महायुद्धात शत्रूंमध्ये फुटबॉलची मॅच रंगते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:05 IST2024-12-31T10:04:44+5:302024-12-31T10:05:10+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दिवसेंदिवस ते धुमसतं आहे. सगळं जग नाताळचा सण साजरा करीत असताना रशियानं नेमक्या याच दिवशी ७८ क्षेपणास्त्रं आणि १०६ ड्रोन्सच्या साहाय्यानं युक्रेनवर जोरदार हल्ला केला. यात काही निष्पाप नागरिक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले..

When a football match takes place between enemies during World War... | महायुद्धात शत्रूंमध्ये फुटबॉलची मॅच रंगते तेव्हा...

महायुद्धात शत्रूंमध्ये फुटबॉलची मॅच रंगते तेव्हा...

युद्धाचेही काही नियम असतात. पूर्वी ते प्रकर्षानं पाळले जात. उदाहरणार्थ,  सूर्यास्तानंतर युद्ध थांबवलं जावं. युद्धात सर्वसामान्य, निष्पाप माणसं मारली जाता कामा नयेत. युद्धकैदी, महिला, जखमी, आजारी व्यक्ती, मुलं यांना कोणताही त्रास दिला जाऊ नये. शस्त्रसंधी झाल्यावर, एखाद्यानं शरणागती पत्करल्यावर, आपली शस्त्रं खाली ठेवल्यावर त्याच्यावर वार केला जाऊ नये.. विशेषत: सणासुदीच्या काळात तात्पुरत्या काळापुरती स्वयंघोषित युद्धबंदी केली जावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना निदान त्या काळापुरते का होईना सण साजरे करता यावेत..

पण यातलं आता काय पाळलं जातं?
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दिवसेंदिवस ते धुमसतं आहे. सगळं जग नाताळचा सण साजरा करीत असताना रशियानं नेमक्या याच दिवशी ७८ क्षेपणास्त्रं आणि १०६ ड्रोन्सच्या साहाय्यानं युक्रेनवर जोरदार हल्ला केला. यात काही निष्पाप नागरिक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले..

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी याबद्दल रशियाची आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची कठोर निंदा केली. जेलेन्स्की म्हणाले, पुतीन यांच्यासारखा निर्दयी, हृदयशून्य, क्रूर माणूस मी आजवर पाहिलेला नाही. रशिया आणि युक्रेनचे नागरिक युद्धानं आधीच जर्जर झालेले असताना, निदान ख्रिसमससारख्या सणाच्या दिवशी तरी हल्ला होणार नाही, अशी त्यांची अपेक्षा होती, पण कुठलेही संकेत, विधिनिषेध न पाळता या दिवशीही पुतीन यांनी निरपराध नागरिकांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला. जगातील इतर देशांनी आणि नागरिकांनीही यावरून पुतीन यांची निंदा केली.

सध्या याच कारणावरून सोशल मीडियाचे रकानेही भरले जात आहेत आणि अगदी पहिल्या महायुद्धातही शत्रू राष्ट्रांनीही नाताळच्या दिवशी युद्ध थांबवलं होतं, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मैत्रीचा, विश्वशांतीचा संदेश दिला होता आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा युद्ध सुरू केलं होतं, याचे दाखले दिले जात आहेत. 

काय झालं होतं पहिल्या महायुद्धात?
१९१४ ते १९१८ या काळात चाललेल्या या युद्धात एका बाजूला होते जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया यासारखे देश, तर दुसऱ्या बाजूला होते फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम, आयर्लंड.. इत्यादी देश. युद्ध सुरू होऊन पाच महिने झाले होते. इतिहासकारांचं म्हणणं आहे, १९१४ला महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर नाताळाच्या आदल्या दिवशी, आधी पुढाकार घेतला तो जर्मन सैनिकांनी. त्या दिवशी संध्याकाळी जर्मन सैनिकांनी गाणी गायला सुरुवात केली. हे पाहून ब्रिटिश सैनिकही गाणी गाऊ लागले. थोड्याच वेळात एक वेगळाच माहोल तिथे तयार झाला आणि जर्मन व ब्रिटिश सैनिकांनी आपापल्या भाषेत नाताळाची गाणी गायला सुरुवात केली. क्षणार्धात युद्धाचं वातावरण निवळलं आणि एक वेगळीच मित्रत्वाची भावना या शत्रू राष्ट्रांच्या सैनिकांच्या मनात उत्पन्न झाली. या सणाच्या काळात तरी कोणीही घातपात करू नये, आनंदानं दिवस घालवावा, असं साऱ्याच सैनिकांना वाटायला लागलं. 

दुसऱ्या दिवशी नाताळच्या सकाळीही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्येही हीच भावना होती. जर्मनीचे सैनिक आपापल्या बॅरॅकमधून बाहेर पडले आणि त्यांनी ब्रिटिश सैनिकांना ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरी त्यांनी एकमेकांच्या गळाभेटीही घेतल्या.  

यासंदर्भातला आणखी एक हृदयस्पर्शी प्रसंग काही इतिहासकार सांगतात.. २५ डिसेंबर १९१४च्या सकाळी जर्मनीच्या बाजूनं अचानक एक फलक दिसायला लागला. त्यावर लिहिलं होतं, ‘(आज सण आहे, निदान आज तुम्ही आमच्यावर गोळी चालवू नका, आमच्या बाजूनंही एकही गोळी तुमच्या दिशेनं येणार नाही!’ या फलकानं जादू केली. दोन्ही बाजूंचे सैनिक बाहेर पडले. विरुद्ध बाजूच्या बऱ्याच सैनिकांनी एकमेकांना सिगारेट आदानप्रदान केल्या, आपापल्या टोप्या शत्रू सैनिकांना भेट म्हणून दिल्या, एकत्र जेवण केलं. ‘नो मॅन्स लँड’ क्षेत्रावर ज्या सैनिकांचे मृतदेह पडले होते, त्यांच्याप्रति आदर दाखवत शत्रू राष्ट्रांच्या सैनिकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले! इतकंच नाही, ‘नो मॅन्स लँड’ क्षेत्रावर दोन्ही बाजूच्या सैनिकांनी  अनेक टीम बनवून ‘फ्रेंडली’ फुटबॉल मॅचेसही खेळल्या. अर्थातच, हा युद्धविराम सगळ्याच ठिकाणी घडला नाही. 

ब्रिटिश सैनिकाची दाढी-कटिंग! 
आणखी एक किस्सा. जेव्हा जर्मनी आणि ब्रिटन यांच्यात युद्ध सुरू नव्हतं, त्या काळात एक ब्रिटिश सैनिक जर्मनीच्या एका न्हाव्याकडून नियमितपणे दाढी-कटिंग करवून घ्यायचा. युद्धकाळात हे शक्य नव्हतं, पण नाताळाच्या दिवशी तात्पुरता युद्धविराम होताच त्यानं आपल्या या ‘मित्राला’ लगेच बोलवून घेतलं आणि त्याच्याकडून दाढी-कटिंग करवून घेतली! दोन्ही देशांच्या सैनिकांनी नाताळ असा उत्साहात साजरा केला. दोन्ही बाजूच्या कोणत्याच सैनिकानं एकमेकांवर ना गोळी चालवली, ना आक्रमण केलं!

Web Title: When a football match takes place between enemies during World War...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.