आजचा अग्रलेख: विजेखालचा अंधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:01 AM2024-04-05T11:01:34+5:302024-04-05T11:01:46+5:30

नेमेचि येतो पावसाळा अथवा रोजचेच मढे, त्याला कोण रडे, अशा प्रकारच्या वाक्प्रचारात अनुस्युत अशा घटना, दुर्घटना आपल्या अवतीभवती नेहमीच ...

Today's Editorial: Darkness under electricity! | आजचा अग्रलेख: विजेखालचा अंधार!

आजचा अग्रलेख: विजेखालचा अंधार!

नेमेचि येतो पावसाळा अथवा रोजचेच मढे, त्याला कोण रडे, अशा प्रकारच्या वाक्प्रचारात अनुस्युत अशा घटना, दुर्घटना आपल्या अवतीभवती नेहमीच घडत असतात. क्षणभर स्तब्धता पाळून अथवा दोन-चार अश्रू गाळून त्यासंबंधातील औपचारिकता उरकून एरवी आपण मोकळे होतो. मात्र, अशा दुर्घटनांमधील जीवितहानी कधीच भरून निघू शकत नाही. रमजान महिन्यातील रोजचे सर्व धार्मिक कर्तव्य उरकून गाढ साखरझोपेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या एका कुटुंबातील सात जणांचा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून झालेला दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा आहे. दोन तान्हुली मुलं आणि आठ महिन्यांच्या गर्भवतीला श्वास घेण्यास देखील उसंत मिळाली नाही. अंधार खोलीत गुदमरून त्या निष्पाप जीवांचा करुण अंत झाला. ही दुर्घटना जितकी करुण, हृदयद्रावक तितकीच ती आपले डोळे उघडणारी देखील आहे. विजेचा अमर्याद, बेकायदा वापर, वापरातील बेमुरवतपणा आणि बेपर्वाई अंगाशी येऊ लागली आहे. नॅशनल सेफ्टी कौन्सिलच्या एका अहवालानुसार भारतात आगीच्या चाळीस टक्के घटना ह्या विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घडतात. आणि त्यात सुमारे दहा लाख लोकांचे हकनाक बळी जातात.

औद्योगिक अथवा व्यावसायिक वीज वापराचे सेफ्टी ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. हे ऑडिट कसे होते, हा भाग वेगळा, पण किमान त्यासाठी यंत्रणा तरी आहे. मात्र, घरगुती वीज वापरासाठी अशा प्रकारचे कोणतेही ऑडिट होत नसल्याने विजेचा गैरवापर होतो आणि त्यातून अशा दुर्घटना घडतात. संभाजीनगरातील कालच्या दुर्घटनेमागेसुद्धा विजेचा बेकायदा आणि अमर्याद वापर, हेच कारण असल्याचे समोर आले आहे. ज्या टेलरिंग दुकानात शॉर्टसर्किट झाले, त्या दुकानातील सर्व शिलाई मशीन्स आणि रात्रभर चार्जिंगला लावलेली ई-बाईक ही घरगुती वापराच्या वीज जोडणीवर होती. शिवाय, दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहाणाऱ्या भाडेकरुंच्या खोलीत पंखे आणि कुलर सुरू होते. एकाचवेळी एवढा वीजदाब असह्य झाल्याने वायरिंगने पेट घेतला आणि संपूर्ण दुकान आणि वरती राहणारे भाडेकरू कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या वेदनादायी घटनेमागे विजेचा बेसुमार, बेकायदा वापर आणि वापराबाबत असलेली बेपर्वाई कारणीभूत ठरली. वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे दुकानातील वीजजोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे संबंधिताकडून घरगुती मीटरवरच विजेचा वापर सुरू होता. घरगुती विजेची वायरिंग ही कमी क्षमतेची असते. त्यावर विजेचा जादा भार आल्याने शॉर्टसर्किट होऊन अशा दुर्घटना घडतात. मात्र, तरीही आपण आणि संबंधित यंत्रणा त्यातून काही बोध घेत नाही. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत वातानुकूलित यंत्रणा, कुलर, फॅन याचा वापर अधिक होत असल्याने विजेचा दाब येऊन आगींचे प्रमाण वाढते.

अनेकजण खर्च टाळण्यासाठी कमी दर्जाची अथवा अप्रमाणित अशी वीज उपकरणे वापरतात. त्यातून अशा घटना घडण्याची दाट शक्यता असते. घर अथवा इमारतीमधील वीज उपकरणे, वायर्स, केबल्स, केसिंग, पी.व्ही.सी. पाइप, स्वीचेस, सर्किट ब्रेकर्स आदींवर आय.एस.आय. मार्क आहे की नाही, याची शहानिशा केली जात नाही. शिवाय, विजेच्या व्होल्टेजनुसार योग्य क्षमतेचे फ्यूज, वायर्स, स्वीचेसचा वापर केला जात नाही. मल्टिपीन टॉप वापरून अनेक उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडली जातात. हे अत्यंत धोकादायक असते. ग्रामीण भागात वीज वितरण प्रणाली शेतकरी, पशुधनासाठी धोकादायक ठरत आहे. कृषिपंपाना वीजपुरवठा करणाऱ्या प्रणालीची देखभाल दुरुस्ती नियमितपणे केली जात नाही. अनेक ठिकाणी रोहित्रावरील फ्युज बॉक्सची दुरवस्था झालेली असते. जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा तुटून दुर्घटना घडतात. वीज सुरक्षेबाबत दक्षता बाळगण्यासाठी महावितरण विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण पुढे केले जाते. वीज चोरी हादेखील आपल्याकडील गंभीर प्रकार आहे.

घरगुती विजेचे ऑडिट केले तर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळल्या जावू शकतात. काही महापालिकांनी शासकीय व निमशासकीय तसेच शहरातील दुकाने, व्यावसायिक आस्थापनांना इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, हा निर्णय कागदावरच आहे. यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक नेते अशाप्रकारच्या उपाययोजनांच्या विरोधात असतात. ‘चोरीचा मामला’ त्यांच्या सोयीचा असतो. व्यवासायिक, औद्योगिक असो की घरगुती. वीज वापराचे, उपकरणांचे सेफ्टी ऑडिट होणे काळाची गरज आहे. आपल्याकडे विद्युत सुरक्षितता हा मुद्दा आजवर दुर्लक्षित आहे. मुळात, विद्युत साक्षरतेचाच अभाव असल्याने वीज असून सगळा अंधार आहे!

Web Title: Today's Editorial: Darkness under electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.