आजचा अग्रलेख - अजरामर पीटर हिग्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:04 AM2024-04-12T10:04:21+5:302024-04-12T10:04:50+5:30

इंग्लंडमध्ये जन्म झालेल्या हिग्ज यांना बालपणापासूनच निसर्गातील अगम्य बाबींनी वेड लावले होते

Today's Headline - The Eternal Peter Higgs! | आजचा अग्रलेख - अजरामर पीटर हिग्ज!

आजचा अग्रलेख - अजरामर पीटर हिग्ज!

‘आकाशाकडे बघा. संपूर्ण ब्रह्मांड आपल्याशी अत्यंत मैत्रीपूर्ण आहे आणि जे कामात झोकून देतात व स्वप्ने बघतात, त्यांना सर्वोत्तम ते देण्यासाठी नेहमी तयार असते!’ हे उद्गार आहेत, भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे! त्यांनी हे उद्गार काढले तेव्हा त्यांच्या नजरेसमोर दैवी कणांचा सिद्धांत मांडणारे पीटर हिग्ज नसतीलही; पण ते हिग्ज यांना तंतोतंत लागू पडतात, हे मात्र खरे! दैवी कण हे लोकप्रिय नाव लाभलेल्या मूलकणाच्या संशोधनासाठी आयुष्य वेचलेल्या पीटर हिग्ज यांचे बुधवारी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ब्रह्मांडाचे नियंत्रण करणाऱ्या मूलभूत शक्तींसंदर्भातील मानवाचे ज्ञान आणि समज यांना नवी दिशा देणाऱ्या या थोर भौतिकशास्त्रज्ञाच्या निधनाने संपूर्ण विज्ञान जगत शोकमग्न झाले आहे. हिग्ज आज आपल्यात नसले तरी, कण भौतिकशास्त्र या विज्ञानाच्या शाखेतील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे ते अजरामर झाले आहेत.

इंग्लंडमध्ये जन्म झालेल्या हिग्ज यांना बालपणापासूनच निसर्गातील अगम्य बाबींनी वेड लावले होते. त्या वेडामुळे स्वाभाविकपणे त्यांना विज्ञान विषयाची गोडी लागली आणि पुढे शिक्षणासाठी त्यांनी तोच विषय निवडला. त्यांनी १९५० मध्ये लंडनच्या किंग्ज महाविद्यालयातून विज्ञान विषयात स्नातक पदवी प्राप्त केली आणि १९५४ मध्ये एडिनबरो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. तेथूनच अद्भुत बुद्धिमत्ता आणि अतूट समर्पणाची सांगड घालत सुरू झाला ब्रह्मांडाच्या निर्मितीसंदर्भातील अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रवास! ज्याला आकारमान आहे, त्याला वस्तुमान असायलाच हवे; तर मग सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तुमान कसे प्राप्त होते, हा प्रश्न हिग्ज यांना सारखा छळत होता. त्यातूनच त्यांनी तोवर ज्ञात असलेल्या मूलकणांशिवाय वेगळे असे मूलकण अस्तित्वात असले पाहिजे, असा सिद्धांत मांडला. हिग्ज यांच्या सिद्धांतातील त्या कणांचे त्यांच्या आणि सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावांवरून हिग्ज बोसॉन असे नामकरण करण्यात आले. पुढे त्या कणांना दैवी कण असे लोकप्रिय नाव लाभले. वैज्ञानिक युगाच्या प्रारंभी, वेगळे विचार मांडणाऱ्या शास्त्रज्ञांची जशी हेटाळणी, अवहेलना होत असे, तशीच हिग्ज यांचीही झाली. हिग्ज मात्र त्यांच्या सिद्धांतावर ठाम होते आणि हिग्ज बोसॉन कणांचा शोध घेण्याचा सातत्याने पाठपुरावा करीत राहिले. पुढे जवळपास अर्धशतक उलटल्यावर २०१२ मध्ये युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर फिजिक्स म्हणजेच ‘सर्न’च्या शास्त्रज्ञांनी, हिग्ज यांच्या सिद्धान्तामधील कणांशी साधर्म्य सांगणारे मूलकण सापडल्याचे जाहीर केले आणि हिग्ज हेच बरोबर होते, हे सिद्ध झाले. निश्चितपणे, ब्रह्मांडाचे गूढ उकलण्याच्या मानवाच्या अथक प्रयासांच्या प्रदीर्घ वाटेवरील तो एक मैलाचा दगड आहे.

विशेष म्हणजे १९७०च्या दशकात हिग्ज आणि फ्रान्स्वा इंग्लर्ट हे दोघे स्वतंत्रपणे मूलकणांना वस्तुमान कसे प्राप्त होते, यावर संशोधन करीत होते. त्या दोघांच्याही संशोधनासाठी त्यांना २०१३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. प्रारंभी हेटाळणी केलेल्या अद्भुत प्रतिभेचा विज्ञान जगताने केलेला तो सन्मान होता. हिग्ज यांचे विज्ञानातील एकंदर योगदान सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानापेक्षा किती तरी मोठे आहे. ते केवळ शास्त्रज्ञच नव्हते, तर शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले हाडाचे शिक्षकही होते. त्यांची ज्ञानाची भूक आणि विज्ञानाप्रतीचे अतूट समर्पण अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी भौतिकशास्त्रज्ञांच्या काही पिढ्या घडविल्या. जगात फार थोडे शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांनी सर्वसामान्यांना विज्ञानाकडे आकृष्ट केले. हिग्ज यांचा त्या मोजक्या शास्त्रज्ञांमध्ये समावेश होतो. ते शास्त्रज्ञ म्हणून तर थोर होतेच; पण सोबतच अत्यंत सहृदयी, प्रामाणिक आणि विनम्र होते. असामान्य बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि जागतिक ख्यातीचे धनी असलेले हिग्ज प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करायचे; पण त्यांचे विज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानच एवढे प्रचंड होते, की प्रसिद्धीच त्यांच्या पायाशी लोळण घेत असे. प्रतिभा आणि परिश्रमांच्या बळावर एक व्यक्ती मानवी इतिहासावर किती मोठी छाप पाडू शकते, याचे हिग्ज हे उत्तम उदाहरण आहे! ते आज आपल्यात नसले, तरी अनादी काळापासून मनुष्यजातीला खुणावत असलेल्या ब्रह्मांडातील रहस्यांचा शोध घेण्याची प्रेरणा नेहमीच देत राहतील आणि त्या रहस्यांची उकल करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

Web Title: Today's Headline - The Eternal Peter Higgs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.