वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:32 IST2025-05-14T08:32:14+5:302025-05-14T08:32:55+5:30

पाऊस-वाऱ्याच्या एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः शहरांतच का बघायला मिळतं?

why do the trees on the road fall in the wind and rain | वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात?

वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात?

शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण, नाशिक

पावसाळा सुरू झाला किंवा अवकाळी पाऊस आल्यावर तसंच परतीच्या पावसात वादळवाऱ्यात अनेक शहरांत रस्त्याच्या कडेला बरीचशी झाडं उन्मळून पडलेली दिसतात. यंदाही अवकाळी पावसामुळे हेच चित्र अनेक शहरांमध्ये बघायला मिळतं आहे. झाडं पडल्यामुळे अनेक जण जखमी झाले, काहींना जीवही गमवावा लागला, वाहनांचं नुकसान होण्याच्या घटना तर अगणित आहेत.

मुख्य प्रश्न आहे, एक-दोन पावसांतच इतकी झाडं का कोसळतात? अगदी वादळी वारा आणि मुसळधार पाऊस असला तरी एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः केवळ शहरांतच का बघायला मिळतं? माळरानावर, उघड्यावर असलेली झाडं अपवाद वगळता का कोसळत नाहीत? तसं बघायला गेलं तर मोकळ्या जागेतली झाडं जास्त पडायला हवीत, कारण त्यांना कोणताच आडोसा नसतो, पण शहरांमध्ये जी झाडं कोसळताना दिसतात, त्यांच्या अवतीभोवती मोठ्या इमारती आहेत, इतर विविध प्रकारचे आडोसे आहेत. त्यामुळे वादळवाऱ्यापासून त्यांचा बऱ्यापैकी बचाव होतो. समजा मोकळ्या जागेत ३० किलोमीटर प्रतितास वारा वाहत असेल, तर शहरांमध्ये त्याच वाऱ्याचा वेग बऱ्यापैकी मंदावलेला असतो. तरीही ही झाडं पडतात.

शेतांमध्ये, वनांमध्ये किंवा मोकळ्या जागेत फारच अपवादात्मक स्थितीत; जिथे मातीचा स्तर खोल असतो, अशा ठिकाणी जास्त पावसामुळे माती खूप ओली होते. त्यामुळे मुळांची मातीतील पक्कड सैल होऊन वादळी वाऱ्यांत आपला भार सांभाळण्यास अक्षम झाल्याने, काही झाडं उन्मळून पडतात. मोकळ्या जागेतील झाडं दिमाखात उभी असतात, कारण त्यांच्या मुळांच्या विस्ताराला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसते, त्याचप्रमाणे त्यांच्या पर्णसंभाराला मानवी हस्तक्षेप होऊन कुठल्या प्रकारची असंतुलित तोड झालेली नसते. त्यामुळे वादळवाऱ्यातही आपला भार सांभाळण्यास ही झाडं सक्षम असतात.

मग शहरांतली, रस्त्याच्या कडेला असलेली, तुलनेनं 'सुरक्षित' असलेली झाडं का उन्मळून पडतात? बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या खोदकामामुळे, उदाहरणार्थ, पाइपलाइन, पावसाळी गटार योजना, गॅसलाइन.. इत्यादी कारणांमुळे झाडांच्या मुळांच्या विस्ताराची तोड केलेली असते, मुळांचे बऱ्यापैकी नुकसान झालेले असते. झाडांच्या पर्णसंभाराचीही कुठल्या ना कुठल्या कारणाने असंतुलित छाटणी केली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा या झाडांच्या पर्णसंभाराचा भार एकाच बाजूला वाढलेला असतो.

अनेक ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलून झाडांच्या खोडाभोवती गच्च काँक्रिटीकरणाचा थर दिलेला असतो, ज्यामुळे ते आवळले जाऊन खोडाची साल खराब होते किंवा खोडाशी पाणी मुरून झाडं कुजतात. अशा कारणांमुळे आपला भार सांभाळण्यास अक्षम झालेली झाडं उन्मळून पडतात. त्यात प्रामुख्याने गुलमोहर, रेन ट्री, सुबाभूळ, स्पेतोडीया (पिचकारी वृक्ष), पेल्ट्राफॉर्म.. अशी परदेशी प्रजातीची, भरभर वाढणारी, अवाढव्य विस्तार असलेली झाडं असतात. उन्मळणाऱ्या झाडांमध्ये या झाडांचं प्रमाण जवळपास ९५ टक्के आहे. कारण याच प्रजाती मुख्यत्वे रस्त्याच्या कडेने लावल्या गेल्या आहेत.

कोणती झाडं, कुठे लावली गेली पाहिजेत, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, याचं शास्त्र समूजन घेणंही अत्यावश्यक आहे. येणाऱ्या काळात अभ्यासपूर्ण रीतीनं योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजार्तीची लागवड ही काळाची गरज आहे. तसं झालं तर एकाच पावसात झार्ड उन्मळून पडण्याचे, हाहाकार उडण्याचे प्रकार नक्कीच कमी होतील. शहरांमध्ये झाडं पडण्याच्या घटना थांबवायच्या असतील तर झाडांच्या वाढीतला मानवी हस्तक्षेप थांबवणंही तितकंच गरजेचं आहे.
shekargaikwadtnc@gmail.com
 

Web Title: why do the trees on the road fall in the wind and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.