सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून, यंदाच्या सन्मानार्थीचे अभिनंदन! विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीयच नव्हे तर अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा गौरव हा पद्म पुरस्कारांमागचा मूळ उद्देश. देशपातळीवरचे हे सर्वोच्च सन्मान असल्याने ज्यांना ते द्यायचे ती नावे सर्वमान्य असावीत असा संकेत आहे. मात्र, अलीकडे अनेकदा त्यातील काही नावांवरून वादविवाद सुरू होतात. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नसून पद्म पुरस्कारार्थींपैकी काही नावांना आक्षेप घेतला जात आहे, तर काही नावे अपरिचित असल्याने त्याबाबत आश्चर्यही व्यक्त होत आहे. पद्मविभूषण पुरस्कारासाठी ५, पद्मभूषणसाठी १७, तर पद्मश्रीसाठी ११० जणांची नावे यावेळी घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, त्यात नेहमीप्रमाणे महाराष्ट्र अग्रेसर असून, यानिमित्ताने आपल्या राज्याच्या शिरपेचाला एका पद्मविभूषणासह तीन पद्मभूषण आणि ११ पद्मश्रींनी अधिक भारदस्तपणा आला आहे. प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाल्याने केवळ कलाक्षेत्रातच नव्हे, तर सामान्य चित्रपट रसिकांमध्येही समाधानाची भावना आहे. वास्तविक त्यांचे चित्रपटांतील योगदान पाहता त्यांच्या हयातीतच असा सन्मान होणे अधिक योग्य ठरले असते. पण, किमान आतातरी त्यांना तो जाहीर झाल्याने एक सच्चा आणि अखेरपर्यंत स्वतःतील माणूसपण जिवंत ठेवणाऱ्या कलावंताचा उचित सन्मान झाला आहे. प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, ॲड गुरू पीयूष पांडे (मरणोत्तर), उद्योजक उदय कोटक यांच्या रूपाने पद्मभूषण पुरस्कारही राज्याच्या वाट्याला आले आहेत.
पद्मश्रीच्या यादीत भारताचा माजी क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा, अभिनेता आर. माधवन व सतीश शहा, प्रख्यात तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, अशा सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वांसह राज्यातील इतर काही मान्यवरांची समावेश आहे. अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे आणि त्यातही कापूस उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्याचे तंत्र विकसित करून कृषी क्षेत्रात भरीव योगदान देणारे श्रीरंग लाड, आशियातील पहिली मानवी दुग्धपेढी उभारून मातेच्या दुधाला पारख्या झालेल्या नवजात बालकांना नवसंजीवनी देणाऱ्या आर्मिडा फर्नांडिस, मोझरीच्या श्री गुरुसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी झोकून दिलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी जनार्दन बोथे, तारपा या पारंपरिक आदिवासी वाद्याचे केवळ जतन व संवर्धनच नव्हे तर त्याचा नव्या पिढीपर्यंत प्रचार-प्रसार करणारे आदिवासी कलावंत भिकल्या लाडक्या धिंडा, सैफी बुरहानी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुझेर वासी, तेल आणि वायू कंपन्यांना अवघड असे तंत्रज्ञान पुरविणारे अशोक खाडे आणि लष्करी ड्रोननिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सत्यनारायण नुवाल या महाराष्ट्रातील मान्यवरांच्या कार्यावर आता पद्मश्रीची मोहोर उठली आहे. छत्तीसगडसारख्या अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा आणि सामाजिक उत्थानाची जबाबदारी पार पाडणाऱ्या डॉ. रामचंद्र व सुनीता गोडबोले या मूळ महाराष्ट्रीय दाम्पत्याचे सेवाकार्यही पद्मश्रीमुळे अधोरेखित झाले आहे. तिन्ही पद्म पुरस्कारार्थींच्या यादीतील काही नावे मात्र भुवया उंचावणारी आहेत. भगतसिंह कोश्यारी हे त्यांपैकी एक. सार्वजनिक जीवनासाठी कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झाला असली तरी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती. राज्यपाल म्हणून त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची होता होईल तेवढी कोंडी तर केलीच, पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी घडवून आणत आपल्यातील अस्सल राजकारण्याचे रंगही दाखवले.
एकूण पाच पद्मविभूषणांपैकी माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पी. नारायणण आणि सार्वजनिक व्यवहारासाठी के. टी. थॉमस असे तिघे केरळ या एकाच राज्यातील आहेत. नजीकच्या काळात केरळात निवडणुका असल्याने आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपला तिथे जम बसवायचा असल्याने या तिघांची निवड केली गेल्याचा आक्षेपही घेतला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी बांधील असलेल्या तसेच फारसे परिचित नसलेल्या चेहऱ्यांचा समावेश अलीकडे पद्म पुरस्कारांमध्ये वाढत असल्याची टीका सुरू झाली आहे. मात्र, केंद्रातील सरकार ज्या विचारसरणीचे असेल त्याला असे झुकते माप आजवर नेहमीच मिळत आले आहे, हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. शेवटी राजकारण हे सर्वव्यापी असल्याने पद्म पुरस्कार असोत की अन्य कोणते सन्मान; त्याला आपल्याकडे वादाची फोडणी मिळत राहणार, हेही तेवढेच खरे.
Web Summary : Padma awards announced, honoring exceptional contributions. Maharashtra leads with multiple awards, including a posthumous Padma Vibhushan for Dharmendra. Some selections face criticism, while others raise eyebrows. Political leanings in choices spark debate.
Web Summary : पद्म पुरस्कारों की घोषणा, असाधारण योगदानों का सम्मान। महाराष्ट्र कई पुरस्कारों के साथ आगे, धर्मेंद्र को मरणोपरांत पद्म विभूषण। कुछ चयन आलोचना का सामना करते हैं, जबकि अन्य आश्चर्यचकित करते हैं। विकल्पों में राजनीतिक झुकाव बहस छेड़ता है।