शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

वैष्णवीचा श्वास थांबला! का?- तर व्हेंटिलेटर नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:00 IST

कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी तडफडणारे लोक टाचा घासून मेले; पण निबर यंत्रणा आजही तेवढीच सुस्त आहे, हे नागपुरात सिद्ध झाले!

श्रीमंत माने

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे इस्पितळ (स्थानिक भाषेत ‘मेडिकल’) तब्बल दोन हजार खाटांचे आहे. भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या इस्पितळांपैकी हे एक! येथील व्यवस्थेची लक्तरे एका सतरा वर्षांच्या मुलीच्या मृत्यूमुळे वेशीवर टांगली गेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील वैष्णवी राजू बागेश्वर नावाची ही अत्यवस्थ मुलगी १५ सप्टेंबरला ‘मेडिकल’मध्ये दाखल करण्यात आली. तिची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. श्वसनाचा त्रास होता. प्रकृती अत्यंत गंभीर होती. तिथल्या अनेकांच्या मते ती वाचण्याची शक्यता नव्हती. परंतु, डॉक्टरांना कुठल्याही रुग्णाबद्दल असे म्हणता येत नाही. अखेरपर्यंत कौशल्य पणाला लावावे लागते.  जीव वाचविण्यासाठी उपलब्ध साधन-सुविधांचा वापर करावा लागतो. ‘मेडिकल’मध्ये मात्र तसे झाले नाही. वॉर्ड क्र. ४८ मध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची गरज होती. पण, त्या वॉर्डातील दोन्ही व्हेंटिलेटर बिघडले होते. या इस्पितळात एकूण २२२ व्हेंटिलेटर्स आहेत आणि उपलब्ध माहितीनुसार त्यापैकी १९६ सुरू आहेत. तरीदेखील त्या विशिष्ट वॉर्डातील व्हेंटिलेटर बंद असल्याचे कारण देत तात्पुरत्या स्वरूपात तिला अंबू बॅगची व्यवस्था पुरविण्यात आली. खरे पाहता ती तात्पुरती व्यवस्था नव्हतीच. त्यानंतर तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ ती मुलगी आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिदिंग युनिट म्हणजे अंबू बॅगवरच होती. तिचे दुर्दैवी मातापिता तितके तास अंबू बॅगचे आळीपाळीने पंपिंग आणि सोबतच “लेकीचा जीव वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर द्या”  म्हणून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची विनवणी करीत राहिले. भरती झाल्यानंतर तिसेक तासांनी वैष्णवीची मृत्यूशी झुंज संपली. तिला वाचविण्याची आईवडिलांची धडपड निबर व निष्ठुर यंत्रणेपुढे पराभूत झाली. 

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी हजारो लोकांचा तडफडून जीव गेला, टाचा घासून लोक मेले. तेव्हा असे वाटले, की त्यापासून सरकारे व सार्वजनिक यंत्रणा काहीतरी धडा घेतील. एकेका जिवाचे मोल या मंडळींना समजेल. पण, वैष्णवीचे प्रकरण पाहता असे काहीही घडलेले नाही. आपली आरोग्य यंत्रणा आधीही संवेदनाहीन होती व आताही ती तशीच आहे, हे चित्र अजिबात चांगले नाही. कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा, व्हेंटिलेटर्सची कमतरता वगैरे उणिवा चव्हाट्यावर आल्या तेव्हा केंद्र व राज्य सरकारे, सेवाभावी संस्था, अनेक उद्योग पुढे सरसावले. हजारोंच्या संख्येने व्हेंटिलेटर्स व अन्य साधने रुग्णालयांना पुरविण्यात आली. ‘मेडिकल’सारखी मोठी हॉस्पिटल्सच काय पण छोट्यामोठ्या इतर हॉस्पिटल्सनाही ही उपकरणे मिळाली. पीएमकेअर्स फंडातील मोठी रक्कमदेखील व्हेंटिलेटर खरेदीसाठी खर्च झाली. परिणामी, यापुढे किमान व्हेंटिलेटरअभावी कुणाचा जीव जाणार नाही, असे वाटत होते.  दुर्दैवाने वैष्णवीच्या मृत्यूने तो गैरसमजही दूर झाला.  

कृत्रिम श्वासोच्छवास व्यवस्थेची गरज असलेल्या रुग्णांना अंबू बॅगसारख्या तात्पुरत्या उपकरणांवर किती वेळ ठेवायचे, याचे निश्चित असे शास्त्र आहे. आता नागपूरच्या घटनेनंतर राज्याचे वैद्यक शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी राज्यभरातील वैद्यक महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना तंबी दिली आहे, की अंबू बॅगचा वापर कमीतकमी वेळ करून रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अधिक प्रगत साधनांचा वापर करा. अन्यथा, रुग्णांचा जीव गेला तर त्यांना जबाबदार धरले जाईल. नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुधीर गुप्ता यांनी वैष्णवी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिथल्याच पाच डॉक्टरांची एक थातूरमातूर समिती नेमली होती. वैष्णवीला व्हेंटिलेटर मिळायला हवे होते, अशा अर्थाच्या सुभाषितवजा अहवालात त्या समितीने कोणालाच जबाबदार धरले नाही. परिणामी, वैद्यक शिक्षण संचालकांनी नागपूरबाहेरच्या तीन डॉक्टरांची दुसरी समिती नेमली. ही समिती काय करते बघूया. पण, खरी समस्या वेगळीच आहे. आपल्या व्यवस्थेचा सर्वांत मोठा दोष हा, की आपण अशी घटना घडली की तेवढ्यापुरते संवेदनशील बनतो. तेवढ्यापुरतेच आपल्याला दु:खाचे उमाळे व संतापाचे कढ येतात. आपली विस्मरणशक्ती प्रचंड ताकदीची आहे. किमान ही घटना तरी तिला अपवाद ठरावी. आणखी कुण्या वैष्णवीचा असा तडफडून मृत्यू होऊ नये.

(लेखक लोकमत नागपूरचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल