अहमदनगर महापालिकेत काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:00 AM2018-11-02T09:00:26+5:302018-11-02T09:00:40+5:30

भाजप नगरवर एकहाती सत्ता घेणार की सेना येथे भाजपला पुन्हा वरचढ ठरणार? ही मुख्य परीक्षा या निवडणुकीत आहे.

What will happen in Ahmednagar Municipal Corporation? | अहमदनगर महापालिकेत काय होणार?

अहमदनगर महापालिकेत काय होणार?

Next

- सुधीर लंके
नगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य व देशात आमचीच लाट आहे, असे सांगणारा भाजप नगरवर एकहाती सत्ता घेणार की सेना येथे भाजपला पुन्हा वरचढ ठरणार? ही मुख्य परीक्षा या निवडणुकीत आहे. देशात व राज्यात मोदींचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी व कॉंग्रेस येथे काही करिष्मा दाखविणार का? हेही ठरणार आहे. सांगली, जळगावनंतर आपण नगर महापालिकेत हॅट्रिक करू, या इर्षेने भाजपा या निवडणुकीकडे पाहत आहे, असे दिसते.

नगर शहराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की शहर राजकीयदृष्ट्या स्थिर नाही. येथे राजकारणात सातत्याने चढउतार झाले. राज्यात व देशात कॉंग्रेसचे वर्चस्व आणि नगरचा आमदार सेनेचा असे गणित कितीदा तरी दिसले. एका अर्थाने हे शहर राज्य व केंद्रात कोण आहे हे पाहत नाही. शहराचा मूड वेगळाच असतो. शहराने विधानसभा निवडणुकीत गतवेळचा अपवाद सोडता सलग २५ वर्षे शिवसेनेला निवडून दिले. मात्र, नगरपालिका व त्यानंतरच्या महापालिकेत सत्ता ही संमिश्र राहिली. आलटून, पालटून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांना महापौरपदाची संधी मिळाली. भाजपचा महापौर आजवर झाला नाही, पण उपमहापौर व तत्पूर्वी नगरपालिका असताना नगराध्यक्षपद मात्र त्यांना मिळाले. त्यामुळे सर्वांनी सत्ता उपभोगली आहे.
 

सेनेच्या काही नगरसेवकांची मदत घेऊन कॉंग्रेसचा महापौर झाला तर, सेनेने महापौर होण्यासाठी कधी दोन्ही कॉंग्रेसच्या असंतुष्टांची मदत घेतली. अशी आयात-निर्यात व राजकीय सोयरिक येथे सतत होत राहिली. त्यामुळे शहरावर कुठल्या एका पक्षाचे अथवा नेत्याचे वर्चस्व आहे ही परिस्थिती सध्या नाही. ‘हे शहर माझ्या ताब्यात आहे’ असा दावा एकही नेता व पक्ष छातीठोकपणे करू शकत नाही.
महापालिका निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे सर्वच पक्षांनी जोरबैठका काढण्यास सुरुवात केली आहे. पण, यावेळची परिस्थिती नेहमीपेक्षा जरा विचित्र आहे. भाजप, सेना यांचे स्वतंत्र प्रवेश सोहळे सुरू आहेत. आम्ही स्वतंत्र लढणार, अशी या पक्षांची आजपर्यंतची भूमिका आहे. आता एका प्रभागात चार उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारांनी काही प्रभागात चार जणांचे स्वतंत्र पॅनल जाहीर करुन प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली आहे. भाजप-सेना आजवर नगरपालिका व महापालिका निवडणुकीत कधीच स्वतंत्र लढलेले नाहीत. गत विधानसभेत त्यांची युती फिस्कटली. त्याचा फटका बसत दोघांचाही पराभव झाला व राष्ट्रवादीचा आमदार झाला. आता पुन्हा एकदा त्यांची स्वतंत्र लढण्याची भाषा आहे. स्वबळावर सत्ता आणण्याचे दोन्ही पक्षांचे स्वप्न आहे. त्यात ते इतके पुढे गेले आहेत की त्यांना मागे फिरणेही अवघड झाले आहे. या दोन्ही पक्षांनी इतक्या इच्छुकांना पक्षात प्रवेश दिला आहे की युती झाल्यावर या इच्छुकांचे काय करायचे ? हा मोठा प्रश्न या पक्षांसमोर राहील. युती झाली तर या नाराजांची बंडाळी माजेल, अशी स्थिती आहे. त्याचा फायदा दोन्ही कॉंग्रेस अलगदपणे उठविण्याचा प्रयत्न करेल.

