इथे होती कुठे गेली? २ सेकंदांत ७०० कि.मी. वेग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:13 IST2026-01-05T05:12:47+5:302026-01-05T05:13:46+5:30
गेली काही वर्षे चीनचे संशोधक यासाठी प्रयत्नशील आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांना यात यश मिळालं.

इथे होती कुठे गेली? २ सेकंदांत ७०० कि.मी. वेग!
चीनमधील काही दिवसांपूर्वीचीच घटना. रेल्वे ट्रॅकवर एक ट्रेन आली; पण डोळ्यांचं पातं लवतं ना लवतं एवढ्यात ती अदृश्य झाली! जणू काही ही ट्रेन रुळांवर आली होती की नाही? की आपल्याला भास झाला? - उपस्थित सगळ्यांनाच हा आश्चर्याचा धक्का होता; पण हा भास नव्हता तर ते वास्तव होतं...!
या ट्रेननं २ सेकंदांत ताशी तब्बल ७०० किलोमीटर वेग घेतला होता. वेगाच्या बाबतीत हा जागतिक विक्रम आहे. गेली काही वर्षे चीनचे संशोधक यासाठी प्रयत्नशील आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांना यात यश मिळालं.
चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या अतिवेगवान मॅग्लेव ट्रेनची यशस्वी चाचणी केली. या चाचणीचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्यानं बोटे तोंडात घातली आहेत! जवळपास एक टन वजनाच्या या ट्रेनला ४०० मीटर लांबीच्या खास ट्रॅकवर चालवण्यात आलं. चाचणीदरम्यान ट्रेननं काही क्षणांतच विक्रमी वेग गाठला. त्यानंतर सुरक्षित पद्धतीनं या ट्रेनला थांबवण्यातही आलं.
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ही आत्तापर्यंतची सर्वांत वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव ट्रेन आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये याच ट्रॅकवर ही ट्रेन ताशी ६४८ किलोमीटर वेगानं चालवण्यात यश आलं होतं; पण आता ताशी ७०० किलोमीटरचा टप्पा पार करत या ट्रेननं नवा जागतिक विक्रम केला आहे.
मॅग्लेव ट्रेनची खासियत अशी की, ती रुळांना स्पर्शच करत नाही. या ट्रेनमध्ये लावलेले शक्तिशाली चुंबक ट्रेनला हवेत उचलतात आणि पुढच्या दिशेनं ढकलतात. चाके आणि रुळांमध्ये कोणताही संपर्क नसल्यामुळे घर्षण निर्माण होत नाही. त्यामुळे ट्रेन प्रचंड वेगानं धावू शकते.
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ज्या शक्तीनं ही ट्रेन पुढे जाते, त्याच तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात रॉकेट प्रक्षेपणासाठीही केला जाऊ शकतो. जर हे तंत्रज्ञान प्रवासी ट्रेनमध्ये वापरलं गेलं, तर मोठ्या शहरांमधला प्रवास काही मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. हे तंत्रज्ञान भविष्यातील हायपरलूप वाहतुकीची पायाभरणी करू शकतं. हायपरलूपमध्ये ट्रेन व्हॅक्युमसारख्या बंद नळ्यांमधून प्रचंड वेगानं धावेल. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल.
या पार्श्वभूमीवर भारतातल्या सर्वांत वेगवान ट्रेनचा वेग किती आहे? सध्या भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आहे. तिचा कमाल वेग ताशी साधारण १८० किलोमीटर आहे. दैनंदिन प्रवासात हीच ट्रेन देशातील सर्वांत वेगवान ट्रेन मानली जाते. भविष्यात भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन बुलेट ट्रेन असेल. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तिचं काम सुरू आहे. ती सुरू झाल्यावर तिचा वेग ताशी सुमारे ३२० किलोमीटर असेल.
जर्मनी आणि ब्रिटननं सर्वांत आधी मॅग्लेव तंत्रज्ञानावर काम सुरू केलं होतं; पण आज तिथे मॅग्लेव ट्रेन धावत नाहीत. जर्मनीच्या तंत्रज्ञानावरच चीनची पहिली मॅग्लेव ट्रेन तयार झाली होती. आज चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या तीन देशांमध्येच फक्त मॅग्लेव ट्रेन धावत आहेत. हे तंत्रज्ञान अत्यंत महाग आणि गुंतागुंतीचं आहे. मॅग्लेवसाठी पूर्णपणे वेगळा ट्रॅक आणि पायाभूत सुविधा लागतात. नेहमीच्या रेल्वेमार्गावर त्या चालत नाहीत. त्यामुळे त्यांचं प्रमाणही कमी आहे.