पाणथळ जागा, स्थलांतरित पक्षी आणि त्याचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 04:04 AM2019-11-19T04:04:10+5:302019-11-19T04:04:43+5:30

पक्षी स्थलांतर ही पक्षी जगतातील अत्यंत अद्भुत व अनोखी अशी बाब आहे. फार पुरातन काळापासून या स्थलांतराबाबत विविध मते मांडली जात आहेत.

Wetlands migratory birds and their study | पाणथळ जागा, स्थलांतरित पक्षी आणि त्याचा अभ्यास

पाणथळ जागा, स्थलांतरित पक्षी आणि त्याचा अभ्यास

googlenewsNext

- संजय करकरे, सहायक संचालक, बीएनएचएस

पक्षी स्थलांतर ही पक्षी जगतातील अत्यंत अद्भुत व अनोखी अशी बाब आहे. फार पुरातन काळापासून या स्थलांतराबाबत विविध मते मांडली जात आहेत. आर्क्टिक परिसराचा अथवा भारताचा विचार केला तर हिमालयात हिवाळा सुरू झाला की, लाखो पक्षी दक्षिणेकडे म्हणजेच उबदार प्रदेशाकडे आपोआप वाटचाल करायला लागतात. यासाठी हे पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करतात.



या पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्याची सर्वांत सोपी व कमी खर्चीक पद्धत म्हणजे या पक्ष्यांच्या पायात कडी घालायची. आपल्या देशात सर्वप्रथम हे काम पर्यावरण क्षेत्रात अग्रणी अशा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) सुरू केले. १९२७ च्या सुमारास सुरू झालेले हे काम गेली नऊ दशके अव्याहतपणे सुरू आहे. आजतागायत बीएनएचएसने सुमारे सात लाखांहून अधिक पक्ष्यांच्या पायात कडी अडकवली आहे. हे कडी अडकवलेले पक्षी नंतर २९ देशांत सापडले. या अभ्यासामुळे पक्षी कोठून कोठे स्थलांतर करतात, त्यांचे मार्ग कुठले, इतका दूरचा प्रवास ते कसा करतात? यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींचे खुलासे झाले आहेत. या अभ्यासाद्वारे पक्ष्यांच्या स्थलांतराचा उड्डाण मार्ग (फ्लाय वे) कळला आहे. रशिया ते भारतीय उपखंडापर्यंतचा मध्य आशियाई उड्डाण मार्ग (सेंट्रल एशियन फ्लायवे-सीएफ) अधोरेखित झाला आहे. जगभरात विविध असे ९ उड्डाण मार्ग असून, आपल्या परिसरात येणारे ९० टक्के पक्षी मध्य आशियाई उड्डाण मार्गासह तीन मार्गांचा अवलंब करतात. या मार्गावर येणारे पक्ष्यांचे थांबे हे तळी, नद्या, सरोवरे, दोन स्थळांतील अंतर, तसेच पक्ष्यांच्या विणीच्या जागाही समजल्या आहेत. या शास्त्रीय माहितीचा उपयोग पक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. बीएनएचएसने ९० वर्षांच्या अभ्यासावर प्रसिद्ध केलेले ‘इंडियन बर्ड मायग्रेशन अ‍ॅटलस’ हे पुस्तक बघितले तर या पक्ष्यांच्या अद्भुत अशा स्थलांतर व संवर्धनाचे महत्त्व समजून येईल. जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे पक्षी शास्त्रातील या विषयाचे परिमाणही बदलले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने सॅटेलाईट टेलिमेट्रीने पक्ष्यांची अधिक व अचूक माहिती, त्यांचे योग्य असे उड्डाण मार्ग, थांबे स्पष्ट होऊ लागले. आता या तंत्रज्ञानाचाच बीएनएचएस मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून, त्यातूनही अद्भुत अशी माहिती समोर येत आहे. हवामान बदलाचे फटके जसे माणसांना बसताहेत तसे निसर्गातील या घटकांनाही बसत आहेत. पक्ष्यांचा स्थलांतराचा मार्ग बदलत आहे. त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. पक्षी स्थलांतराचा पारंपरिक मार्ग बदलू लागले आहेत. यामुळे या परिणामांचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी पाणथळ जागांच्या संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. २०१८ मध्ये केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने २०१८ ते २०२३ अशा पाच वर्षांचा हा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तसेच त्यांच्या आधिवासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या आराखड्यात बीएनएचएसचे महत्त्वाचे योगदान आहे.



भारतीय उपखंडाचा विचार केला तर सुमारे ३७० जातींचे स्थलांतरित पक्षी तीन उड्डाण मार्गांचा वापर करून येथे येतात. त्यातील ३१० जातींचे पाणपक्षी, तर उर्वरित पक्षी जमिनीवरील विविध आधिवासांचा वापर करतात. यातील १८२ जातींचे पाणपक्षी मध्य आशियाई उड्डाण मार्गाचा अवलंब करतात. देशभरातील १७ राज्यांतील वीसहून अधिक पाणथळ जागांचा या कृती आराखड्यानुसार अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील जायकवाडी, गाणगापूर धरण व माळरान परिसर तसेच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील माहुल, शिवडी परिसर, अलिबाग, उरण व ठाणे खाडीतील पक्ष्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबरअखेर ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत अनेक देशांचे शास्त्रज्ञ यासंदर्भात आपले योगदान व विचार मांडणार आहेत.



ज्या जंगलात वाघ राहतात, ते जंगल समृद्ध समजले जाते. अगदी तसेच ज्या पाणथळ परिसरात पक्षी मोठ्या संख्येने राहतात तो परिसर समृद्ध मानला जातो. हा परिसर केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर माणसांसाठीही समृद्ध असतो. या परिसरात भरपूर पाणी आणि संपन्न शेती असते. मात्र अनधिकृत मासेमारी, गाळपेरा, पाण्याचा प्रचंड उपसा आणि प्रदूषणामुळे पाणथळीच्या जागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे निसर्गासाठी, निसर्गातील प्रत्येक घटकासाठी पक्ष्यांसह सर्वच घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Web Title: Wetlands migratory birds and their study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.