जाचे मोबाईल असंख्य पालकांकडे नाहीत. तीस मिनिटांचे लेक्चर झाले पाहिजे, असा सरकारी खाक्या! मात्र, त्या तीस मिनिटांत अनेक वेळा इंटरनेट कनेक्शन कट होते. काही जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या ईगोपलीकडे काहीही बघायला तयार नाहीत. त्यांची स्वतःची मुले जर अशा परिस्थितीतून गेली असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल  जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकेने अत्यंत पोटतिडकीने केला.

ग्रामीण भागात वेगळेच प्रश्न आहेत. तेथे मुलांची संख्या कमी झाली तर त्या शाळा बंद करण्याचा सरकारचा जुना निर्णय आहे. आज मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण दाखवून अनेक शाळा जर भविष्यात बंद केल्या गेल्या तर ग्रामीण भागात शिक्षणच उपलब्ध होणार नाही. जेथे मुले कमी आहेत त्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून शाळा चालू शकतात. मात्र ‘सब घोडे बारा टक्के’ याप्रमाणे सगळ्याच शाळांना सारखे नियम लावले जात आहेत. शाळा होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर ग्रामीण भागातील पालक मुलांना शेतीच्या कामाला जुंपू लागले आहेत. शिक्षकांच्या बाबतीतही अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची शिकवायची सवयच सुटत चालली आहे. ज्यांना चांगले शिकवायचे आहे, ज्यांना स्वतः अध्ययन आणि वेगळे प्रयोग करायचे आहेत, ते शिक्षक अस्वस्थ आहेत.

परदेशात आपल्यापेक्षा रुग्ण संख्या कितीतरी जास्त आहे. मात्र त्या ठिकाणच्या शाळाही सुरू आहेत. आपल्याकडे असे अजब निर्णय का घेतले जातात? याचे उत्तर सरकार, शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री कोणीही ठामपणे देत नाही. इतकी विदारक स्थिती कधीही पाहायला मिळाली नव्हती. गेली दोन वर्षे शाळा बंद आहेत. याचे परिणाम ही मुले जसजशी मोठी होत जातील तसतसे जाणवू लागतील.  त्यांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम या मुलांचे पुढचे सगळे आयुष्य धोक्यात आणणारे ठरतील, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. कोणीतरी याकडे गंभीरपणे पाहणार आहे का..?

Web Title: Why the irresponsible rush to lock schools?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app