शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वाचनीय लेख - राज ठाकरेंच्या स्वबळाने काय साध्य होईल?

By यदू जोशी | Updated: December 2, 2022 05:58 IST

नेतृत्व आणि हेतूबद्दलच्या संशयांपासून मुक्तता हवी म्हणून राज यांनी स्वबळाची घोषणा केली; पण त्यांची वाट सोपी नाही!

यदु जोशी

मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने पुढची समीकरणे काय असतील याची चर्चा आता सुरू झाली आहे. ‘मी कोणासाठीही काम करत नाही, महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी काम करतो’, असे राज यांनी म्हटले आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’वाल्या त्यांच्या सभा कोणासाठी आणि कोणाविरुद्ध होत्या याची बरीच चर्चा झाली होती. आपले नेतृत्व आणि हेतूबद्दल घेतल्या जाणाऱ्या संशयांपासून मुक्तता हवी असल्याने राज यांनी खुलासा केला असावा. स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपशी चर्चा करून घेतलेला नाही, हेही त्यांना स्पष्ट करायचे असावे. 

स्वत:ची ताकद न ओळखणारा हा नेता आहे असे बरेचदा वाटत राहते. त्यातही सातत्याचा अभाव हा दोष आहेच. दमदार नेत्यामधील अशा उणिवांमुळे त्यांचे प्रेमीही हळहळत राहतात.  एखाद्या मोठ्या सभेने, दौऱ्याने तयार केलेले वातावरण टिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या नेटवर्कची कमतरता राज यांना उणे करत राहते. बाहेर यायचे; दोनचार डरकाळ्या फोडत राहायच्या आणि गुहेत परत जायचे... याने बाहेर आल्याच्या काळापुरती जरब राहते. जंगलाचा राजा पिंजऱ्यात  बसला तर लहान मुलेही त्याला खडा फेकून मारतात. राज यांचे कधीकधी तसे होते. आता त्यांनी स्वबळाची घोषणा केली आहे आणि त्यावर ते कायम राहतील, अशी आशा आहे. आधी घेतलेली भूमिका नंतर बदलल्याने कुणाच्याही विश्वासार्हतेवर  प्रश्नचिन्ह लागणारच. राज हे आधीचे दोष टाळून पुढे जाऊ पाहत असल्याचे गोरेगाव आणि कोल्हापूरमधील त्यांच्या भाषणांतून वाटले. भाजपने शिंदे सेनेला मुंबई महापालिकेत ८० जागा सोडाव्यात आणि शिंदे सेनेने त्यातील ३५ जागा मनसेला द्याव्यात, असा एक फॉर्म्युला मध्यंतरी समोर आला होता, तो खरेच भविष्यात अमलात आला तर मग राज यांनी आज केलेली स्वबळाची घोषणा भाजप- शिंदेसेनेवर दबावासाठी होती, असा त्याचा अर्थ होईल.  

- तूर्त स्वबळावर लढण्याच्या राज यांच्या घोषणेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे. त्याचा भाजपला फायदा होईल, असे तूर्त तरी दिसते. मराठी मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकते. कारण,  प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात राज यांच्या तुफानी भाषणांनी ते वातावरण नक्कीच तयार करतील. भाजप, शिवसेना, काँग्रेस या मुंबईतील तीन  प्रमुख पक्षांमधून राज यांच्यासमोर मनसेच्या मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान असेल. मुंबईत स्वबळ आणि पुणे, ठाणे, नाशिकमध्ये अन्य कोणाशी युती अशी दुहेरी भूमिका घेतली तर पुन्हा एकदा भूमिकेवर  प्रश्नचिन्ह लागेल.  कोणाच्या आडोशाने ते गेले असते तर पैशापाण्याचा  प्रश्न तेवढा आला नसता; आता तोही समोर असेल. स्वबळाच्या दिशेने निघालेले राज यांची वाट खडतर आहे. 

राज्यपालांचे काय होणार? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच राज्यपाल पदावरून जातील, असे दिसते. छत्रपती शिवरायांचा आदर्श जुना झाला, असे विधान करून कोश्यारी यांनी ओढावून घेतलेल्या तीव्र नाराजीची धग दिल्लीत पोहोचली आहे. ‘कोश्यारी यांची चूक झाली; पण त्यांना राज्यपाल म्हणून पदावर ठेवायचे की नाही हा अधिकार आमचा (राज्य सरकारचा) नाही. ज्यांना तो अधिकार आहे ते ठरवतील’, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चेंडू केंद्र सरकार व राष्ट्रपतींच्या कोर्टात टाकला आहे. 

फडणवीस यांनीही तसा अंगुलीनिर्देश केला होताच. कोश्यारींबाबत राज्यातील नेतृत्वाने केंद्राकडे काहीएक भावना बोलून दाखवल्याची माहिती आहे.  कोश्यारी यांना केव्हाच उत्तराखंडमध्ये जायचे होते. त्यांनी तशी इच्छा वरचेवर बोलूनही दाखविली आहे. आता या निमित्ताने गेले तर बहुतेक स्वत: त्यांनाही हवेच असेल. कोश्यारींना हटविण्याची मागणी करणारे काही चेहरे बघितले की चावी कुठून फिरली असावी, याचा अंदाज येतो.  विरोधकांच्या मागणीमुळे राज्यपालांना जावे लागले, असे चित्र दिसू नये म्हणून कदाचित काही वेळ थांबून मग निर्णय करतील. सरकार बदलले तरी सरकारला अडचणीत आणलेली विधाने राज्यपाल करीत आहेत. त्यांच्या भूमिकेत सातत्य आहे, सरकार बदलले त्याला ते काय करणार? कोश्यारी गेले तर विरोधी पक्षांनी आनंदून जाण्याचे काही कारण नाही. एक गेले तर दुसरे आणखी कडक कोश्यारी येतील. कारण, केंद्रात सरकार भाजपचे आहे.  एक मात्र नक्की की राजभवनाची दारे सामान्यांसाठी खुली ठेवणारे लोकराज्यपाल म्हणून कोश्यारींचे योगदान नेहमीच लक्षात राहील. 

सुषमा अंधारेंचे वाढते महत्त्व सुषमा अंधारे या शिवसेनेतील नव्या फायरब्रँड नेत्या आहेत. सुषमाताईंच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत. त्यांना अधिक प्रोजेक्ट केले जात आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे अस्वस्थ असल्याची चर्चा मध्यंतरी होती. नीलमताई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्या तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. बातमीही पसरली. त्यामागे नीलमताईंचे हितचिंतक होते की त्यांचे हित झाल्यास चिंता वाटणारे होते, माहिती नाही. नीलमताईंनी इतक्या वर्षांच्या मेहनतीने  स्वत:ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे; पण पक्षाला कधीकधी नवीन प्रयोग करावेसे वाटतात. भाकरी कधीकधी फिरवली जाते. - चित्रा वाघही फायरब्रँड  आहेत, त्यांना भाजप महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिल्याने काहींची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणElectionनिवडणूक