काकाऽऽ आम्हाला वाचवा !
By सचिन जवळकोटे | Updated: September 22, 2019 09:07 IST2019-09-22T09:06:02+5:302019-09-22T09:07:25+5:30
लगाव बत्ती

काकाऽऽ आम्हाला वाचवा !
- सचिन जवळकोटे
वडाळ्याच्या ‘काकां’चं भाग्य खुललं बुवाऽऽ वयाच्या ७८ व्या वर्षी का होईना ‘घड्याळ’वाल्यांनी अवघा जिल्हा सांभाळायला दिलाय त्यांना. खरंच, सलाम करायला हवं ‘थोरले काका बारामतीकर’ यांना. स्टेजवर भाषा होती नव्या रक्ताची, तरुण नेतृत्वाची...स्टेजवरून खाली उतरल्यावर निवड झाली बुजुर्ग नेत्याची. ‘बारामतीकरां’च्या रॅलीत ‘नव्या नेतृत्वाला वाव द्याऽऽ’ असा टाहो सोलापूरच्या तरुणाईनं फोडला तरीही ‘बॅलन्स’ साधण्याच्या राजकारणात ही घोषणा पुरती विरली हवेत. केवळ ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांचं एकट्याचं वर्चस्व नको म्हणून ‘थोरल्या काकां’नी नेहमीप्रमाणं चोखाळली धक्कादायक निर्णयाची वाट.
किर्तनकार ‘काका वडाळाकर’ महाराज !
‘घड्याळ’वाल्यांची यात्रा गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी पंढरपुरात आलेली, तेव्हा ‘दीपकआबां’ची बॉडी लँग्वेज सांगलीच्या ‘जयवंतरावां’नी बरोबर ओळखलेली. ‘आपल्यातले काहीजण जायच्या तयारीतऽऽ’ असं त्यांनी रोखून बघत सांगताच ‘दीपकआबां’चा चेहरा घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे गर्रऽऽकन् बदललेला. त्याच रात्री ‘जयवंतरावां’चा मेसेज ‘बारामती’ला गेला, ‘साहेबऽऽ सोलापूरच्या ठाणेदारानंही कलटी मारलीय !’...आता ‘अकलूज-बार्शी’च्या सेनापतीसारखे कैक रथी-महारथीच जिथं ‘खंजिरा’ला धार लावण्यात मग्न होते, तिथं सांगोल्याच्या ठाणेदाराची चिंता काय म्हणुनी बारामतीकरांनी करावी ? अखेर काही दिवसांनी या ‘आबां’नी चाकू परजला.
...मात्र याच काळात ‘नरखेड’च्या ‘पाटला’नं थेट बारामतीच्या ‘धाकट्या दादां’शी कॉन्टॅक्ट केलेला. ‘यापुढं जिल्ह्याचा ठाणेदार पाटलांचा उमेशच असेल !’ असा लेखी नियुक्तीचा खलिताही तयार झाला; मात्र याची कुणकुण अनगरच्या वाड्याला लागली. तिघेही खडबडून जागे जाहले. भलेही ‘घड्याळ्या’चा किल्ला ढासळला. एवढे बुरूज कोसळले...तरीही उशाला सुरूंग लावून झोपण्याची ‘राजन मालकां’ची नव्हती तयारी...त्यांनी थेट ‘थोरल्या काकां’चा धावा केला. ‘म्हैस दुभती नसली तरी चालेल, पण मारकुटी नको’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मग काय.. बलाढ्य शत्रूसोबतच्या घनघोर युद्धातही नेहमीचा ‘गनिमी कावा’ आपल्याच लोकांशी रंगला. सोलापुरात जेव्हा ‘थोरल्या काकां’च्या स्वागतासाठी ‘साहेब.. तरुण नेतृत्वाला वाव द्याऽऽ’ असा फलक लावून तरणी पोरं उभारलेली (की उभी केलेली ?).. त्याचवेळी वड्याळ्यातील ‘काकां’च्या खांद्यावर जिल्ह्याची धुरा सोपविण्याचा निर्णय ठाम झालेला.
