-विशाखा पाटील, बहारीनस्थित ख्यातनाम लेखिका
पश्चिम आशिया किंवा अरब जग (मिडल इस्ट) म्हणजे अशांत आणि अस्थिर परिसर, असा आपला एक सर्वसाधारण समज आहे. अरब जग हे उत्तर आफ्रिकेपासून आखाती देशापर्यंत आहे. आखाती देश हा त्यातला एक भाग. हे देश इतरांपेक्षा वेगळे असण्याची मुख्य कारणं तीन - बहुतांश देश तेलसमृद्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक राहतात आणि अलीकडे हे देश पर्यटन, तंत्रज्ञान, गुंतवणूक याला महत्त्व देत आहेत. इथल्या जनजीवनात स्थैर्य आणि शिस्त याला महत्त्व आहे. व्यवस्थेचा धाक आणि कायद्याचा आब हे इथे नियमित पाहायला मिळतं.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षात या देशांवर हल्ले झाल्याने ते चर्चेत आले आहेत. अशा संघर्ष काळात व्यवस्थेकडून उचलली जाणारी पावलं सर्वसामान्य नागरिकांना, पर्यटकांना आणि कामानिमित्त इथे स्थायिक झालेल्या लोकांना धीर देणारी, सुरक्षेबाबतचा दिलासा देणारी आहेत. गेली अनेक वर्षे मी बहारीनमध्ये राहते. संघर्ष सुरू झाला, त्यादरम्यान मी दुबईला आले होते आणि सध्या दुबईमध्येच आहे. अशा युद्धजन्य काळात चिंता, भीती, काळजीचं प्राबल्य असतं. अडकलेल्या पर्यटकांची, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने तातडीने पावलं उचलली. परिस्थिती सामान्य होईपर्यंत इथे निश्चिंत मनाने राहता यावं, यासाठी निर्णय घेतले. अडचणीत सापडलेल्यांची लूट होऊ नये, याची काळजी घेतली.
तेल हा या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचा समज चुकीचा नसला, तरी या देशांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात पर्यटनाचा मोठा हातभार आहे. जगभरातून आलेले पर्यटक मायदेशापासून दूर युद्धाच्या छायेत अडकतात, तेव्हाच ‘आदरातिथ्या’ला महत्त्व द्यायला हवं, हे ओळखून पावलं उचलण्यात आली. आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळली जाते, यावर संबंधित देशाची प्रतिमा तयार होते. त्यादृष्टीने पाहिलं, तर धीरोदात्तपणाचा एक कौतुकास्पद आदर्श इथल्या सरकारने घालून दिला आहे. इथल्या मेट्रो सुरू आहेत. रस्त्यांवर टॅक्सी धावत आहेत, मॉल्स आणि इतर सगळी महत्त्वाची ठिकाणं सुरू आहेत. यूएईच्या शासकांनी इथल्या दुबई मॉलला भेट दिली. तिथल्या सामान्य नागरिकांना त्यांनी धीर दिला. त्यातून लोकांमध्ये सकारात्मक संदेश गेला. मी जिथे राहते तो बहारिन हा भौगोलिकदृष्ट्या इराणच्या अधिक जवळचा देश आहे. तिथल्या माझ्या मित्रमंडळींमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये भीती होती. पण, सरकारकडून आवश्यक अलर्ट्स जारी करणं, लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांना योग्य माहिती योग्य पद्धतीने पुरवणं, याबाबतीत व्यवस्था व्यवस्थित काम करत आहे. शिस्त आणि कायद्याचा धाक हा इथल्या व्यवस्थेच्या मुळाशी आहे.
अशा परिस्थितीत काय उपाययोजना करायच्या हे सरकारने अधिकृतपणे कळवलं, तर नागरिक सहकार्य करतात. या देशांमध्ये नियमांचं उल्लंघन कुणी करत नाही. तसं केल्यास आकारला जाणारा दंड कमावलेलं सगळं गमवावं लागेल एवढा जबर असतो. लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे देश लहान आहेत. त्यामुळे ‘त्यांना न जमायला काय झालं?’ असा एक सूर आपल्याकडे दिसतो. पण, इथली व्यवस्था अशी असण्यात इथल्या नागरिकांचा ‘सिव्हिक सेन्स’ही हातभार लावतो. देशातले कायदे फक्त कागदावर राहिले नाहीत, तर दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्या दूर होतात, हे या देशांकडे पाहिल्यावर लक्षात येतं. arabjag@gmail.com
Web Summary : Despite regional unrest, Dubai remains stable, with government reassurance and continued normalcy. Tourism thrives; authorities prioritize safety and support for stranded tourists. Efficient governance and public cooperation ensure order.
Web Summary : क्षेत्रीय अशांति के बावजूद, दुबई स्थिर है, सरकार की ओर से आश्वासन और निरंतर सामान्य स्थिति है। पर्यटन फलफूल रहा है; अधिकारी फंसे हुए पर्यटकों की सुरक्षा और सहायता को प्राथमिकता देते हैं। कुशल शासन और सार्वजनिक सहयोग व्यवस्था सुनिश्चित करते हैं।