अवकाळीचा कहर; हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:19 IST2025-05-22T11:18:20+5:302025-05-22T11:19:09+5:30

हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. शेतीच्या कामात मग्न असलेल्या आणि वादळवारे पाहून झाडांच्या आश्रयाला गेलेल्या कित्येक शेतमजुरांच्या अंगावर विजा कोसळून त्यांचा करुण अंत झाला. शिवाय, किती मुक्या प्राण्यांचे जीव गेले, किती झाडे जमीनदोस्त झाली याची तर मोजदादच नाही.

Unseasonal weather wreaks havoc; crops and orchards on thousands of hectares destroyed | अवकाळीचा कहर; हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी

अवकाळीचा कहर; हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी

दरवर्षी मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत यंदा अवकाळी पावसाने पाणी आणले आहे. अवकाळी पाऊस असो की पाहुणा, कोणालाच हवासा नसतो. तो अनाहुतपणे आला की तारांबळ उडते. तशी ती सध्या शेतकऱ्यांची उडाली आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची काढणी आणि नंतरच्या मशागतीची सगळी कामे शिल्लक असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या आणि काढून मळणीसाठी ठेवलेल्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला. हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. शेतीच्या कामात मग्न असलेल्या आणि वादळवारे पाहून झाडांच्या आश्रयाला गेलेल्या कित्येक शेतमजुरांच्या अंगावर विजा कोसळून त्यांचा करुण अंत झाला. शिवाय, किती मुक्या प्राण्यांचे जीव गेले, किती झाडे जमीनदोस्त झाली याची तर मोजदादच नाही.

पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आठ एकरवर हरभरा घेतला. पण, काढणीच्या आधीच गारांचा मारा झाला आणि संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. पीकविमा मंजूर व्हायच्या आधीच बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस आली! ही कथा महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची आहे. मृग, आर्द्रा या नक्षत्री पावसामुळे रान आबादान होण्यापूर्वीच या अवकाळीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. ही सगळी धूळधाण पाहून यंदा पावशा नावाचा पक्षीदेखील ‘पेरते व्हा’ची हाक देईल की नाही, शंकाच आहे. अलीकडच्या काळात शेती आणि शेतकरी कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाचे  बळी ठरत आहेत. कधी-कधी ऋतूनिहाय चांगला पाऊस पडतो. पेराल ते उगवते. भरपूर पिकते. पण, बाजारात ते कवडीमोल भावात विकावे लागते. शेतीमालाच्या विक्री व्यवस्थापनातील वाढत्या हस्तक्षेपामुळे कष्टाने पिकविलेल्या धान्याचे योग्य मोजमाप होईलच याची शाश्वती नाही. शिवाय, संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार नावाची व्यवस्था धावून येईलच असेही नाही. निवडणूक काळात केलेल्या घोषणांचा जिथे विसर पडतो, तिथे अवकाळीसारख्या संकटात मदत मिळेलच, याची काय ‘गॅरंटी’? अवकाळीने हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी केली असली तरी अजून नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याचे अथवा तसे आदेश निघाल्याचे ऐकिवात नाही. यथावकाश निघतीलही, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. कारण अवकाळीने केवळ रब्बीच नव्हे तर येत्या खरीप हंगामावरदेखील पाणी फेरले आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर खरिपाची पेरणी कशी होणार? केवळ  शाश्वत आणि हवामानपूरक शेती करा, एवढा उपदेश करून भागणार नाही. गरजेप्रसंगी मदतीचा हात पुढे करावा लागेल. कारण आता दावलगावच्या शेतकऱ्यांची स्पर्धा केवळ धारणीच्या  शेतकऱ्यांशी नव्हे तर कॅलिफोर्नियातील कॉर्पोरेट फार्मरशी आहे. तिथलाही निसर्ग लहरी आहे. पण, सरकारचे पाठबळ भक्कम असल्याने तिकडच्या शेतकऱ्यांस  असल्या अवकाळीची पर्वा नसते. त्यात  निसर्ग स्वतःची भाषा बदलतो आहे.

ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणीय असमतोल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे ऋतूंची घडी विस्कटली आहे. त्यातून आलेले हे ‘अवकाळी’ संकट केवळ कृषी अर्थव्यवस्था आणि कृषक समाजापुरते मर्यादित नसून, एकूणच मानवजातीसाठी ती एक भयसूचक चाहूल मानायला हवी. पूर्वी हवामानाचे चक्र ठरलेले होते. जूनमध्ये पावसाळा, ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आणि मग थंडी. पण, आता निसर्गच्रकाची दिशा बदलत चालली आहे. एप्रिल-मेमध्ये एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच अचानक आभाळ भरून येते आणि कुठे गारपीट, तर कुठे वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस पडतो. हवामानातील बदल, जागतिक तापमानवाढ, हवामानचक्रातील अडथळे आणि प्रदूषण आदी कारणे या अवकाळी संकटामागे असली तरी निसर्गात होत असलेला अमर्याद मानवी हस्तक्षेप यास मुख्यत्वे कारणीभूत आहे, यावर जगभरातील तज्ज्ञांचे एकमत आहे.

‘ग्लोबल वाॅर्मिंग’ हा शब्द आता केवळ परिषदा आणि परिसंवादापुरता मर्यादित राहिलेला नाही. तुमच्या-आमच्या जगण्यावरदेखील त्याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जग बदलण्याचे भलेही दावे केले जात असले तरी निसर्गापुढे सारे काही फिके आहे, हेच खरे. आभाळाला दोष देऊन तरी काय होणार? मूठभरांच्या चंगळवादाने जगाच्या पोशिंद्यावर आणलेल्या या ‘अवकाळी’ संकटावर अजून तरी अक्सीर इलाज सापडलेला नाही.

Web Title: Unseasonal weather wreaks havoc; crops and orchards on thousands of hectares destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.