हॉकीची अवकळा कधी संपणार?

By रवी टाले | Published: December 7, 2018 05:47 PM2018-12-07T17:47:06+5:302018-12-07T17:54:20+5:30

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे; मात्र देशात राष्ट्रीय खेळाची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे असे वातावरण अजिबात नाही.

When will the hockey bad phase end? | हॉकीची अवकळा कधी संपणार?

हॉकीची अवकळा कधी संपणार?

googlenewsNext
ठळक मुद्देहॉकी मागे पडण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांच्या तुलनेत हॉकी खेळण्यासाठी लागणारी मैदान आणि साधनांची गरज! हॉकीला देशात मरणपंथाला न लागू देणे हे सरकार, हॉकी इंडिया ही हॉकीची भारतातील सर्वोच्च संघटना आणि तमाम क्रीडा रसिकांची जबाबदारी आहेदेशात उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास युवा हॉकीपटू तयार होण्याच्या प्रक्रियेस चालना मिळेल.

कोणत्याही खेळाची विश्वचषक स्पर्धा ज्या देशात ती खेळवली जाते त्या देशातील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच असते. विशेषत: तो खेळ जर यजमान देशाचा राष्ट्रीय खेळ असेल तर मग स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण देश उत्सवी वातावरणात न्हाऊन निघतो. दुर्दैवाने भारतात मात्र चित्र काही वेगळेच आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबरपासून १६ डिसेंबरपर्यंत पुरुष हॉकीची विश्वचषक स्पर्धा खेळविल्या जात आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे; मात्र देशात राष्ट्रीय खेळाची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे असे वातावरण अजिबात नाही. विशेष म्हणजे १६ देशांमध्ये भारताला पाचवे मानांकन मिळाले असून, जगज्जेता पदासाठी भारताला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. तरीही कुठेही विश्वचषक स्पर्धेची चर्चा नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत, त्या राज्यांमध्येही पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे, भारत-आॅस्टेÑलिया कसोटी क्रिकेट मालिकेची चर्चा सुरू आहे, छोट्या पडद्यावरील टुकार मालिका आणि तथाकथित रिअ‍ॅलिटी शोंवर चर्चा झडत आहेत; मात्र हॉकी विश्वचषक स्पर्धेची कुठेही चर्चा नाही! प्रसारमाध्यमांमध्येही हॉकी विश्वचषक स्पर्धेपेक्षा भारत-आॅस्टेÑलिया क्रिकेट मालिकेला अधिक जागा मिळत आहे. ज्या देशाने अनेक वर्षे हॉकी खेळावर एकछत्री अंमल गाजवला, त्या देशातील हॉकीप्रतीची ही अनास्था बघून हॉकीप्रेमींच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असेल!
भारतात क्रिकेट या खेळाप्रती जी ‘क्रेझ’ आहे ती राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीप्रती का नाही, हा प्रश्न क्रीडा क्षेत्रातील जाणकारांना नेहमीच पडत आला आहे. अलीकडे फुटबॉल या खेळाचे आकर्षणही वाढत चालले आहे; मात्र हॉकीबाबत जाणवते ती अनास्थाच! या प्रश्नाचे एक उत्तर हे असू शकते, की हॉकीमधील भारताचा सुवर्णकाळ ही इतिहासजमा झालेली गोष्ट झाली आहे. मध्यंतरी तर भारताला विश्वचषक आणि आॅलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पात्रता फेरींमध्ये खेळावे लागत होते एवढी भारतीय हॉकीची दयनीय अवस्था झाली होती. गत काही वर्षात पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली असली तरी, विजयांच्या वारंवारितेच्या आधारे राष्ट्रीयत्वाची भावना जागविण्यात हॉकी संघ अद्यापही कमी पडत आहे. सर्वसामान्य चाहत्यांना त्यांच्या देशाचा संघ सतत जिंकायला हवा असतो. जेव्हा एखादा संघ चाहत्यांना विजयाचा आनंद मिळवून देण्यात सातत्याने अपयशी ठरतो, तेव्हा चाहत्यांचा त्या खेळातील रस हळूहळू कमी होत जातो आणि अखेर संपतो. भारतीय हॉकीच्या संदर्भात नेमके हेच झाले.
भारतात दूरचित्रवाणीचा प्रसार होऊन सर्वसामान्य चाहत्यांना खेळाचा पडद्यावर आनंद लुटण्याची संधी मिळेपर्यंत भारतीय हॉकीचे सुवर्णयुग संपून अवकळा सुरू झाली होती. दुसरीकडे १९८३ मधील विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटचे ‘अच्छे दिन’ सुरू व्हायला आणि दूरचित्रवाणीच्या प्रसाराला एकच गाठ पडली. भारताचा राष्ट्रीय खेळ मागे पडून क्रिकेटला अतोनात महत्त्व येण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण ठरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जागतिक पातळीवर क्रिकेट नियंत्रित करण्याइतपत शक्तिशाली होण्यामागे भारतातील दूरचित्रवाणीच्या प्रसाराने मोठी भूमिका बजावली ही वस्तुस्थिती आहे.
हॉकी मागे पडण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांच्या तुलनेत हॉकी खेळण्यासाठी लागणारी मैदान आणि साधनांची गरज! कपडे धुण्यासाठीची मोगरी किंवा एखादे लाकडाचे फळकुट, एक रबरी चेंडू आणि घरासमोरील गल्लीदेखील क्रिकेट खेळण्यासाठी पुरेशी ठरते. फुटबॉल खेळण्यासाठी तर केवळ चेंडू असला की झाले! या उलट हॉकी खेळण्यासाठी मात्र आवश्यक त्या पायाभूत सुविधा लागतातच! प्रत्येक खेळाडूकडे हॉकी स्टिक, गोलरक्षकासाठी आवश्यक ती संरक्षक साधने आणि दोन गोलपोस्ट असल्याशिवाय हॉकी खेळताच येत नाही. शिवाय मातीच्या मैदानावर हॉकी खेळणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच खेळण्यासाठी क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन अशा खेळायला सोप्या खेळांना प्राधान्य मिळते. त्याचा स्वाभाविक परिणाम हॉकीपटू तयार होण्यावर झाला.
हे सगळे खरे असले तरी हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, हे विसरता कामा नये! हॉकीला देशात मरणपंथाला न लागू देणे हे सरकार, हॉकी इंडिया ही हॉकीची भारतातील सर्वोच्च संघटना आणि तमाम क्रीडा रसिकांची जबाबदारी आहे. सुदैवाने सध्याची हॉकी चमू चांगली कामगिरी करीत आहे. देशात उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास युवा हॉकीपटू तयार होण्याच्या प्रक्रियेस चालना मिळेल आणि अगदी मेजर ध्यानचंद यांच्या काळातील सुवर्णयुग जरी परतू शकले नाही, तरी जगातील आघाडीच्या हॉकी संघांमध्ये भारतीय संघाचे नाव नक्कीच समाविष्ट होऊ शकेल!
 

              - रवी टाले
ravi.tale@lokmat.com

Web Title: When will the hockey bad phase end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.