आजचा अग्रलेख: तुझ्या गळा, माझ्या गळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:41 IST2025-11-13T11:40:38+5:302025-11-13T11:41:01+5:30
US-India Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावरचे प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले आहे ! अमेरिकेने भारतावर जे पन्नास टक्के टॅरिफ लादले होते, ते कमी केले जाईल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. एवढेच म्हणून ट्रम्प थांबले नाहीत. तर...

आजचा अग्रलेख: तुझ्या गळा, माझ्या गळा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावरचे प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले आहे ! अमेरिकेने भारतावर जे पन्नास टक्के टॅरिफ लादले होते, ते कमी केले जाईल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. एवढेच म्हणून ट्रम्प थांबले नाहीत. ‘भारतीय माझ्यावर नाराज आहेत; पण मला खात्री आहे लवकरच ते माझ्यावर पुन्हा प्रेम करू लागतील !’, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. निमित्त होते, अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्जियो गोर यांच्या शपथविधीचे. नव्या जबाबदारीसाठी त्यांना सदिच्छा देताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांचा उल्लेख केला. उभय देशांमध्ये नवा करार लवकरच होईल अशी चिन्हे आहेत. भारत रशियाकडून तेल विकत घेतो, याचा अमेरिकेला त्रास आहे. आता ही खरेदी कमी झाल्यामुळे भारतासोबतचे संबंध सुरळीत होतील असे अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. म्हणजे, एकाअर्थाने या संबंधांची ती पूर्वअटसुद्धा आहे.
जगाची एकपंचमांश लोकसंख्या भारतात राहते. ही बाजारपेठ अमेरिकेला खुणावते आहे. अमेरिकेतील अनेक उद्योग भारतीय चालवतात. भारताला वगळून जागतिक बाजारपेठेत काही करता येणार नाही, याचे भान ट्रम्प यांना उशिरा का असेना आले हे महत्त्वाचे. मात्र, म्हणून भारतानेही अमेरिकेसाठी लगेच ‘रेड कार्पेट’ अंथरण्याचे कारण नाही. ‘अमेरिका फर्स्ट’ असे म्हणताना ट्रम्प यांना अमेरिकेशिवाय अन्य कोणाचाही विचार करायचा नसतो. ट्रम्प यांच्या स्वार्थांध आणि संकुचित भूमिकेमुळे जगाला धोक्याच्या वळणावर उभे केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले. याच पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद झाली होती. जगातील निम्मी लोकसंख्या या संघटनेमध्ये आहे. भारत, चीन आणि रशिया एकत्र आले तर जगाचे प्राक्तन बदलू शकते. अमेरिकेच्या दबावाखाली न जाता पर्याय शोधण्याचा निर्णय भारताने घेतला. जपान, चीन, रशिया यांच्याशी भारताचा संवाद सुरू आहे. त्यामुळे ट्रम्प भडकले. आता मात्र ते सामोपचाराची भाषा करत आहेत. साम-दाम-दंड-भेदचा वापर ट्रम्प करतात. मात्र, त्यांचा क्रम उलटा असतो. सुरुवातीला ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. मग धमकावतात. मग दंड लादतात. मग लालूच दाखवतात. हे सगळे करूनही भारत आपल्यासोबत येत नाही, हे समजल्यावर आता ट्रम्प प्रेमाची भाषा करू लागले आहेत. ट्रम्प परवा म्हणाले, ‘भारत हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अमेरिकेचा महत्त्वाचा आर्थिक आणि सामरिक भागीदार
आहे !- त्यांनी भारतावर तेल खरेदीमुळे पंचवीस टक्के दंडात्मक टॅरिफ लावले. हा दंड आणि इतर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ मिळून एकूण पन्नास टक्के आयात शुल्क झाले आहे. आता भारत आणि अमेरिका एका मोठ्या व्यापार कराराच्या उंबरठ्यावर आहेत. अमेरिकेची सोबत आपल्याला हवी आहेच. मात्र, आपले सार्वभौमत्व अधोरेखित करत ! या पार्श्वभूमीवर भारताने काही महत्त्वाच्या मागण्या ठामपणे मांडणे आवश्यक आहे. रशियन तेल खरेदीवरील पंचवीस टक्के दंड रद्द करण्यावर भर द्यावा. दुसरा मुद्दा म्हणजे, ट्रम्प प्रशासनाने लावलेल्या ‘रेसिप्रोकल टॅरिफ’वर टप्प्याटप्प्याने सवलत मिळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे, भारतीय वस्तूंसाठी अमेरिकी बाजारपेठ खुली होईल आणि अमेरिकी गुंतवणूकदारांनाही भारतात संधी मिळेल. उच्च तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि डिजिटल व्यापार क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबत सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. कृषी, औषध आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भारताने करावा.
गेल्या काही वर्षांत भारत-अमेरिका संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. संरक्षण, तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, शिक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये अभूतपूर्व सहकार्य वाढले आहे. आर्थिक सहकार्य वाढवणे, गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे आणि तंत्रज्ञान-संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करणे या आघाड्यांवर दोन्ही देशांची पावले एकाच दिशेने पडली, तर जगाचा राजकीय आणि आर्थिक नकाशा बदलू शकतो. ट्रम्प यांच्या नव्या सुरातून त्या बदलाची चाहूल मिळू लागली आहे. आधी गळा पकडणारे ट्रम्प आता ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ आळवू लागले असतील, तर आपल्याला हव्या असणाऱ्या मोत्यांच्या माळा भारतानेही गुंफून घ्यायला हव्यात !