देवाला प्रसन्न करून घ्यायचंय? ऑनलाइन पैसे पाठवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:07 IST2026-03-21T09:07:25+5:302026-03-21T09:07:39+5:30

भाविकांची ‘डिजिटल’ लूट करणाऱ्या जाहिरातींचे ऑनलाइन जगात पेव फुटलेले आहे. या श्रद्धेच्या बाजारात तुम्हीही फसवले जात आहात का?

Want to please God Send money online | देवाला प्रसन्न करून घ्यायचंय? ऑनलाइन पैसे पाठवा!

देवाला प्रसन्न करून घ्यायचंय? ऑनलाइन पैसे पाठवा!

चंद्रकांत कित्तुरे, वृत्तसंपादक, ‘लोकमत’, कोल्हापूर -

‘तुमच्यावरील संकट दूर करायचं आहे?  देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे?- तर चला ऑनलाइन पैसे पाठवा आणि देवाला प्रसन्न करण्याचे विधी करून घ्या,’ असा एक नवा प्रघात हल्ली पडू लागला आहे. ‘अमुक देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अमुक विधी करा, तमुक अर्पण करा आणि निश्चिंत राहा. आम्ही तुम्हाला प्रसाद आणि आशीर्वाद स्वरूप भेट पाठवू,’ असे आवाहन करणाऱ्या जाहिराती समाजमाध्यमांमध्ये झळकू लागल्या आहेत. त्यातून भाविकांची लूट सुरू आहे. कारण यातील अनेक जाहिराती फसव्या असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फक्त ३५१ रुपये भरा आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साडी अर्पण करा, ११ हजार रुपये भरा, देवीचा प्रसाद, हळदी-कुंकू मिळवा.’ अशी ‘एआय’च्या आधारे तयार केलेली एक जाहिरात  समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ‘यजमान डॉट काॅम’ अशी वेबसाइटही त्यासाठी देण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेतली आणि अशी कोणतीही जाहिरात देवस्थानने अथवा श्रीपूजकांनी केलेली नाही, भाविकांनी अशा फसव्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन केले. 

कोल्हापूरची अंबाबाई कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूसह देशभरातून भाविक तिच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात. या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्यासाठी अशा जाहिराती केल्या जातात आणि भाविकांची लूट केली जाते. वरील जाहिरातीत दिलेल्या वेबसाइटवर पत्ता मध्य प्रदेशातील आहे. मध्य प्रदेशातून ते देवी अंबाबाईची पूजा कशी करणार, त्यांचे कुणी प्रतिनिधी आहेत का, असतील तर त्यांची नोंद देवस्थान समितीकडे का नाही, देवीच्या  श्रीपूजकांनाही त्यांच्याबद्दल काहीच कशी माहिती नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात.  

यापूर्वीही भाविकांची ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना घडल्या आहेत. तक्रारी येताच देवस्थान समितीने सायबर पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, फसवणूक करणारे काही सापडलेले नाहीत. कारण, तपास करताना संबंधित संकेतस्थळाचे लोकेशन कधी परदेशातले दिसते, तर कधी अन्य राज्यातील. काही भाविक जाळ्यात अडकले की, समाजमाध्यमावरील जाहिरातीही दिसायच्या बंद होतात. त्यामुळे सायबर पोलिसही अशा प्रकरणांत फारसे काही करू शकत नाहीत.

देवस्थानच्या नावाने बनावट ॲप तयार करून भक्तांची लूट करणारे महाभागही आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे ‘ऑनलाइन पूजा व तेल अर्पण’चे बनावट ॲप तयार करून, शनिभक्तांची फसवणूक केल्याचा प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आला होता. २०२१ मध्ये शिर्डी येथील साईबाबांच्या नावाने भाविकांकडून बेकायदेशीर देणग्या मागण्याचा एक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने उघडकीस आणला होता. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया ग्रुपवरून पूजा, आरती, प्रसाद इत्यादींसाठी सामान्य लोकांकडून देणग्या मागितल्या जात असल्याचे आढळून
आले आहे. 

तीर्थक्षेत्री किंवा मंदिरांमध्ये जाऊन  भाविक पूजा-अर्चा किंवा इतर विधी करतात. मंदिरांच्या किंवा श्रद्धास्थानांच्या परिसरातही भाविकांना लुबाडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.  मोठ्या श्रद्धेने देवाच्या दारात गेलेला भाविक त्याकडे डोळेझाक करतो. ऑनलाइनच्या जमान्यात मात्र आता देवांचे कुठूनही लाइव्ह दर्शन होऊ लागले आहे.  पूजा-अर्चाही होऊ लागल्या आहेत. याचाच फायदा सायबर चोरटे उठवू लागले आहेत. 

देवाच्या नावावर फसवणुकीचे हे डिजिटल फंडे भाविकांच्या डोळ्यात सहज धूळ फेकतात. आपली श्रद्धा इतकी आंधळी कशी, याचा विचार आता भाविकांनीच करायला हवा आहे. दूरच्या देवीला साडीचोळी देण्याकरिता ऑनलाइन पैसे भरून कुणा भामट्याचे धन करण्यापेक्षा आपल्याच परिसरातल्या गरजू महिला-मुलांना, कुटुंबांना मदत केली, गरीबाघरच्या मुलाचे अडलेले शिक्षण मार्गी लावले तर पुण्यप्राप्तीची खात्री अधिक; हेही कधीतरी समजून घेतले पाहिजेच, नाही का?
    chandrakant.kitture@lokmat.com

Web Title : सावधान: ऑनलाइन धोखाधड़ी धार्मिक भावनाओं का फायदा उठाती है, भक्त ठगे गए।

Web Summary : श्रद्धालु पैसे के बदले दैवीय आशीर्वाद का वादा करने वाले ऑनलाइन घोटालों का शिकार हो रहे हैं। धोखेबाज धार्मिक भावनाओं का फायदा उठाकर नकली वेबसाइट और ऐप बनाते हैं। अधिकारियों ने सावधानी बरतने का आग्रह किया है, श्रद्धालुओं को इन धोखाधड़ी योजनाओं से बचने और स्थानीय स्तर पर दान करने की सलाह दी है।

Web Title : Beware: Online scams exploit religious sentiments, devotees defrauded in God's name.

Web Summary : Devotees are falling prey to online scams promising divine blessings in exchange for money. Scammers create fake websites and apps, exploiting religious sentiments. Authorities urge caution, advising devotees to avoid these fraudulent schemes and donate locally.