मध्य पूर्वेत पेटलेल्या युद्धात कोण कुणाचे प्यादे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 04:48 IST2026-03-24T04:48:36+5:302026-03-24T04:48:36+5:30

इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन हानी पोहोचविण्याऐवजी इराणने संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि बहारीनला लक्ष्य का केले?

who is whose pawn in the war raging in the Middle East | मध्य पूर्वेत पेटलेल्या युद्धात कोण कुणाचे प्यादे आहे?

मध्य पूर्वेत पेटलेल्या युद्धात कोण कुणाचे प्यादे आहे?

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

युद्धात लपलेल्या विषवल्लीबद्दल इतिहासातील शहाणेसुरते लोक नेहमीच इशारे देत आले. पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धाच्या ज्वालांनी पुन्हा एकदा त्या इशाऱ्यांची आठवण करून दिली. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असताना एक करडे वास्तव आता समोर येत आहे. इराणने इस्रायलविषयी संयम बाळगून अरब शेजाऱ्यांवर सहेतुकपणे आक्रमकता दाखवली. इस्रायलच्या हल्ल्याला हल्ल्याने प्रत्युत्तर देऊन हानी पोहोचविण्याऐवजी इराणने संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि बहारीनवर हजारो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले.  

तेहरानला इस्रायलविषयी खरोखरच आत्मीयता वाटते आहे, की आखातात अमेरिकेला प्रभुत्व मिळवून देणाऱ्या सुन्नी अरब अर्थव्यवस्थांवर त्याला आघात करावयाचा होता? शिया-सुन्नी यांच्यातील तणाव आजचा नाही, तो खोलवर गेलेला आहे. त्यातूनच हे घडले असावे; आणि हे हल्ले होत असताना अरब देशांनी थेट प्रत्युत्तर का दिले नाही? 

युद्धाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सुमारे ६० टक्के इराणी दारूगोळा इस्रायलऐवजी अमेरिकी तळ आणि आखाती आस्थापनांवर वापरला गेला. अरब जगताचे खूपच मोठे नुकसान झाले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होरपळून निघाले. तेलसाठ्यांवर हल्ले झाले. विमान उड्डाणे रद्द केली गेली किंवा वळवली गेली. आलिशान हॉटेल्स आणि ऊर्जा प्रकल्पांवर थेट हल्ले झाले. कतारच्या एलएनजी प्रकल्पाचे खूप मोठे नुकसान झाले. 

सौदी अरेबियाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प तसेच अनेक कुवेती आस्थापनांना मुद्दाम लक्ष्य  केले गेले. उंच हॉटेल्स तर सर्वच देशांत हल्ल्यांचे लक्ष्य ठरली. जागतिक बाजारात तेलाच्या किमती ११० डॉलरपर्यंत भडकल्या. संयुक्त अरब अमिरात आणि इतर आखाती अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने पर्यटन महत्त्वाचे असताना प्रतिदिन साडेपाचशे ते साडेसहाशे दशलक्ष डॉलर्सचे नुकसान या प्रदेशात झाले. या हिशेबाने ४० ते ५६ अब्ज डॉलर्स इतके नुकसान वर्षाकाठी या भागात होईल, असा अंदाज आहे.

आखाती देशांचे शासक वॉशिंग्टनवर दबाव आणतील अशी अपेक्षा इराणला आहे. रणनीतिकारांच्या मते हा पुस्तकी विचार झाला. ज्या सुन्नी अरबांचा अमेरिका प्यादे म्हणून वापर करत आहे त्यांना जखमी करून अमेरिकेचा युद्धखर्च वाढवण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. दूरवरच्या आणि भक्कम संरक्षणातल्या इस्रायलवर लष्करी कुरघोडी करण्यापेक्षा हा मार्ग इराणने अवलंबला. 

इराण या प्रदेशातील प्रमुख शिया शक्ती असून,  आखातातील राजेशाही प्रामुख्याने सुन्नी आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यांच्यासह सुन्नी अरब देशांकडे तेहरान पिढ्यान‌्पिढ्या आपला वैचारिक आणि भूराजकीय शत्रू म्हणून पाहत आला.  आखातातील सुन्नी अर्थव्यवस्था पद्धतशीरपणे नामोहरम करून  इस्रायलशी सामान्य संबंध प्रस्थापित करणे इराणला शक्य होईल. अमेरिका ज्या सुन्नी पंथीयांचा वापर करते त्यांचा बीमोड करून अमेरिकन आक्रमणाविरुद्ध व्यापक मुस्लीम हितरक्षणकर्ता या भूमिकेत इराण स्वतःला पाहू इच्छितो. 

दरम्यान, अरब देशांनी दाखविलेला संयम निरीक्षकांना बुचकळ्यात टाकणारा आहे. हे देश प्राय: अमेरिकेच्या सुरक्षा छत्रछायेखाली असून, त्यांची लष्करी धोरणे आखातात आक्रमकतेऐवजी बचावाच्या बाजूने झुकणारी आहेत. इराणशी थेट संघर्ष घेतला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. तेल आस्थापनांचे मोठे नुकसान होईल. एकप्रकारे ती आर्थिक आत्महत्या ठरेल. रियाधमध्ये झालेल्या अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत इराणच्या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध झाला, मात्र युद्धात सामील होण्याविषयी चकार शब्द कुणी काढला नाही. 

आता रमजान संपल्यावर इराणला संपविणारे हल्ले अरब देश करतील अशी एक वावडी उठली आहे. तेहरानची क्षमता नष्ट करण्याची ताकद केवळ अमेरिका आणि इस्रायलमध्ये आहे असे आखाती देशाच्या नेतृत्वाला वाटते म्हणून ते हल्ले सहन करून अमेरिकेवर भिस्त ठेवून आहेत. त्यांच्या अर्थव्यवस्था रक्तबंबाळ झाल्या असताना हल्ल्याचे ओझे अमेरिकेच्या शिरावर टाकायची त्यांची तयारी आहे.
 

Web Title : मध्य पूर्व संघर्ष: इस युद्ध में मोहरे कौन हैं?

Web Summary : ईरान के हमलों का निशाना इस्राइल नहीं, सुन्नी अरब अर्थव्यवस्थाएं थीं, जिसका मकसद अमेरिकी प्रभाव को कम करना और खुद को मुसलमानों के रक्षक के तौर पर पेश करना है, जबकि अरब राष्ट्र सीधे संघर्ष में शामिल होने से हिचकिचा रहे हैं।

Web Title : Middle East Conflict: Who are the pawns in this war?

Web Summary : Iran's attacks targeted Sunni Arab economies, not Israel, aiming to weaken US influence and position itself as a defender of Muslims while Arab nations remain hesitant to directly engage in conflict.