अधिष्ठात्यांची खूर्ची अस्थिर करण्याचे राजकारण कुणाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:36 PM2020-05-28T23:36:02+5:302020-05-28T23:36:41+5:30

मिलिंद कुलकर्णी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे जळगाव जिल्ह्यातील प्रमाण हे देशापेक्षा चौपट असल्याचा ठपका ठेवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ...

Whose politics is it to destabilize the chair of the incumbents? | अधिष्ठात्यांची खूर्ची अस्थिर करण्याचे राजकारण कुणाचे ?

अधिष्ठात्यांची खूर्ची अस्थिर करण्याचे राजकारण कुणाचे ?

Next

मिलिंद कुलकर्णी
कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे जळगाव जिल्ह्यातील प्रमाण हे देशापेक्षा चौपट असल्याचा ठपका ठेवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांची २२ मे रोजी उचलबांगडी करण्यात आली. कोल्हापूरच्या डॉ. मीनाक्षी गजभिये यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी काढला.
डॉ.लहाने यांनी आणखी दोन नियुक्ती केल्या होत्या. धुळ्याचे प्रा.जयप्रकाश रामानंद यांची गजभिये यांच्या जागेवर कोल्हापूर येथे बदली तर अहमदनगरच्या डॉ.पल्लवी सापळे यांची धुळ्याच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. गजभिये या रविवारी नाशिकपर्यंत आल्या आणि त्यांना निरोप मिळाला की, जळगावला जाऊ नका. त्या तिथून परत फिरल्या आणि कोल्हापूरच्या अधिष्ठाता म्हणून पूर्ववत काम पाहू लागल्या. डॉ.सापळे धुळ्यात रुजू झाल्या. रजेवर गेलेले डॉ.भास्कर खैरे पूर्ववत रुजू झाले. प्रा.रामानंद हे कोल्हापूरहून धुळ्यात परतले.
खैरे यांची बदलीची मागणी उघडपणे झाली आणि त्याचे श्रेयदेखील घेतले गेले. पालकमंत्री गुुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य सल्लागार समितीच्या बैठकीत शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेतील त्रुटींवर बोट ठेवत अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांमधील वादामुळे सेवेवर परिणाम होत असल्याची टीका केली. राष्टÑवादी काँग्रेसचे विनोद देशमुख, अभिषेक पाटील, योगेश देसले यांनी अजित पवार, शरद पवार, राजेश टोपे यांच्याकडे तक्रारी केल्या. अधिष्ठात्यांच्या बदलीची मागणी केली. स्वाभाविकपणे बदलीचे श्रेय त्यांना जाते.
आता गजभिये यांना रोखले कोणी हा कळीचा प्रश्न आहे. कोल्हापूरकरांना गजभिये हवे होते, रामानंद नको होते, म्हणून त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडत बदली रद्द करुन घेतली. कोल्हापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा आणि चांगला अधिकारी यासाठी अपवाद वगळता सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आले. जळगावात मात्र उलटे चित्र दिसले. गजभिये आले नाही, खैरे कायम राहिले, यासंदर्भात मागणी करणारे, श्रेय घेणारे आता मौन बाळगून आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर हा विषय आपल्याला माहित नसल्याचे म्हणत हात वर केले. ज्यांनी बदली केली, ते डॉ.तात्याराव लहाने यांनीही या बदली नाट्यातून अंग काढून तुम्ही अधिष्ठात्यांनाच विचारा असे वक्तव्य केले.
अधिष्ठात्यांचा विषय असताना त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहिती नाही, ज्यांनी बदलीचे आदेश काढले, ते मोकळेपणाने बोलत नाही, म्हटल्यावर संशयाचा धूर येतोच. काही तरी घडले आहे. राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात कानोसा घेतला हे सगळे नाट्य घडविण्यात कोल्हापूरकरांबरोबर जळगावच्या विरोधी पक्षाच्या माजी मंत्र्याचा मोलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. प्रशासकीय यंत्रणेशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या या माजी मंत्र्याने खैरे आणि प्रशासनाची बाजू मांडल्याचे कळते. मालेगावला कोरोनाचा प्रकोप होताच तेथे अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका आयुक्त अशा सगळ्यांच्या एकदम बदल्या केल्या. त्याच आधारावर जळगावला ही मागणी झाली. पण मालेगावप्रमाणे हा प्रकोप नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. बदली केल्यास नव्या अधिकाºयाला परिस्थिती समजून घेण्यात वेळ लागेल, असा युक्तीवाद पटल्याने खैरे यांची खूर्ची शाबूत राहिली, असे एकंदरीत चित्र आहे.
महाविकास आघाडीत शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र या तीन पक्षांमध्ये अजिबात समन्वय नाही. खैरे यांची खूर्ची अस्थिर करण्याचा जो प्रयत्न झाला, त्याला वरिष्ठ पातळीवर सुरुवातीला प्रतिसाद मिळाला, पण वस्तुस्थितीची जाणीव होताच बदली रद्द झाली. हा इशारा आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. पूर्वीसारखे राजकारण आता चालणार नाही. सुसंवाद, समन्वयाने सरकार चालविण्याची भूमिका शरद पवार, उध्दव ठाकरे व सोनिया-राहूल गांधी यांची आहे. त्यामुळे पुन्हा असा प्रयत्न होणार नाही, अशी अपेक्षा बाळगूया.

Web Title: Whose politics is it to destabilize the chair of the incumbents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.