शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विदर्भाची नागभूमी- नागपूर!

By वसंत भोसले | Published: February 09, 2020 12:32 AM

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीत आशिया खंडातील सर्वांत मोठी स्तुपा बांधण्यात आली आहे. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची अनेक छायाचित्रे या स्तुपामध्ये लावण्यात आली आहेत. धर्मांतर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा वाचून दाखविल्या होत्या, त्या एका स्तंभावर लिहिल्या आहेत.

ठळक मुद्दे रविवार विशेष जागर

वसंत भोसले -महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे शहर नागपूर आहे. ते शहर राज्याची उपराजधानीसुद्धा आहे आणि एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असा निर्धार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून हिंदू धर्माचा त्याग केला, ती ही भूमी आहे. हिंदू राष्ट्रवादाचा प्रखर प्रचार आणि प्रसार करणाºया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्माची कहाणीही याच शहरातून सुरू होते. अशा अनेक वैशिष्ट्यांनी गतीने वाढणारे शहर ‘आॅरेंज सिटी’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तसेच एकेकाळी मध्य प्रांताची राजधानी असलेले शहर आज उपराजधानी आहे. स्वतंत्र उच्च न्यायालय असलेल्या शहरात आज मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बनले आहे. दमदार पाऊस पडतोच, पण प्रचंड कडक उन्हाळ््याने माणूस करपून जाण्याची वेळ येते आणि कडाक्याच्या थंडीत गारठूनही जाण्याची त्याला सवय करून घ्यावी लागते. भारत देशाचा मध्यबिंदू ‘झिरो मैल’ नावाने याच शहरात आहे. वास्तविक देशाच्या राजधानीचा मान मिळायला हरकत नव्हती. असे हे नाग नदीकाठावर वसलेले शहर आता ३१८ वर्षांचे झाले आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. परिणामी, भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठी माणसांचा महाराष्ट्र स्थापन व्हायला तेरा वर्षे लागली. दरम्यान, देशात दोन सार्वत्रिक आणि दोन प्रांत विधानसभांच्या निवडणुका होऊन गेल्या होत्या. राज्यघटनाही स्वीकारून एक दशक उलटून गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी निर्णयानंतर त्यांचे निधन होऊनही चार वर्षे झाली होती. मराठी माणसांच्या एका राज्याऐवजी दोन राज्ये स्थापन करून विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी होती. नागपूर हे शहर राजधानीचे होते. उच्च न्यायालयही होते.मात्र महाराष्टÑ हे एकच राज्य झाले आणि राजधानीचा दर्जा असलेल्या या शहराला उपराजधानीचा दर्जा मिळाला. असा दर्र्जा मिळणारे देशातील हे एकमेव शहर आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीतील हे वेगाने बदलणारे आणि विकास साधणारे शहर आहे. त्याच्या जुन्या भागात गेले की, जुन्या दिल्लीसारखे माणसांच्या गर्दीने गजबजलेले दिसते. नव्या प्रशासकीय भागात फिरताना देशाची राजधानी नवी दिल्लीची छोटी प्रतिकृतीच वाटते. विधिमंडळ भवन, रिझर्व्ह बँक, झिरो मैल स्तंभ, उच्च न्यायालयाची ऐतिहासिक अशी देखणी इमारत, मंत्र्यांच्या बंगल्याची गर्दी असलेला रवी हाऊस परिसर, शेजारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, अनेक सरकारी कार्यालये आहेत. केंद्र सरकारच्या कार्यालयांचीही रेलचेल आहे.आपल्याच महाराष्ट्राच्या उपराजधानीबद्दल आपण दक्षिण महाराष्ट्रातील माणसं अनभिज्ञ आहोत की, त्याचा इतिहास, भूगोल काहीच माहिती नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, दीक्षाभूमीवरील समारंभ आणि रेशीम बागेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात काही राजकीय घडामोडी घडल्या की, नागपूरचे नाव आपल्या चर्चेत येते. विदर्भ महाराष्ट्रात सामील होण्यास उत्सुक नव्हता, तेव्हा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नागपूर करार घडवून आणला होता. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला. अशा शहरात आपण फार कमी जातो. ही सर्व पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी जाणे आवश्यक आहे. माझे स्नेही आणि नागपूरचे ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखडे यांना परवाच्या नागपूर भेटीत फोन केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा कोल्हापूर ते नागपूर म्हणजे महाराष्ट्रातील दोन ध्रुवावरील माणसांची भेट होणार आहे. अवश्य येणार आणि भेटणार असे ते म्हणाले. नागपूरकरांना कोल्हापूर हे टोक वाटते आणि आपणास नागपूर हे फार दूरचे शहर वाटते.

