‘या’ चित्रांमध्ये इतकं ‘अविस्मरणीय’ असं नेमकं काय असतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 05:01 IST2026-01-10T05:00:14+5:302026-01-10T05:01:01+5:30
समकालीन संदर्भात महत्त्वाच्या, कलाप्रवाहांची दिशा बदलून टाकणाऱ्या ‘क्लासिक’ चित्रांतल्या अद्भुत रहस्याचा शोध घेणारी साप्ताहिक लेखमाला

‘या’ चित्रांमध्ये इतकं ‘अविस्मरणीय’ असं नेमकं काय असतं?
शर्मिला फडके, ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका
दिवसाकाठी नेमकी किती चित्रं तुमच्या डोळ्यांखालून जातात? - आठवून बघा.. ठीक आहे, दिवस नको, आठवडा, महिन्याभरात, आजवरच्या आयुष्यात किती चित्रं तुम्ही पाहिलेली असतात?
भलेही तुम्ही चित्रकार किंवा चित्रकलेशी संबंधित कोणी नसाल, तरी चित्रं कुठे ना कुठे दिसतातच. काही चित्रं आपण पाहतो, काही चित्रं आपल्याला पाहतात. मोबाईलच्या स्क्रीनवर, भिंतीवरच्या कॅलेंडरवर, रेस्टॉरंट, एअरपोर्टच्या लोंबीत, मासिकाच्या मुखपृष्ठावर, ऑफिसच्या इंटेरियरमध्ये, तुमच्यापैकी काही दुर्मिळ म्युझियम किंवा चित्र प्रदर्शनाला जाणारेही असूच शकतात.
तर मग आता, डोळे मिटा आणि आठवा. त्यापैकी कोणतं चित्र तुमच्या नजरेसमोर येतं?
शक्यता अशी आहे, की तुमच्या डोळ्यांपुढे तेच चित्र येईल जे अनेकदा तुमच्या नजरेसमोर येऊन गेलेले आहे. नेमकं कुठे, किती वेळा पाहिलं आपण; हे तुमच्या नेणीवेतही नसेल. पण मेंदूवर त्याची प्रतिमा मात्र अत्यंत ठळक उमटलेली असेल, हे नक्की. चित्रकाराचं नाव माहीत असेल-नसेल, कला- इतिहासात त्या चित्राचं काही महत्त्व असेल-नसेल, पण ते चित्र तुम्हाला माहीत असतं. अशी काही ठराविक चित्रं जगभरातल्या लोकांना चिरपरिचित असतात.
म्युझियममध्ये ज्या चित्रांसमोर सेल्फी घेण्याकरता अलोट गर्दी होते, स्क्रीनवर ही चित्रं समोर आली तर पुढे स्क्रोल न करता थांबतो, अशी ही चित्रं. व्हॅन गॉगची पिवळीजर्द सूर्यफुलं, निळीभोर स्टारी नाईट, रवीवर्माची लक्ष्मी-सरस्वती, दमयंती, लिओनार्दची मोनालीसा, एडवर्द मुंकचं भीषण ‘स्क्रीम’, मोनेची पाण्यात डुलणारी आल्हाददायक कमळं, हुसेनचे बळकट घोडे, व्हरमिरची कानात मोत्याचे डूल घातलेली मुलगी.. अशी खूप चित्रं, मनावर कायमचा ठसा उमटवलेली...
नेमकं काय असतं या चित्रांमध्ये की ती इतकी लोकप्रिय असतात?... चित्रकलेशी संबंध नसणाऱ्यांनाही ओळखीची वाटतात? चित्रकलेच्या जाणकारांनी त्यावर अगणित लेख, पुस्तकं लिहून ठेवलेली असतात, ती चित्रं महागडी, दुर्मिळ असतात. आंतरराष्ट्रीय लिलावात त्या चित्रांना करोडोंची बोली लागत असते, चित्रकारांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी त्याच्या नकला गिरवलेल्या असतात, रसिकांच्या घरातल्या भिंतींवर या चित्रांच्या प्रिंट्स टांगलेल्या असतात. अशी चित्रं, ज्यांच्याबद्दलचं कुतूहल मनात सदैव ताजं असतं.. असं काय युनिक, काय खास असतं या चित्रांमध्ये? ती इतकी लोकप्रिय होण्यामागे काही ना काही कारण निश्चित असणार आहे, नाही का?
ते कारण कदाचित चित्रात दडलेली गोष्ट असेल, रंगाची निवड असेल, मन आनंदी, शांत किंवा अस्वस्थ करणारं, विचारात पाडणारं असं काहीतरी त्यात असू शकेल. चित्र मौल्यवान असू शकेल, वादग्रस्त असू शकेल, चित्रकाराची गोष्ट तुम्हाला भन्नाट किंवा करुण वाटलेली असू शकेल.
ही चित्रं फक्त लोकप्रिय, गाजलेली नसतात, ती ‘क्लासिक’ असतात. समकालीन संदर्भातूनही महत्त्वाची ठरलेली चित्रं, विशिष्ट कला चळवळीचा ‘चेहेरा’ ठरलेली चित्रं, कलेची दिशा बदलून टाकणारी चित्रं.. हा कॉलम अशा चित्रांच्या आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न आहे. कला-इतिहासाचे माइलस्टोन ठरलेल्या, सर्वपरिचित चित्रांकडे नव्यानं पाहायला लावणारा, रंग-रचनांच्या आड दडलेली अस्वस्थता, सौंदर्य, प्रश्न, कलाकाराचं आयुष्य, अर्थपूर्ण अस्तित्व.. अजूनही काही आहे जे शोधायला हवं आहे, ते धुंडाळण्याचा हा प्रयत्न आहे. दर आठवड्याला एक चित्र, एक कथा, आणि एक नवा दृष्टिकोन..
sharmilaphadke@gmail.com