युती करावी तरी नुकसान व स्वतंत्र लढले तर मतविभागणीचा फटका हा पेच या दोन्ही पक्षांसमोर आज दिसतो. त्या तुलनेत राष्ट्रवादी सावध पावले टाकत आहे. त्यांनी आपला काहीही अजेंडा जाहीर केलेला नाही. कॉंग्रेसला त्यांनी दरवाजे बंद केलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची आघाडी होऊ शकते. सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला प्रचंड आत्मविश्वास आहे. सांगली, जळगाव नंतर अहमदनगर असा त्यांचा अजेंडा दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात शिर्डीला आले होते. त्यावेळी त्यांनी आवर्जून नगरच्या उड्डाणपुलाला ५० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. सुपा व नगर औद्योगिक वसाहतीत काही प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी ते येणार आहेत. एकाअर्थाने त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकत नगर काबीज करण्याचे संकेत दिले आहेत. भाजप खासदार दिलीप गांधी हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतात. त्यांचे पालकमंत्री राम शिंदे यांची भूमिका अजून उघड झालेली नाही. पण, खासदारांचा मूड हा स्वबळाचा आहे.

माजी आमदार अनिल राठोड हेही सेनेची जमवाजमव करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी नुकताच नगर दौरा केला. त्यात त्यांनी मोदींना थेट देशद्रोही ठरविले. केडगाव येथील दोन शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण शिवसेनेने राज्यभर नेले. तेव्हाही ठाकरे येऊन गेले. या हत्याकांडात सेनेने राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन, तर एका भाजप आमदारावर गुन्हा दाखल झाला. या हत्याकांडाचा मतदार नेमका काय न्यायनिवाडा करणार? हे या निवडणुकीत ठरायचे आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत राहू शकतो. ‘सेनेने या हत्याकांडाचे राजकीय भांडवल केले’, असा अहवाल थेट पोलिसांनीच दिलेला असल्याने सेना अडचणीत सापडलेली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे केडगाव निवडणुकीनंतर प्रथमच परीक्षेला सामोरे जात आहेत. सेनेला धडा शिकविणे हा त्यांचा अजेंडा असू शकेल.

कॉंग्रेसचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे गत विधानसभेला शहरातून लढले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे सध्या खासदारकीची तयारी करत आहेत. या युवा नेत्यांची शहरात भूमिका काय? हाही मुद्दा कळीचा आहे. ते अजूनतरी सक्रिय दिसत नाहीत. तेच राधाकृष्ण विखे- बाळासाहेब थोरात या बड्या नेत्यांचे आहे. नगर शहराची सत्ता कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षांनी उपभोगली. पण, त्या तुलनेत शहर सुधारले नाही. सध्या सेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर आहे. केंद्रात व राज्यात या पक्षांची सत्ता असताना त्याचा शहराला फायदा झाला नाही. त्यामुळे पक्षांचे प्रचाराचे मुद्दे काय राहणार? व शहराला कोणती विकासाची स्वप्ने आता दाखवली जाणार? याबाबतही उत्सुकता आहे.
..........

नगर महापालिकेचे सध्याचे पक्षीय बलाबल
शिवसेना १८
भाजप ०९
राष्ट्रवादी २२
कॉंग्रेस ११
अपक्ष ०४
मनसे ०४
..............


(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)

Web Title: What will happen in Ahmednagar Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.