उपराजधानीत दोन दिवस यावेळी थांबायचा निर्णय घेतला होता. ‘लोकमत’च्या सर्व संपादकांची एकदिवसीय बैठक संपली की, दुस-या दिवशी जेवढे नागपूर पाहता येईल तेवढे पाहण्याचे ठरविले. माणसं, त्यांचा इतिहास, भाषा, संस्कृती, आदींची किमान तोंडओळख तरी होईल, असे वाटत होते. नागाची पूजा करणारे लोक म्हणून त्यांनी शहरातून वाहणा-या नदीचे नावही नाग ठेवले आहेच आणि शहरालाही या नदीवरून नाव देण्यात आले आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. पूर्वी या शहराचे नाव ‘फणींद्रापुरा’ असे होते. नागाच्या फणावरून हे नाव पडल्याचे मानले जाते. गोंड प्रदेशाचा राजा बख्त बुलंद शाह याने सतराव्या शतकात (१७०२ मध्ये) या शहराची निर्मिती केली असे मानले होते. त्या राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विधानभवन परिसरात बख्त बुलंद शाह यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तत्पूर्वी, सुमारे तीन हजार वर्षांपासून या परिसरात मानवी वस्ती असल्याचे मानले जाते. मात्र, नाग नदीच्या उत्तरेस नागपूर शहराची उभारणी या राजाने केली. त्या परिसरास आता ‘महल’ म्हटले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यवस्थापन कार्यालय तेथेच आहे. रेशीम बागेत डॉ. हेडगेवार यांचे स्मारक आहे आणि तेथे संघाचे वर्ग चालतात.

विदर्भाचा आठ जिल्ह्यांचा हा भाग मध्य प्रदेशातील छिंदवाड, बेरर, आदींशी जोडला गेला होता. देवगडचा राजा बख्त बुलंद शाह यांच्यानंतर चाँद सुलतान राजाने नागपूर ही आपली राजधानी बनविली. चाँद सुलतान यांच्या निधनानंतर (१७३९) सत्तेसाठी भांडणे सुरू झाली. खून-मारामाऱ्यांपर्यंत प्रकरण गेले. चाँद सुलतान यांच्या विधवा पत्नीने बेररचे सरदार राघोजी भोसले यांची मदत मागितली. पुढे त्यांनीच बेरर, देवगड, चांदा आणि छत्तीसगडचा भाग म्हणून संस्थानांची स्थापना केली आणि राजे झाले. हा सर्व संघर्षाचा १७४३ ते १७५१चा कालखंड आहे. नागपूरचे राजघराणे म्हणून राघोजी भोसले यांचा उदय झाला. १८०३ मध्ये राघोजी राजे दुसरे भोसले गादीवर असताना ब्रिटिशांनी चाल केली. तेव्हा पेशव्यांची मदत घेण्यात आली.

ब्रिटिशांविरुद्ध नागपूरचे मराठा राजे भोसले यांची तीन युद्धे झाली. मुधोजी भोसले राज्यावर असताना १८१७ मध्ये तिसरे युद्ध झाले. त्यात त्यांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांबरोबर तह करण्यात आला. १८५३ मध्ये ब्रिटिशांनी नागपूर ही राजधानी करून छिंदवाडा, छत्तीसगड आणि नागपूरसह मध्य प्रांत व बेरर अशी रचना केली. त्याचे प्रशासकीय मुख्यालय नागपूर राहिले. तेव्हापासून १९५६पर्यंत नागपूर ही १०३ वर्षे मध्य प्रांताची राजधानी होती. द्विभाषिक मुंबई प्रांताची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तेव्हा मध्य प्रांतापैकी सध्याचा अकरा जिल्ह्यांचा विदर्भ मुंबई प्रांतात सामील झाला. नागपूरची राजधानी उपराजधानी झाली.

