भारतातले गर्भश्रीमंत परदेशात जाऊन लग्न का करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:33 IST2023-12-02T10:27:37+5:302023-12-02T10:33:14+5:30

Marriage: ‘भारतीयांनी आपले लग्नसोहळे परदेशात न करता देशांतर्गत अर्थकारणाला हातभार लावावा’ असे आवाहन खुद्द पंतप्रधानांना करावे लागले, त्यामागचे कारण काय आहे?

Why do rich Indians go abroad and get married? | भारतातले गर्भश्रीमंत परदेशात जाऊन लग्न का करतात?

भारतातले गर्भश्रीमंत परदेशात जाऊन लग्न का करतात?

- मनोज गडनीस
(विशेष प्रतिनिधी, लोकमत, मुंबई)

प्रत्येक सण - सोहळे अगदी समरसून साजरे करणाऱ्या भारतीयांसाठी घरातले लग्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! लोक आपली पत, प्रतिष्ठा यांचा फारसा विचार न करता ती एक अत्यंत सुखद आठवण कशी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष देत तो लग्नसोहळा आयोजित करतात. भारतीय लग्नाच्या अर्थकारणाचा अंदाज सांगायचा तर, यंदाच्या वर्षी लग्नाच्या मोसमात तब्बल ३५ लाख विवाह सोहळे होणे अपेक्षित  असून, तब्बल सव्वा चार लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

जागतिकीकरणानंतर गर्भश्रीमंत भारतीयांना आपल्या खाशा लग्नसोहळ्यांसाठी परदेशातील नयनरम्य ठिकाणे खुणावू लागली. एकेकाळी हनिमूनसाठी परदेशात जाणे प्रतिष्ठेचे होते,  आता परदेशात होणारी लग्नं हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यात गुंतलेले अर्थकारण इतके मोठे आहे की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ‘भारतीयांनी लग्नसोहळ्यासाठी भारतातील पर्यटनस्थळांना प्राधान्य देत देशातील अर्थकारणाला हातभार लावावा’, असे आवाहन केले आहे.
मुळात या मुद्यावर थेट पंतप्रधानांना भाष्य करावेसे का वाटले? - कारण त्यामागचे अर्थकारण! या परदेशी लग्नांसाठी भारतीय लोक वर्षाकाठी दीड ते दोन हजार कोटी रुपयांच्या घरात खर्च करतात, असा ढोबळ अंदाज आहे. खरेतर, भारतात होणाऱ्या लग्नांच्या आर्थिक उलाढालीच्या तुलनेत हा आकडा नगण्यच आहे. मुळात १०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची देशातील संख्या ८ लाखांच्या घरात आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात ही संख्या तशी नगण्यच!

पाच वर्षांपूर्वी एका देखण्या पर्यटनस्थळी आलिशान सोहळ्यात लग्न केलेले राहुल एम. सांगतात, ‘लग्न हा भावनिक विषय आहे. इथे दोन कुटुंबे एकमेकांशी कायमची जोडली जातात. जी गोष्ट माझ्या आयुष्यात नेहमीच खास राहणार आहे ती इतरांपेक्षा वेगळी, ‘एक्सक्लुसिव्ह’ कशी ठरेल, याची किंमत पैशात करता येत नाही. शिवाय व्यावसायिक संबंधात अनेक लहान - मोठ्या गोष्टींचे उपकार दिले - घेतलेले असतात. प्रत्येकवेळी त्याची परतफेड थेट पैशात करता येते असे नाही. लग्नासारख्या प्रसंगी त्या लोकांचा योग्य मान - सन्मान केला तर त्यांनाही ते विशेष भावते. त्यामुळेच परदेशी लग्न सोहळ्यामध्ये घरच्या नातेवाइकांपेक्षा मित्रमंडळी जास्त असतात!’

समाजाच्या ज्या वर्गातील लोक परदेशात जाऊन लग्नसोहळे साजरे करतात, त्यांनी जर हेच सोहळे भारतात केले तर त्यांच्या वर्तुळातील केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी मित्रांनादेखील भारताचे वैशिष्ट्य उमजू शकेल. भविष्यात त्यांच्या घरातील लग्नांसाठीदेखील ते भारतातील पर्यटनस्थळांची निवड आवर्जून करू शकतील, असे इव्हेंट मॅनेजर राकेश सुकेशन यांचे म्हणणे आहे. 

भारतातील पर्यटनस्थळी ‘डेस्टिनेशन वेडिंग्ज्’ची संख्या वाढावी म्हणून ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशातील २५ ठिकाणांची निवड करून त्यांचे मार्केटिंग सुरू केले आहे. मात्र, तेवढे पुरेसे नाही. कारण स्थळ निवडून काही होणार नाही. परदेशात विशेषतः स्वित्झर्लंड, इटली, व्हिएन्ना, दुबई, मालदीव, पोर्तुगाल, जॉर्डन, दक्षिण आफ्रिका, बहारीन, व्हिएतनाम, श्रीलंका आदि देशांत जिथे भारतीय लोक हमखास लग्न करण्यासाठी जातात तिथे लग्नासाठी म्हणून ज्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, तशा सुविधा भारतातदेखील उभ्या कराव्या लागतील. अशा सोहळ्यांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ अशी सेवा सध्या विकसित होते आहे. पाहुण्यांच्या आगतस्वागतापासून निवास, खाणे-पिणे, विधी आदींसाठी कसलीही तकतक करावी न लागता तणावरहीत वातावरणात ‘लग्न एन्जॉय करता येण्याच्या सुविधा’ भविष्यकाळात या उद्योगासाठी महत्त्वाच्या ठरतील. मग केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकदेखील भारतात येऊन त्यांचे लग्नसोहळे साजरे करताना दिसतील!
manoj.gadnis@lokmat.com

Web Title: Why do rich Indians go abroad and get married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.