आजचा अग्रलेख: दिल्ली : तख्त अन् रक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:19 IST2025-11-12T11:18:50+5:302025-11-12T11:19:19+5:30
Delhi Red Fort Attack: साप्ताहिक सुट्टीनंतर कामाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी, चांदनी चाैक ते लाल किल्ला या गजबजलेल्या परिसरात एका कारमध्ये झालेला स्फोट, त्यात डझनभर निरपराधांचा मृत्यू, वीसेक लोकांची इस्पितळात मृत्यूशी झुंज, या घटनेने राजधानी दिल्ली, तसेच देश हादरला आहे.

आजचा अग्रलेख: दिल्ली : तख्त अन् रक्त
साप्ताहिक सुट्टीनंतर कामाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी, चांदनी चाैक ते लाल किल्ला या गजबजलेल्या परिसरात एका कारमध्ये झालेला स्फोट, त्यात डझनभर निरपराधांचा मृत्यू, वीसेक लोकांची इस्पितळात मृत्यूशी झुंज, या घटनेने राजधानी दिल्ली, तसेच देश हादरला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात दु:ख व संताप व्यक्त होत आहे. त्या भीषण स्फोटानंतर अनेकांच्या उडालेल्या चिंधड्या, स्फोटानंतर सिग्नलवर थांबलेल्या अनेक गाड्यांना लागलेली आग आणि त्यात होरपळलेले प्रवासी हा सगळा प्रकार असह्य वेदना देणारा आहे. गेल्या एप्रिल महिन्यात काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेला निरपराध पर्यटकांचा संहार, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी राबविलेल्या आणि अचानक थांबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या जखमा अद्याप पूर्णपणे भरलेल्या नाहीत. भारताच्या कठोर प्रत्युत्तरामुळे पाकपुरस्कृत दहशतवादी कारवायांना आळा बसेल, किमान काही काळ तरी देशात, विशेषत: जम्मू-काश्मीर व उत्तर भारतात शांतता नांदेल, असे वाटत असताना थेट राजधानी दिल्लीत स्फोटाची घटना घडली.
जवळपास १४ वर्षांनंतर राजधानीत दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे सरकार, प्रशासन तसेच सामान्य नागरिक अशा सर्वांनाच चिंता वाटणे स्वाभाविक आहे. गृहमंत्री अमित शाह यांची तातडीने घटनास्थळी भेट, लोकनायक जयप्रकाश इस्पितळात जखमींची भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गृहमंत्र्यांशी चर्चा, या सर्व बाबी सरकारची चिंता अधोरेखित करणाऱ्याच आहेत. लगेच सरकारने जाहीर केले नसले, तरी हा स्फोट म्हणजे आणखी एक दहशतवादी हल्लाच आहे. म्हणूनच, त्याचा तपास एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांचे तपशील, काश्मीरशी जुळलेले त्यांचे धागेदोरे हे पाहता हा हल्ला अत्यंत सुनियोजितपणे केल्याचे स्पष्ट होते. स्फोटासाठी प्रचलित पद्धतीपेक्षा काहीतरी नवे तंत्र वापरल्याचे प्रथमदर्शनी दिसते. केंद्र तसेच राज्य सरकारांच्या विविध तपास यंत्रणा, दहशतवादविरोधी पथके गेले तीन दिवस विविध भागांत अशा हल्ल्यांचे षडयंत्र उघडकीस आणत असताना, त्यानिमित्ताने सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिलेला असताना हा हल्ला झाला, हे अधिक चिंताजनक आहे आणि त्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयशदेखील चव्हाट्यावर आले आहे. रविवारी गुजरात व उत्तर प्रदेशच्या एटीएसने एरंडाच्या बियांमधील सिरीन या विषारी रसायनांच्या मदतीने दहशतवादी हल्ला करण्याचा डाव उधळून लावला. एका डाॅक्टरसह तिघांना अटक केली. या तिघांनी म्हणे अहमदाबाद, लखनाैसह दिल्लीतही रेकी केली होती. पाठोपाठ, सोमवारी दिल्लीनजीकच्या फरिदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीमधील दोघांसह तीन डाॅक्टरांना स्फोटकांसाठी वापरले जाणारे जवळपास तीन टन अमोनियम नायट्रेट, काही टाइमर्स व शस्त्रांसह पकडण्यात आले. त्यात लखनाैच्या एका महिला डाॅक्टरचाही समावेश आहे. डाॅ. शाहीन शहीद नावाच्या या महिला डाॅक्टरकडे म्हणे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या जमात-उल-मोमिनात नावाच्या महिला आघाडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या आघाडीची धुरा कुख्यात दहशवातदी मसूद अजहरची बहीण सादिया सांभाळते.
दिल्लीतील स्फोटाचा संबंध गुजरात, हरयाणा व उत्तर प्रदेशातील दोन दिवसांच्या कारवायांशी दिसतो. धक्कादायक म्हणजे या कटामध्ये अत्यंत सुशिक्षित अशा काही डाॅक्टरांचा समावेश आहे. फरिदाबादमधीलच स्फोटके दिल्लीत वापरली गेली असे दिसते. याचा अर्थ स्पष्ट आहे - राजधानीपासून हाकेच्या अंतरावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा पर्दाफाश होत असताना, दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणांची संशयितांनी रेकी केलेली असतानाही दिल्ली पोलिसांनी अक्षम्य हलगर्जी दाखविली आणि त्याची किंमत निरपराधांच्या बळींच्या रूपाने देशाने मोजली. दिल्लीची पोलिस यंत्रणा थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचा देशभरातील आब राजधानीतील पोलिसांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. तेव्हा, दिल्ली स्फोटाचा कसून तपास केला जाईल, सखोल चाैकशी होईल, षडयंत्राच्या मुळाशी पोहोचू, कोणालाही सोडणार नाही, असे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आदींनी निक्षून सांगितले असले, तरी केवळ बाेलून, इशारे देऊन भागणार नाही. सरकारच्या इशाऱ्याला यंत्रणेच्या सतर्कतेचा आधार असावा लागतो. ...आणि कर्तव्यात कुचराई करणाऱ्यांना वेळेवर शिक्षा झाली, तरच यंत्रणा सजग राहते. हे लक्षात घेऊन हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळतानाच पोलिसांच्या अकार्यक्षमेसाठी जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.