अतुलनीय धैर्याने आम्ही जग जिंकू; पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सीमेवर पोहचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:16 AM2021-11-08T08:16:04+5:302021-11-08T08:18:02+5:30

दिवाळीत प्रत्येकाने अर्थव्यवस्थेला हातभार लावला. पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करायला सीमेवर पोहोचले. त्यातून नवी उमेद जागवली गेली.

With unparalleled courage we will conquer the world; Prime Minister Narendra Modi reaches border to celebrate Diwali! | अतुलनीय धैर्याने आम्ही जग जिंकू; पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सीमेवर पोहचले!

अतुलनीय धैर्याने आम्ही जग जिंकू; पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सीमेवर पोहचले!

googlenewsNext

-  विजय दर्डा 

समजायला लागले तेव्हापासून मी दिवाळीच्या प्रेमातच पडलो आहे. हा सण मला खूप आवडतो. कारण तो ऊर्जेचा सण आहे.धार्मिक दृष्टीने या सणाचे महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिकदृष्ट्या उर्जेचे महत्त्व अपरंपार आहे. ऊर्जेशिवाय जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. ज्याच्यात जितकी ऊर्जा भरलेली तितका तो यशस्वी होणार. दिवाळी नव्या उमेदीचा सण आहे. जीवनातून अंधार नष्ट करण्याची इच्छा आणि प्रकाशाच्या शक्तीचे प्रतीक आहे दिवाळी. म्हणून मी अगदी परंपरागत पद्धतीने, थाटात दिवाळीचा सण साजरा  करतो आणि आनंदात बुडून जातो. 

गतवर्षी दिवाळीवर कोरोनाची काळी सावली पडली होती. पण आमच्या उमेदीची कमाल पाहा, आपण त्यातून लवकर बाहेर पडलो. या वर्षीच्या दिवाळीत आनंदाला उधाण आले. आनंदाच्या प्रकाशाने ही ताकद आम्हाला दिली. लोकांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उदारपणे खिसे मोकळे केले असे माझ्या लक्षात आले. प्रत्येकाने यथाशक्ती खरेदी केली. त्यातून बाजार सावरला. सरकारचेही योगदान त्यात आहे. पण मी सामान्य लोकांचा संदर्भ अशासाठी देतोय की तो पैसे खर्च करतो तेव्हाच बाजार मजबूत होतो. लोकांनी गाड्या, दुचाकी खरेदी केल्या हे आपण पाहिले. कपड्यांपासून सुक्या मेव्यापर्यंत बाजार गरम राहिला. जाणकारांच्या मते दिवाळीत १ लाख २५ हजार कोटींची उलाढाल झाली.

बाजाराने १५ टन सोने खरेदी केले. हिरे उद्योगात तर जल्लोष होता. या उद्योगात गेल्या ७५ वर्षांत प्रथमच बाजार इतका उल्हासित होता असे जाणकार सांगतात. या दिवाळीत मला आणखी एक बदल दिसला. ज्यांच्याकडे काही नाही त्यांची आठवण ठेवली गेली. लोकांनी त्यांना कपडे, अन्न, मिठाई दिली. बेवारशी वृद्ध आणि अनाथ मुलांच्याकडे जाऊन  त्यांना मदत केली. तशी ती आपली परंपराच आहे, पण कोरोनाने नात्याचा गोडवा वाढवला.

कमजोर असणाऱ्यांना सहकार्य करण्याची भावना वाढीस लागली. विक्रेत्याकडून वस्तू घेताना लोकांनी घासाघीस न करता दोन पैसे जास्त देऊ केले हे मला जाणवले. फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाजही यावेळी कमी झालेला दिसला. काहींनी नेहमीप्रमाणे फटाके वाजवले, पण ते प्रतीकात्मक होते. फटाक्यांच्या विषारी धुराने लोकांच्या जीवनाशी खेळू नये म्हणून बहुतेक लोक फटाक्यांपासून दूर राहिले. जनतेने वातावरण, पाणी आणि हवेची काळजी घेतली हे उघडच आहे.आणि हो, गेल्या वर्षाप्रमाणेच आमचे प्रधानमंत्री सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी सीमेवर गेले.

२०१४ पासून ते नेमाने जात आहेत. यावेळी ते नौशेरा सेक्टरमध्ये गेले होते. पंतप्रधान जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पंतप्रधान देशाचे प्रतिनिधी असतात, याचा अर्थ सारा देश दिवाळीच्या आनंदात जवानांबरोबर असतो. आमचे जवान वादळ वाऱ्याची तमा न बाळगता सीमेचे रक्षण करतात. देश आणि तिरंग्याच्या सन्मानासाठी ते प्राण पणाला लावतात. आपले आई-वडील, मुले-बाळे यांच्यापासून दूर असलेल्या जवानांना सण असा नसतोच. दिवाळी असो, ख्रिसमस, वैशाखी, होलामोहल्ला.. सैनिक सीमेवरच असतात. अशात पंतप्रधान त्यांच्याकडे जातात आणि लष्करी आणि निमलष्करी दलाच्या जवानांना हिंमत देतात, त्यांच्यात ऊर्जा, उमंग भरतात. 

ऑलिम्पिकमधून परत आलेल्या खेळाडूंना जेव्हा ते भेटले तेव्हाही खेळाडूंची हिंमत वाढविण्याचाच भाव त्यामागे होता. तो असलाही पाहिजे. आमचे शेतकरी आणि उद्योगांविषयी हाच भाव दिसतो तेव्हा आनंद वाटतो. खेळाडू तिरंग्यासाठी खेळतात. शेतकरी पूर्ण देशाला अन्न, फळे, भाजीपाला पुरवतात. ते पिकवणे ही लढाईच असते. दुष्काळ, पूर, कीड अशा अनेक आपत्तींना त्यांना तोंड द्यावे लागते. एकेकाळी आम्ही अन्नधान्यासाठी  दुसऱ्या देशांसमोर हात पसरून उभे राहायचो. आता ताठ मानेने उभे आहोत. आमचे उद्योग अनेक अडचणीत असताना रोजगाराच्या आघाडीवर देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी झगडत असतात. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया या मोदींच्या घोषणा सार्थ करण्याची शर्थ करतात. चारी सीमांवर ऊर्जा भरणे, नवा प्रकाश दाखवणे सोपे काम नाही.

मोदीजी हिमालयाच्या कुशीतल्या देवदेवतांच्या दर्शनाला गेलेले पाहून मला संतोष वाटतो. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. दुसरीकडे व्हॅटीकन सिटीत जाऊन ते पोपला आलिंगन देतात. हीच तर आमच्या देशाची परंपरा आहे. यासाठीच आपण सर्वधर्मसमभाव, एकतेत अनेकता आणि वसुधैव कुटुंबकम मानणारा देश म्हणून ओळखला जातो. यासाठीच लोकमत समूहाने अलीकडेच नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय संमेलन भरवले होते. सर्व धर्मांच्या आध्यात्मिक गुरुंनी त्यात भाग घेऊन शांतता आणि सद्भावाचा संदेश दिला. वास्तवात आमचे वेगळेपण हेच की सर्व रंग आमचे आहेत. सर्वधर्म आमचे, सर्व जण आमचे, हे जग आमचे, इथे राहणारे लोक आमचे. आम्ही सन्मान करणे जाणतो. आम्ही भारतवासी आनंद वाटणे जाणतो. (लेखक लोकमत समूहाचे चेअरमन आहेत. )

Web Title: With unparalleled courage we will conquer the world; Prime Minister Narendra Modi reaches border to celebrate Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.