असे आहेत खरे बाबासाहेब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 03:18 IST2016-04-14T03:18:07+5:302016-04-14T03:18:07+5:30
बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२५वी जयंती. या निमित्ताने गेले वर्षभर विविध प्रकारचे जे कार्यक्रम आयोजित केले गेले, त्यांचे सूत्र बाबासाहेबांचे मोठेपण सांगणे, इतक्यापुरतेच मर्यादित होते.

असे आहेत खरे बाबासाहेब !
बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२५वी जयंती. या निमित्ताने गेले वर्षभर विविध प्रकारचे जे कार्यक्रम आयोजित केले गेले, त्यांचे सूत्र बाबासाहेबांचे मोठेपण सांगणे, इतक्यापुरतेच मर्यादित होते. त्यातही पुन्हा ‘घटनाकार बाबासाहेब’ एवढा एकच मुद्दा चर्चेला घेतला गेला. आजच्या काळाच्या संदर्भात बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व काय, हे सांगण्याचा फारसा प्रयत्न झालाच नाही, कारण तसे करणे समाजातील सर्वच घटकांच्या, अगदी दलितांच्याही दृष्टीने गैरसोईचे आहे. उलट ‘बाबासाहेब आमचेच आणि इतरांनी त्यांची उपेक्षा केली,’ अशाच आविर्भावात सगळे कार्यक्रम पार पडले. बाबासाहेबांना असे ‘आपलेपणा’त एकदा बंदिस्त करून टाकले की, त्यांच्या मूलगामी परिवर्तनाच्या विचाराकडे सहज डोळेझाक करता येते, हे समाजातील दैवतीकरणाच्या प्रबळ प्रवृत्तीचा राजकीय फायदा उठविण्यासाठी टपलेल्या राजकारण्यांना चांगलेच ठाऊक असते. त्यामुळेच ‘हिंदू धर्मात जन्मलो असलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही,’ असे जाहीर करणारे बाबासाहेब ‘आमचेच’ असे बिनदिक्कतपणे संघ परिवारही म्हणू शकतो. याच न्यायाने ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ एकत्र येऊ शकतात. केवळ बाबासाहेबांचे पुतळे उभारून किंवा त्यांच्या नावाचे बगीचे तयार करून बहुजन समाज पक्ष व त्याच्या नेत्या मायावती ‘दलितांचे आपण कैवारी’ असा आवही आणतात. दलितांसाठी विविध योजना व कार्यक्रमांची भेंडोळी उलगडून दाखवत काँगे्रस त्यांची मते मिळवू पाहते आणि त्याच वेळी पक्षाचे पाठीराखे मानले गेलेले गावोगावचे वजनदार समाज घटक दलितांवर अन्याय करीत असताना, त्यांच्याकडे सहज डोळेझाकही करीत राहते. एकूण बिगर दलित समाजाचा दृष्टिकोन हा ‘तुम्हाला राखीव जागा दिल्या, आता तुम्ही तुमचा उत्कर्ष साधा,’ असा असतो. थोडक्यात, पोपटपंची करण्यापलीकडे बाबासाहेबांच्या मूलगामी परिवर्तनाच्या मानवमुक्तीच्या वैश्विक विचारांकडे बघण्याचे फारसे भानही कोणाला नसते, कारण बाबासाहेब हे ‘दलितांचे नेते’ ठरवले गेले आहेत. विशेष म्हणजे, दलित समाजातही असा एक विचारप्रवाह आता आकार घेऊ लागला आहे की, बाबासाहेबांनी जे काही म्हटले वा लिहिले, त्याचे विश्लेषण फक्त दलितच करू शकतात, कारण बिगर दलित अभ्यासक भले प्रगल्भ जाणिवांचा असेल, पण त्याच्या नेणिवेत जातिव्यवस्थेचा अंश उरलेला असतोच. थोडक्यात, बिगर दलितांनी आणि दलितांनीही बाबासाहेबांना ‘दलितांचे नेते’ म्हणून एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे. मग खरे बाबासाहेब कोण होते? आज ‘राष्ट्र व राष्ट्रवाद’ या दोन संकल्पनांवरून वाद होत आहेत. यावर बाबासाहेबांचे मत होते की, ‘ज्या समाजाचा पायाच अन्याय व शोषण यावर आधारलेला आहे, तो समाज जेथे राहतो, तो भूभाग ‘राष्ट्र’ कसा ठरेल?’ ‘न्याय्य समाजव्यवस्था’ असेल, तरच एखादा भूभाग राष्ट्र ठरतो, असा बाबासाहेबांच्या या म्हणण्याचा मतितार्थ होता. शोषण व अन्याय यावर आधारलेली जातिव्यवस्था हा ज्या हिंदू समाजाचा अंगभूत भाग आहे, तो समाज स्वत:ला भले ‘राष्ट्र म्हणो, पण ते खरे ‘राष्ट्र’ ठरत नाही, असे त्यांचे विश्लेषण होते. दलितांना खरी मुक्ती मिळवून द्यायची असेल, तर ‘सुधारणां’ऐवजी परंपरा मोडीत काढणे गरजेचे आहे आणि जातिव्यवस्था ही मूलत: ‘सत्तेची पकड’ पक्की ठेवण्याचा एक भाग म्हणून ब्राह्मणी प्रवृत्तीने आकाराला आणली, असे बाबासाहेब म्हणत. त्यासाठीच हिंदू धर्मातील ‘रिडल्स’ उलगडून दाखवणारे पुस्तक त्यांनी लिहिले. आज त्यांना ‘आपले’ म्हणणारे हिंदुत्ववादी या ‘रिडल्स’वर बोलणे सोईस्करपणे टाळतात. दलितांना न्याय मिळवून द्यायचा असल्यास, शोषणास व अन्यायास आधारभूत ठरणाऱ्या हिंदू धर्मातील परंपरा नष्टच कराव्या लागतील, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. हैदराबादाच्या केंद्रीय विद्यापीठात ‘आंबेडकर-पेरियार मंच’ व वेमुला प्रकरणावरून जो वाद अलीकडेच पेटला, त्याचे मूळ हे बाबासाहेबांच्या या विचारांचा आग्रह दलित विद्यार्थ्यांनी धरला, हेच आहे. हा वाद ‘विद्यापीठा’पुरता मर्यादित नव्हता व नाही. भारतीय राजकीय-सामाजिक विचारविश्वात एक नवी संघर्षरेषा तयार होत आहे. जो उच्चशिक्षित दलित तरुण आहे, तो बाबासाहेबांच्या या मूलभूत विचारांकडे वळत आहे आणि बाबासाहेबांना ‘घटनाकार’ म्हणून मर्यादित ठेऊ पाहणाऱ्या प्रस्थापित दलित नेतृत्वाला तो बाजूला सारत आहे. ‘राष्ट्र्रभक्ती व राष्ट्रविरोधी’ या वादाचा हा आयाम सध्याच्या चर्चांत फारसा विचारात घेतला गेला नाही, कारण बाबासाहेबांचे हे मूलभूत विचारविश्व ‘पुस्तका’त बंद करून ठेवणेच सगळ्यांना सोईचे वाटत असते. वस्तुत: हे खरे बाबासाहेब आहेत व त्यांचे हे विचार आजच्या काळाच्या संदर्भात जनतेपुढे आणणे, हा त्यांची जयंती साजरी करण्याचा वा पुण्यतिथी पाळण्याचा ‘पॅटर्न’ बनवला गेला पाहिजे. तसे झाल्यासच बाबासाहेबांचे युगप्रवर्तकत्व खऱ्या अर्थाने प्रकाशात येईल.