स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव नागपूरवरही होता. १९२० मध्ये मोठे आंदोलन झाले होते. १९२३ मध्ये या शहराने प्रथमच हिंदू-मुस्लिम दंगल पाहिली. त्या पार्श्वभूमीवर १९२५ मध्ये शहराच्या मोहितेवाडा महलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. १९२७ मध्ये पुन्हा हिंदू-मुस्लिम दंगल झाली. त्यात आरएसएसला हिंदूंचा पाठिंबा मिळाला आणि लोकप्रियताही वाढली. या शहराला उद्योगधंद्याचीही मोठी परंपरा आहे. विदर्भात कापूस पिकत असल्याने टाटा उद्योग समूहाने १ जानेवारी १८७७ रोजी सूतगिरणी सुरू केली. सेंट्रल इंडिया स्पिनिंग आणि विव्हिंग कंपनी लि. असे तिचे नाव होते. मात्र, ती ‘इम्प्रेस मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. तत्पूर्वी, ब्रिटिशांनी १८६७मध्ये नागपूर शहर मध्य रेल्वेने जोडले होते. त्यामुळे उद्योग आणि व्यापार वाढीस मोठी मदत झाली. स्वतंत्र भारतात मध्य प्रांताचे रूपांतर मध्य प्रदेश राज्यात झाले आणि त्याची राजधानी नागपूरच राहिली. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक, नासिकराव तिरपुडे हे ज्येष्ठ नेते मध्य प्रदेश विधानसभेवरही विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत होते. वसंतराव नाईक यांचा मध्य प्रदेश राज्य मंत्रिमंडळातदेखील समावेश होता.

मराठी भाषिकांच्या राज्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा दबाव वाढत राहिला तेव्हा विदर्भ प्रदेशाने मुंबई प्रांतात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूर शहराचा राजधानीचा दर्जा गेला. तेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी तो परिसर धगधगता होता. अकोला करार आणि नागपूर करार असे दोन करार होऊन अखेरीस महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, रा. कृ. पाटील, रामराव देशमुख, गोपालराव खेडकर, शेषराव वानखेडे, देवीसिंग चव्हाण, आदींनी पुढाकार घेतला होता. त्या नागपूर करारामुळेच नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

नागपूरमध्ये घेण्याचा निर्णयही झाला. त्याप्रमाणे गेली साठ वर्षे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. यावेळी विदर्भाच्या प्रश्नांवर अधिक भर देऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची अपेक्षा असते.अशी पार्श्वभूमी असलेल्या नागपूर शहराची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरासाठी निवड केली. १४ आॅक्टोबर १९५६ (विजयादशमी) रोजी त्यांनी सुमारे सहा लाख अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. भारतीय धार्मिक आणि सामाजिक रचनेला मोठी कलाटणी देणारा तो दिवस होता. अडीच हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय होता. डॉ. आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेला कंटाळून १९३५ मध्ये ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ असा निर्धार केला होता. तब्बल एकवीस वर्षांनी त्या निर्धाराचे निर्णयात रूपांतर करून धर्मांतर केले. त्या भूमीला दीक्षाभूमी म्हटले जाते. त्याच्यावर आशिया खंडातील सर्वांत मोठी स्तुपा बांधण्यात आली आहे. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची अनेक छायाचित्रे या स्तुपामध्ये लावण्यात आली आहेत. धर्मांतर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा वाचून दाखविल्या होत्या, त्या एका स्तंभावर लिहिल्या आहेत. नागपूरला येणारा माणूस या महामानवाच्या निर्धाराला नमस्कार करण्यासाठी दीक्षाभूमीस भेट देतो. (पूर्वार्ध)

  • नागपुरातील विधानभवन परिसरात बख्त बुलंद शाह यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तत्पूर्वी, सुमारे तीन हजार वर्षांपासून या परिसरात मानवी वस्ती असल्याचे मानले जाते. मात्र, नाग नदीच्या उत्तरेस नागपूर शहराची उभारणी या राजाने केली. त्या परिसरास आता ‘महल’ म्हटले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यवस्थापन कार्यालय तेथेच आहे.

१) नागपूरचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलुंद शाह यांचे स्मारक विधिमंडळासमोरउभे करण्यात आले आहे.२) दीक्षाभूमी : याच मैदानावर दीक्षा घेण्यात आली.३) झिरो मैलस्टोन : हा भारताचा मध्यबिंदू.४) रेशीमबाग : आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार. 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagaur-pcनागौरVidarbhaविदर्भ