स्वत:च्या राहण्या-बोलण्यातून स्वयंसेवकत्व जपतानाच राजकारणातील व्यवहार सांभाळण्याचे कसब फार कमी स्वयंसेवक नेत्यांना जमते, आजच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा त्याबाबत ‘अग्रेसर’ आहेत. सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांनी नेहमीच नाळ जपली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती ही तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून करण्यात आली आहे. केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार हे अपेक्षितच होते.
दानवे यांची कारकिर्द यशस्वी ठरली, असेच म्हणावे लागेल. गेल्या पावणेपाच वर्षांत ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला जे दमदार यश राज्यात मिळाले, त्याचे श्रेय नि:संशय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जात असले, तरी त्यास पक्षसंघटनेची उत्तम साथ देण्याचे काम दानवे यांनी केले. आता त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील आले आहेत. दोघेही भिन्न प्रवृत्तीचे नेते आहेत. दानवे यांनी वागण्या-बोलण्यातील रांगडेपण हे नीती म्हणून स्वीकारल्याचे जाणवायचे, तर चंद्रकांतदादा यांनी वागण्या-राहण्यातील साधेपणा हे नीती म्हणून स्वीकारल्याचे दिसते. चंद्रकांतदादा दिसतात, तितके साधे नक्कीच नाहीत. ‘हे मुख्यमंत्री सहा महिन्यांच्या वर टिकणार नाहीत,’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी चारीमुंड्या चित तर केलेच, पण ‘मी पुन्हा येईन महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. त्याचप्रमाणे, ‘मागच्या दाराने आलेल्या स्वयंसेवक चंद्रकांत पाटलांना राजकारणातलं काय कळतं’ असे हिणवणाºयांच्या गडांना हादरे देण्याचे काम चंद्रकांतदादांनी पश्चिम महाराष्ट्रात करून दाखविले. हिणवणारे हे लोक राजकारणाची मक्तेदारी असलेले घराणेशहा आहेत. त्यांना चंद्रकांतदादांनी धडकी भरविली. भाजप ज्या ठिकाणी तिसºया, चवथ्या क्रमांकावर असायचा, त्या पश्चिम महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा पिंड संघ स्वयंसेवकाचा आहे, पण हे स्वयंसेवकत्व जपताना राजकारणातील व्यवहारही ते तितकाच उत्तम साधतात.