गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार?

By सचिन जवळकोटे | Updated: February 8, 2025 08:09 IST2025-02-08T08:08:41+5:302025-02-08T08:09:44+5:30

Monalisa Mahakumbh: सोशल मीडियाला दररोज नवं भक्ष्य शोधण्याची चटक लागलीय. कालची स्टेशन सिंगर राणू मंडलच्या जागी आज निळ्या डोळ्यांची मोनालिसा; उद्या कुणी तिसरीच.

What will happen to the 'Mona Lisa' on the banks of the Ganges? | गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार?

गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार?

-सचिन जवळकोटे (कार्यकारी संपादक, लोकमत, सोलापूर)
बॉलिवूडमध्ये निळ्या डोळ्यांच्या नायिका तशा अनेक; मात्र सर्वाधिक लक्षात राहिलेल्या दोघीच. मंदाकिनी अन् ऐश्वर्या; परंतु या दोघींच्याही लोकप्रियतेला मागे टाकलं गंगा किनाऱ्यावरच्या मोनालिसानं, तेही अवघ्या आठ दिवसांत. खरं नाव मोनी भोसले. मूळ इंदूरची. रस्त्यावर फिरून रुद्राक्ष अन् गळ्यातल्या माळा विकणारी. दिवसभर चार-पाच माळा विकल्या तरच रात्री चूल पेटण्याची शाश्वती. मात्र, सोशल मीडियानं एका रात्रीत तिच्या गळ्यात 'व्हायरल पॉप्युलॅरिटी'ची भलीमोठी माळ घातली.

यंदाच्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या बरोबरीनं या मोनालिसाचेच व्हिडीओ व्हायरल झाले. कुठल्या तरी लोकल चॅनलवाल्यानं तिची सहज म्हणून मुलाखत घेतली अन् ती पाहता-पाहता लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली. तिचे डोळे निळे, म्हणून मीडियानं मोनीऐवजी तिला नाव दिलं मोनालिसा. लिओनार्दो द विंचीच्या अजरामर 'मोनालिसा'सोबत या तरुणीची तुलना केली गेली. 'ब्लॅक ब्यूटी' शब्द जगाला ठाऊक होता; मोनालिसाने 'ब्राऊन ब्यूटी' हा शब्दही फेमस करून टाकला.

तिच्या प्रत्येक व्हिडीओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय, हे लक्षात येताच प्रयागराजमधल्या तिच्या राहुटीजवळ 'डिजिटल इन्फ्लुएन्सर'ची रांग लागली. तिच्यासोबत सेल्फी काढण्यापेक्षाही तिला वेगवेगळ्या विषयांवर बोलतं करण्याची अहमहमिका सुरू झाली. सुरुवातीला लाजत-बावरत हळूच उत्तरं देणारी मोनालिसाही अवघ्या तीन-चार दिवसांत कॅमेऱ्यांना सरावली. आपण काहीही बोललो तरी तत्काळ व्हायरल होतो, हे लक्षात येताच तिच्या देहबोलीत सराईतपणा येऊ लागला.

सुरुवातीला तिच्या घरच्यांनाही गंमत वाटली. गमतीचं रूपांतर हळूहळू कौतुकात झालं. अशातच एका दिग्दर्शकानं तिला एका चित्रपटात नायिकेचीही भूमिका देऊ केली. काही ब्यूटिशियन्सनी तिचं रूप बदलवलं. एका रात्रीत तिचा 'मेकओव्हर' झाला; मात्र तिचा हा 'अवतार' बऱ्याच फॉलोअर्सना आवडला नाही. सावळ्या रंगातलं अन् निळ्या डोळ्यांतलं तिचं अस्सल गावरान सौंदर्यच म्हणे लोकांना हवं होतं.

लग्नाच्या स्टेजवर कधी-कधी नवरीपेक्षा करवलीच अधिक उठून दिसते, तसं इथंही तिच्या दोन बहिणीच भाव खाऊन जाऊ लागल्या. एकेक व्हिडीओला तीन-चार कोटींचे व्ह्यूज मिळू लागले. आपण एका रात्रीत स्टार बनलोत, याची पुरेपूर जाणीव झालेली मोनालिसा मग स्वतः ही रील्स बनवू लागली. हे इतकं होताहोता कुटुंबाच्या पोटात खड्डा पडायला लागला. घरचे भानावर आले. तिचा व्हिडीओ काढणाऱ्याला दहा हजार लाइक्स मिळाले तरी तिचे दहा रुपयांचे साधे मणीही कुणी विकत घेईना. केवळ 'व्हायरल व्हिडीओं'नी पोट भरत नाही, हा साक्षात्कार तिच्या भावंडांना झाला.

पोटासाठी रस्त्यावर भटकणाऱ्या मंडळींनाही 'व्यक्तिगत खासगीपण' असतं, याची कडवट जाणीव झालेल्या कुटुंबानं तिच्या तोंडावर कापड टाकून तिला तिथून हलवलं. अख्खं कुटुंब मूळ गावी परतलं. तिचं रोजचं नवं दर्शन होईनासं झालं तरी जुनेच व्हिडीओ फिरवून-फिरवून नवे केले जाऊ लागले. हे कमी पडलं की काय म्हणून एआयची मदत घेऊन तिचे शेकडो व्हिडीओ बनवले गेले. तिच्या नावानं तयार झालेल्या कैक फेक अकाउंट्सना लाखो फॉलोअर्स मिळाले. तिला बॉलिवूडच्या एका सिनेमाची ऑफर आलीय आणि राजकुमार रावचा भाऊ तिचा 'हिरो' असणार आहे, अशीही बातमी आली. तिचं खरे-खोटेपण काही दिवसात कळेलचा

आता उत्सुकता एवढीच की, या कहाणीचा शेवट काय? मोनालिसाचाही राणू मंडल होणार का? कारण एका रात्रीत झपाट्यानं व्हायरल झालेली अनेक मंडळी नंतर कोनाड्यातल्या पालापाचोळ्यासारखी अडगळीत पडतात, हा आजपर्यंतचा इतिहास. खरं तर हा विषय मोनालिसा किंवा राणूचा नाही. दररोज व्हायरल होण्यासाठी नवं सावज हुडकणाऱ्या डिजिटल क्रिएटर्सचा. जवळपास बारा वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या या सोशल मीडियाला दररोज नवं भक्ष्य शोधण्याची चटक लागलीय. कालची स्टेशन सिंगर राणू मंडलच्या जागी आज निळ्या डोळ्यांची मोनालिसा; आणि उद्या कुणीतरी तिसरीच असते. चेहरे बदलत राहतात एवढंच!
sachin.javalkote@lokmat.com

Web Title: What will happen to the 'Mona Lisa' on the banks of the Ganges?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.