इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:34 IST2025-12-30T08:34:01+5:302025-12-30T08:34:20+5:30
इस्त्रायलच्या सैन्याला जगातलं सर्वात धोकादायक आणि सक्षम सैन्य मानलं जातं. पण केवळ पुरुष सैनिकच नाहीत, तर इस्त्रायली महिला सैनिकही अगदी रणभूमीवरही शत्रूशी झुंजताना दिसतात.

इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात?
इस्त्रायल आणि हमासच्या युद्धामुळे तसंच गाझा पट्टीत इस्त्रायलनं हजारो पॅलेस्टिनी सैनिकांना कंठस्नान घातल्यानं, हमासच्या लढवय्यांना त्यांनीच तयार केलेल्या बोगद्यांमध्ये जिवंत गाडल्यानं, इस्त्रायल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
इस्त्रायलच्या सैन्याला जगातलं सर्वात धोकादायक आणि सक्षम सैन्य मानलं जातं. पण केवळ पुरुष सैनिकच नाहीत, तर इस्त्रायली महिला सैनिकही अगदी रणभूमीवरही शत्रूशी झुंजताना दिसतात. निधड्या छातीच्या, लढवय्या महिला सैनिक म्हणून त्यांचं जगभरात नाव आहे. युद्धभूमीवरील त्यांच्या कर्तृत्वामुळे तर त्यांचा बोलबाला आहेच, पण त्यांच्या सौंदर्यामुळेही जगभरात इस्त्रायली महिला सैनिकांविषयी मोठं कुतूहल आहे. ज्या तरुणी आपल्या सौंदर्यामुळे अगदी सहजपणे मॉडेलिंग किंवा चित्रपटांमध्ये करिअर करू शकतात, त्या रणांगणावर, इतक्या कठीण परिस्थितीत स्वत:ला मानसिक, शारीरिक त्रास देत कठोर मेहनत का घेतात, याबद्दलही सगळ्यांना आश्चर्य वाटतं.
जगातल्या कोणत्याही देशात नसतील इतक्या मोठ्या प्रमाणात सुंदर तरुणी इस्त्रायली सैन्यात का दिसतात, यामागचं महत्त्वाचं कारण आहे त्यांच्या देशाचा कायदा आणि देशासाठी आपलं योगदान आपण दिलंच पाहिजे ही इस्त्रायली तरुणींची मानसिकता. त्यामुळेच इस्त्रायलमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलाही अभिमानानं देशाची सेवा करताना दिसतात.
इस्त्रायलमध्ये प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षं पूर्ण झाल्यावर सैन्यसेवा करणं अनिवार्य आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. आवड-निवड-करिअर असा पर्यायच तिथे उपलब्ध नाही. सैन्यात भरती होणं हे राष्ट्रीय कर्तव्य मानलं जातं आणि ते पार पाडणं बंधनकारक असतं.
जगात सुंदर मानल्या जाणाऱ्या इस्त्रायली सैन्यातील महिला वयाच्या १८व्या वर्षीच सैन्यात दाखल होतात. दोन वर्षं प्रशिक्षण आणि सेवा पूर्ण केल्याशिवाय त्यांना सैन्यातून बाहेर पडता येत नाही. इस्त्रायलची जेव्हा स्थापनाही झाली नव्हती, इस्त्रायल हा देशच अस्तित्वात आलेला नव्हता, त्याच्याआधीच देशाच्या निर्माणकर्त्यांनी ठरवलेलं होतं की इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसमध्ये (आयडीएफ) महिलांचं प्रतिनिधित्व असेल !
देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्त्वाचं आहे, मग तो पुरुष असो किंवा महिला, असा सरकारचा विश्वास आहे. सैन्य प्रशिक्षणानंतर महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत मजबूत बनतात आणि कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरं जायला सज्ज असतात. इस्त्रायलमध्ये महिलांना सैन्यातही पुरुषांइतक्याच समान संधी मिळतात. पुरुषांसोबत लष्करी टँक, विमानं, युद्धभूमीवरही त्या कार्यरत असतात. सैन्यात भरती होण्यासाठी अगदी कमी वयापासून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. स्त्री आणि पुरुष; दोघांमध्येही हसत हसत देशासाठी प्राण देण्याची तयारी असते.
या महिला फक्त बंदूक चालविण्यातच नाही, तर संगणक, अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक कौशल्यांतही निपुण असतात. इस्त्रायली सैन्यात सुंदर तरुणी दिसतात, त्या त्यांच्या कष्ट, ध्येय आणि जिद्दीमुळेच. आत्मविश्वास, मेहनतीचा घाम तुम्हाला मूळच्या सौंदर्यापेक्षा अधिक सुंदर बनवितो, अशी या महिलांचीही धारणा आहे.