स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:19 IST2025-04-20T12:16:45+5:302025-04-20T12:19:07+5:30

How to Reduce Mobile Addiction in Children: शाळेला मोठ्ठी सुट्टी म्हणजे मुलांना मजा आणि पालकांना सजा असं अनेक पालकांना वाटतं. दिवसभराचा मोकळेपणा मुलं कशात घालवतील, याची चिंता पालकांना वाटते. शिवाय स्क्रीनमध्ये अखंड डोकं घालून बसतील याची भीती!  मुलांना अनेकविध आकर्षक गोष्टींचे पर्याय देता येतात.   

there are so many things you can do for your children as a parent to reduce mobile addiction in children | स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

- शुभदा चौकर, मुक्त पत्रकार
मुलांना नात्यांचे बंध जाणवतील अशा आप्त-मित्रांकडे थोडे दिवस राहायला पाठवा. त्यांच्या मुलांना स्वत:कडे बोलवा. त्या दिवसांत सर्व बच्चे कंपनीसह एका मोठ्या व्यक्तीने जवळपास फिरणे, नाटक-सिनेमा-वाचन-कलाकुसर-खेळ-भरपूर गप्पा अशा विविध उपक्रमांची योजना करा.

सुट्टीत प्रवासाला जाताना त्या प्रवासात पालक, मुले यांच्यात संवादांच्या अनेक नव्या संधी मिळतात. तो वेळ पालकांनी पूर्णपणे मुलांना द्यावा. मुलांच्या मनात खूप कुतूहल असतं. लांबवर ट्रेनने जाताना वाटेत एखाद्या ट्रेनच्या पँट्रीतील व्यवस्था,  वाटेत दिसणाऱ्या प्रदेशाची खासियत, खिडकीच्या बाहेरची दृश्यं... 

अशा कितीतरी गोष्टींबद्दल मुलांशी गप्पा झाल्या पाहिजेत. जिथे जातो तिथल्या लोकांच्या राहणीमानात अनेक गोष्टी वेगळ्या असू शकतात. तिथला दिनक्रम, खाण्यापिण्याच्या सवयी, घरं, भाषा, शाळा, उद्योग-व्यवसाय यांत फरक असतात. सुट्टीतल्या प्रवासात आपण असे जितके अनुभव घेऊ, तेवढ्या मुलांच्या मनाच्या खिडक्या समृद्ध होतात. 

सुट्टीतल्या प्रवासाच्या आखणीत मुलांना सहभागी करून घ्या. ठिकाणं ठरवणं, बुकिंग करणं, वेळापत्रक तयार करणं ही कामं मुलं करू शकतात. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.  

स्वत:च्या हातांनी काही कलाकृती करण्याचा एखादा प्रोजेक्ट घेता येतो. क्विलिंगची ग्रीटिंग, ओरिगामीची वस्तू, रुमालावर भरतकाम, घराजवळ किंवा गच्चीत बागकाम, घरातला एखादा कोपरा किंवा भिंत रंगवणं, असे प्रोजेक्ट हाती असले की मुलं त्यात गुंतून राहतात. 

यांत बहुतांश जबाबदारी मुलांची आणि वेळ मिळेल तितका सहभाग पालकांचा असला की तो पूर्ण कुटुंबाचा प्रकल्प होतो. कायम लक्षात राहतं ते काम. एखादा खेळ किंवा कला शिकण्याचं ठरवू शकतो. 

मुलं आसपासच्या एखाद्या उद्योग प्रकल्पात नियमित थोडा वेळ मदतीला गेली तर त्यातून खूप काही शिकायला मिळतं. उदा. आंबा व्यावसायिकाकडे आढी लावायला मदत, झाडांच्या नर्सरीत जाणं, इ.
  
परिसरातील काही हटके करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती मुलांनी घेणं, त्याचा व्हिडिओ करणं, यातही मुलांना मजा येऊ शकते. अशाने त्या आगळ्या गोष्टींची माहिती मिळते, शिवाय मुलं आपल्या आसपासच्या समाजाशी जोडली जातात.  

वाचनात रमण्याची सवय लावण्यासाठी हा काळ नक्की वापरावा. मोठ्यांनी मुलांना वाचून दाखवावं. मुलांनी गटाने पुस्तक वाचणं, त्यावर गप्पा मारणं, त्यावर नाटुकली बसवणं- अशाने त्यांची वाचनाची रुची वाढते. 
 
जी जी लाइफ स्किल्स म्हणजे जीवनकौशल्यं कमी असतील ती सुधारण्यासाठी मुलांना सुट्टीकाळात ते अनुभव आवर्जून द्यावे. पोटापुरता स्वयंपाक, घरातील अन्य कामे- उदा, साफसफाई, गरजेपुरते शिवण, बाजारहाट, घराचे बजेट आखणे, इ. 

आसपासच्या समवयस्क मुलांशी मैत्री करण्याची संधी मुलांना मिळायला हवी. त्यांच्याबरोबर थोडा वेळ मैदानी खेळायला, जवळपास भटकायला वाव मिळाला तर उत्तम. घरगुती विज्ञानाचे काही प्रयोग करणं... यासाठी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. 

कान-डोळे उघडे ठेवून खुल्या मनाने वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याच्या  अनेक संधी मुलांना मिळायला हव्या. हातातल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनपेक्षा खूप वेगळे, आकर्षक आणि टिकाऊ अनुभव मुलांना मिळाले की ते त्यांत रमतात. 

मोठेपणी त्यांना एकेका सुट्टीतली प्रत्येक मजा आठवेल अशा आठवणी मुलांपाशी जमा व्हायला पाहिजेत. 
स्क्रीन हे माध्यम आहे, ते केव्हा, कशासाठी आणि किती वापरायचं याचं भान मुलांना यायला हवं. त्यासाठी पालकांनी मुळात स्क्रीनवर टाइमपास न करणं, मुलांशी या विषयाबद्दल सतत बोलत राहणं आणि घरात स्क्रीनच्या वापराबाबत काही नियम सगळ्यांसाठी करणं आवश्यक आहे. त्याला पर्याय नाही.
 

Web Title: there are so many things you can do for your children as a parent to reduce mobile addiction in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.