वाचनीय लेख - व्लादिमीर पुतीन, जेलेन्स्की... आणि नरेंद्र मोदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:26 AM2023-02-16T09:26:38+5:302023-02-16T09:29:33+5:30

रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान मोदी कळीची भूमिका बजावताना दिसतात. युद्धग्रस्त देशांदरम्यान वाटाघाटी करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान!

Vladimir Putin, Zelensky... and Narendra Modi! | वाचनीय लेख - व्लादिमीर पुतीन, जेलेन्स्की... आणि नरेंद्र मोदी!

वाचनीय लेख - व्लादिमीर पुतीन, जेलेन्स्की... आणि नरेंद्र मोदी!

googlenewsNext

हरिश गुप्ता

‘संकटातही कायम एक संधी दडलेली असते’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द आठवा. २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी बिहारमध्ये पाटणा येथे झालेल्या प्रचंड मेळाव्यात हादरवणारे बॉम्बस्फोट झाले तेव्हा पहिल्यांदा मोदी यांचे अविचल, शांत असे रूप दिसले होते. तेव्हा ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. गुजरातमधील भूकंप असो वा पुलवामामध्ये झालेला हल्ला, प्रत्येक संकटानंतर मोदी अधिक शक्तिमान होऊन पुढे आले. आता रशिया-युक्रेन युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका मोदींना खुणावते आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दोनदा भेट झाली, ही भारताच्या दृष्टीने सन्मानाची गोष्ट होय. असे पहिल्यांदाच घडत आहे. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या संवादाचा भाग म्हणून डोवाल यांनी सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली होती; पण जेव्हा पुतिन यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावले तेव्हा तो धक्काच होता. ही भेट सुमारे तासभर चालली. ‘नरेंद्र मोदी शांततेचे प्रयत्न करत असतील तर त्याचे आम्ही स्वागतच करू’, असे जेव्हा व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले तेव्हा तो आणखी एक धक्का होता. 

रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यापूर्वी अनेकदा बोलले आहेत. १६ सप्टेंबरला उझबेकिस्तानमध्ये पुतीन यांच्याशी त्यांची द्विपक्षीय भेट झाली. ‘सध्याचा काळ युद्धाचा नाही’ असे मोदी त्यावेळी म्हणाले होते. संघर्ष संपविण्याचे आवाहन त्यांनी पुतीन यांना केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर भारताने आजवर टीका केलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे; मात्र भारत युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांच्या थेट संपर्कात असतो. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले होते, त्यावेळी त्यांना तेथून बाहेर पडता यावे यासाठी युद्धबंदी होण्याकरिता मोदी यांनी रशिया आणि युक्रेनचे मन वळवले होते. 

- डोवाल यांनी ताज्या भेटीत पुतीन यांच्यासाठी मोदींचा संदेश नेला होता असे नंतर उघड झाले. शक्य असेल तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका मोदी यांना उद्युक्त करते आहे हे नक्कीच; परंतु दोन युद्धग्रस्त देशांदरम्यान भारतीय पंतप्रधान वाटाघाटी करत आहेत, हे पहिल्यांदाच दिसले. किती मोठा विरोधाभास! याच अमेरिकेने मोदी यांना व्हिसा नाकारला होता आणि त्यांनी आता दोन युद्धग्रस्त देशांमध्ये शांततेचे प्रयत्न करावेत असे अमेरिकाच म्हणते आहे!

तीन मुख्यमंत्र्यांचा वेगळा पवित्राभारतातील ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध तोंडसुख घेणे राहुल गांधी यांनी चालू ठेवले असतानाच तीन काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी मात्र या विषयावर सूचक मौन बाळगले आहे. अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सुखविंदर सिंग सुखू हे ते तीन मुख्यमंत्री होत. किंबहुना अशोक गेहलोत यांनी तर अदानी यांची जोरदार पाठराखण केली. अदानी यांनी राज्यात केलेली गुंतवणूक वाखाणण्याजोगी असल्याचे ते म्हणाले. या तीन तसेच विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या इतर राज्यांत अदानी यांची भरपूर गुंतवणूक आहे.

राहुल यांची दाढी : थोडी वाट पाहा!
लोकांना वाटते तसे घडणार नाही. अपेक्षेपेक्षा लवकरच राहुल गांधी त्यांची वाढलेली दाढी काढून टाकतील आणि त्यांचे पूर्वीचे रूप पुन्हा परतेल, असे दिसते. कारण जेवताना त्यांना या वाढलेल्या दाढीचा त्रास होतो आहे आणि दुसरे म्हणजे त्यांच्याच गोतावळ्यातल्या मंडळींकडून त्यांच्यावर तसा दबाव टाकला जात आहे. ‘भारत जोडो यात्रेच्या काळात मी दाढी वाढवायची असे का ठरवले हे मलाही माहीत नाही. मी दाढी करू नये तसेच केसही कापू नयेत, असे मला वाटले इतकेच. आता दाढी वाढवलेल्या अवस्थेत आपल्याला बेचैन वाटते आणि लवकरच आपण ती काढून टाकू’, असे ते हळूच म्हणाल्याचे कळते. 

कदाचित राहुल यांचे कुटुंबीय त्यांच्यावर दबाव टाकत असतील. त्यांच्या पक्षातील काही नेते (पक्षी; त्यांच्याभोवती गोंडा घोळणारे सदस्य) त्यांना वाढलेले केस आणि दाढी कमी करायला सांगत आहेत; परंतु तूर्तास राहुल तसे करू इच्छित नाहीत; कारण बऱ्याच जणांना असे वाटते की त्यांचा हा नवा अवतार राजकीयदृष्ट्या फायद्याचा ठरतो आहे आणि ‘पप्पू’ ही त्यांची प्रतिमा भूतकाळात जमा झाली आहे. कोविड काळात पंतप्रधान मोदी यांनीही त्यांची दाढी वाढवली होती. बहुदा पश्चिम बंगालमधल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हे केले असेल; परंतु रवींद्रनाथ टागोरांसारखी दिसणारी छबी बंगाली मतदारांना फारशी भावली नाही. त्यांची मोठी दाढी काही काळातच अदृश्य झाली. आता राहुल त्यांची दाढी कमी करतात की ती थेट अदृश्यच होते, हे पाहायचे.

Web Title: Vladimir Putin, Zelensky... and Narendra Modi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.