समाजमाध्यमांवरील अनामिक दहशतवाद्यांचे काय? त्यांचा बीमोड कसा करणार?
By नंदकिशोर पाटील | Updated: April 29, 2025 15:57 IST2025-04-29T15:56:32+5:302025-04-29T15:57:38+5:30
एकीकडे देशावर हल्ला झाला असताना, दुसरीकडे समाजमाध्यमांवर काहीजण धर्माच्या नावावर देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरींवर, मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याची भाषा करून आपण काय साध्य करू इच्छित आहोत?

समाजमाध्यमांवरील अनामिक दहशतवाद्यांचे काय? त्यांचा बीमोड कसा करणार?
जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगामच्या बैसरण खोऱ्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या लोकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून २६ निष्पापांचे बळी घेतले. २२ एप्रिल २०२५ हा दिवस देशाच्या हृदयात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. जेथे पर्यटक शांततेचा श्वास घेण्यासाठी येतात, तिथे रक्ताने माती लाल झाली. या हल्ल्यानंतर समाजमाध्यमांवर शोक आणि संतापाची लाट उसळली. हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचे समोर आले. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यामागे दहशतवादी आणि त्यांच्या मोहरक्यांचा कुहेतू स्पष्ट दिसतो. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून भारतात धार्मिक दंगली घडाव्यात असे कदाचित त्यांना अपेक्षित असावे. या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनास आळा बसावा, काश्मिरी लोकांची उपासमार होऊन त्यांच्यामध्ये भारताबद्दल द्वेष निर्माण व्हावा, असाही त्यांचा अजेंडा असू शकतो. या दशतवाद्यांचा बीमोड कसा करायचा आणि त्यातून पाकिस्तानला कशी अद्दल घडवायची हे केंद्र सरकारला चांगले ठावूक आहे. राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कदाचित मोठी लष्करी कारवाईदेखील होऊ शकते. सरकार आणि सैन्य दलं त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे; पण दुर्दैवाने चित्र उलटे आहे. या दु:खद घटनेनंतर समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया पाहता, हा केवळ दहशतवाद्यांचा हल्ला नव्हता, तर समाजमाध्यमांतील अफवांचा, द्वेषाचा आणि सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या वृत्तींचाही एक प्रकारचा आभासी हल्ला होता.
एकीकडे देशावर हल्ला झाला असताना, दुसरीकडे समाजमाध्यमांवर काहीजण धर्माच्या नावावर देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरींवर, मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याची भाषा करून आपण काय साध्य करू इच्छित आहोत? जम्मू-काश्मीर हे भारतभूवरील नंदनवन आहे. तिथे राहाणारे लोक तुमच्या-आमच्यासारखे भारताचे नागरिक आहेत. हल्लेखोरांनी केलेल्या नृशंस कृत्याने आपण जेवढे संतप्त आहोत, तितकाच संताप काश्मिरींमध्येही आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्याकांड घडविले. मात्र, पहलगाममधील नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. अडलेल्या पर्यटकांच्या राहण्या-खाण्याची सोय केली. स्वत:च्या घरात आश्रय दिला. काश्मीरमधील संतप्त नागरिक रस्त्यांवर उतरले. पाकिस्तानच्या विरोधात कॅन्डल मार्च काढले. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. मात्र, त्यांच्या देशभक्ती आणि माणुसकीबद्दल शंका व्यक्त करण्यात आली. ज्या घोडेस्वाराने दहशतवाद्यांशी मुकाबला करताना स्वत:चा प्राण गमावला, इतरांचे प्राण वाचविले, त्यांनाच दहशतवादी ठरविले गेले!
समाजमाध्यमे ही लोकशाहीतील अभिव्यक्तीची महत्त्वाची माध्यमं आहेत; परंतु हल्ली हीच माध्यमं द्वेष आणि फूट पसरविण्याचे साधन बनली आहेत. अल्गोरिदममुळे भावनिक, भडक सामग्री जास्त ‘व्हायरल’ होत असून, सामाजातील विवेकी आणि संतुलित विचार मागे पडत चालला आहे. अनेक जण आपल्या ओळखी लपवून असभ्य, भडकाऊ आणि खोट्या गोष्टी पसरवत आहेत. हल्ली तर आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करून फेक व्हिडीओ, खोटी माहिती पसरविली जात आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर तर अशा प्रकारच्या खोट्या माहितीचा महापूर आला आहे. समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टना बळी पडायचे नसेल तर त्याच्या वापराबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे. ‘काहीही वाचा; पण विचार करूनच शेअर करा’ हे पथ्य प्रत्येकाने पाळण्याची गरज आहे. मात्र, काहींचे हेतू निराळेच असतात. त्यांच्या डोळ्यांवर रंगीबेरंगी धर्मांध चष्मे असतात. त्याच रंगातून ते जगाकडे पाहतात. दहशतवादी हल्ल्यांचा उद्देशच समाजात भीती, अस्थिरता आणि फूट पाडणे हा असतो. आपण त्यास बळी पडता कामा नये. दहशतवाद्यांचा पराभव फक्त बंदुकीने नव्हे, तर एकजुटीने आणि विवेकानेदेखील होऊ शकतो. खऱ्या दहशतवाद्यांना चेहरा असतो. त्यांना कंठस्नान घालता येते. आजवर अनेकांचा असाच ‘बंदोबस्त’ केला गेला आहे; पण समाजमाध्यमांवरील अनामिक दहशतवाद्यांचे काय? त्यांचा बीमोड कसा करणार?