प्रत्येक ठिकाणी ‘बॅलन्स’ साधण्यात माहीर असलेल्या ‘थोरल्या काकां’नी इथंही तोच प्रयोग केलेला. ‘वडाळाकर’ अध्यक्ष तर ‘नरखेडकर’ कार्याध्यक्ष. अशी रचना बहुधा केवळ सोलापुरातच होत असावी; कारण शहरातही ‘भारतभाऊ’ अध्यक्ष, तर ‘संतोषभाऊ’ कार्याध्यक्ष. हेही खुश अन् तेही खुश. व्वाऽऽ क्या बात है...परंतु अजून एक गंमत म्हणजे ‘बळीराम काका’ म्हणजे सरळसोट गावरान नेतृत्व. कुणाचीही मुलाहिजा न ठेवता समोरच्याला पार सरळ करणारं. त्यात पुन्हा ते खूप चांगले कीर्तनकार. गावी असताना हातात टाळ-मृदंग घेऊन त्यांनी केलेली कीर्तनं पंचक्रोशीत गाजलेली. कीर्तनकार म्हणजे समाजातल्या दोषांवर बोट ठेवून त्यावर परखडपणे भाष्य करणारा. त्यामुळे अजूनही पक्षात शिल्लक राहिलेल्या संस्थानिकी मानसिकतेला हे ‘काका वडाळाकर महाराज’ आपल्या टाळातून ताळ्यावर आणणार का ? हाच प्रश्न सोलापूरच्या तरुण कार्यकर्त्यांना पडलेला.
‘हाता’वर मेहंदी...
...तोंडावर मेकअप !
सध्या ‘मध्य’मध्ये भलतीच धांदल उडालीय होऽऽ झेडपीसमोरचं ‘हात’वाल्यांचं ‘भवन’ पुरतं सुनसान पडलंय. सारी मंडळी कुठं गायब झालेली, कुणास ठावूक. आम्ही पामरानं काही लाडक्या मेंबरांना विचारलं तेव्हा समोरून वेगळीच उत्तरं ऐकू आली. इकडं ‘फिरदोस दीदी’ सांगत होत्या, ‘दौ सौ मेंदी कोना लष्कर एरिया में.. तो अडेसो कंगना मौलाली चौक में वाट्या देखो जीऽऽ’.. तिकडं ‘चेतनभाऊ’ही म्हणे पावडरच्या हजारभर बाटल्या घेऊन या चाळीतून त्या चाळीत गरागरा फिरत होते. ‘भाऊ’सारख्या गो-यागोमट्या मेंबराला इतक्या पावडरींची गरज काय, याचं उत्तर काही मिळालं नाही. ‘परवीन दीदी’ही तेच सांगू लागल्या, ‘थोबाड कू फेशवॉशा-बिशा लगाने कु वास्ते डब्बे में आईनाबी रखेल्या है देखोऽऽ’
‘मध्य’मध्ये ‘फुक्कट’ ब्युटीपार्लर वस्तूंचा एवढा मोठ्या होलसेल डिलर आला तरी कुठून याचा पत्ता शेवटपर्यंत लागलाच नाही, कारण ‘जनवात्सल्य’वर ‘ताई’ काही भेटल्याच नाहीत. फक्त त्यांच्या लाडक्या सायरा दीदी मात्र हळूच पुटपुटल्या ‘हमारे लोगा पैसा बाटते क्या नै गॅरंटी नै, ये मेकपाका डिब्बा तो लोगोंतक पौंच्या देखो फिक्सऽऽ’ लगाव बत्ती...
Big Breaking
गेल्या महिनाभरापासून ‘ब्रेकिंग न्यूज’साठी तरसलेल्या तमाम ‘अक्कलकोट’करांसाठी आजची धक्कादायक Big Breaking News. शनिवारी रात्री उशिरा ‘कमळ’वाल्यांनी दिल्लीत केलंय ‘सचिनदादां’चंच नाव फायनल...मग इतके दिवस ‘तारीख पे तारीख’ची कॅसेट लावून ‘सिद्धूअण्णां’ना उगाचंच इकडून-तिकडं फिरविण्याचा उपयोग काय झाला ? आता तो प्रश्न मुंबईत तळ ठोकून बसलेल्या ‘अण्णां’नाच परत आल्यावर विचारायला हवा. लगाव बत्ती...
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)