कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्फोटाचे जग! नोकऱ्या खाणाऱ्या ‘एआय’चा सामना कसा करायचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:03 IST2025-11-24T06:02:40+5:302025-11-24T06:03:02+5:30
भविष्यात कोणतेही काम करण्यासाठी कंपन्यांना तंत्रस्नेही असलेले तरीही मानवी भावनेची कास न सोडणारे कर्मचारी हवे असतील. तुम्हाला हे जमेल?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्फोटाचे जग! नोकऱ्या खाणाऱ्या ‘एआय’चा सामना कसा करायचा?
डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष
भारतीय तंत्रशिक्षण परिषद
आजचे जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्फोटाचे जग आहे. आपण भविष्यात कालबाह्य ठरू नये म्हणून अनेक लोक सतत नवनवीन कौशल्य शिकत आहेत. त्यासाठी रिस्किलिंग, अपस्किलिंग करत आहेत. गेल्या वर्ष-दोन वर्षांत अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. एआय, ऑटोमेशन, कौशल्यांची उणीव आणि कॉस्टकटिंग ही त्यामागील प्रमुख कारणे. कार्यप्रणालीची रचना सुधारणे आणि काम पूर्ण करण्याच्या वेगाच्या नावाखाली फक्त भारतीय कंपन्यांच नाही, तर जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्याही अशी कपात करत आहेत.
कर्मचारी कपात ही एक बाजू, पुढे अजून पुनर्रचना होईल, त्या रचनेचा परिणाम उमेदवारी स्तरापासून वरिष्ठ पातळीपर्यंत काम करणाऱ्या सर्वांवर होऊ शकतो. याचा थेट परिणाम अनेकांवर होत आहे. आपल्याला नोकरी असेल की नसेल, या विचाराने अनेकांना चिंतेत टाकले आहे. आपण (आणि आपले शिक्षण) कालबाह्य ठरू का, याची टांगती तलवार अनेकांच्या डोक्यावर आहे. एआय हे आता भविष्य नाही, ते वर्तमान आहे. ग्राहक सेवेसाठी काम करणारे चॅटबॉट्स ते स्वयंचलित वाहने अशा अनेक क्षेत्रांमधील नोकऱ्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम होत आहे.
वाफेच्या इंजिनापासून ते इंटरनेटपर्यंत प्रत्येक नवीन शोधाने काही नोकऱ्या कमी केल्या; पण नवीन नोकऱ्या निर्माणही केल्या. त्यामुळे ‘तुमच्या कार्यक्षेत्रात एआयमुळे बदल होतील का?’ हा प्रश्न नाही, कारण ते बदल आधीच झाले आहेत. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्फोटामध्ये तुम्ही टिकून कसे राहणार, हा प्रश्न मात्र आहे. कामाचे स्वरूप बदलत आहे हे स्वीकारणे आणि पूरक अडॅप्टिव्ह स्किल्स विकसित करणे हेच या प्रश्नाचे उत्तर होय. एआय नोकऱ्या संपवत नाही, त्यांचे स्वरूप बदलवते आहे. डेटा एंट्री, इनव्हॉइस या गोष्टी वेगाने होतात, पण त्यामुळे अकाउंटंट्सचे महत्त्व किंवा गरज कमी होत नाही. हे अकाउंटंट्स आता धोरणात्मक नियोजन, वित्तीय विश्लेषण याकडे वळले आहेत. रेडिओलॉजिस्ट्स हे एआयचा वापर चाचण्यांमधील त्रुटी समजून घेण्यासाठी करत असले तरी त्या परिस्थितीत योग्य वैद्यकीय निदान करणे, रुग्णांना त्याबाबत माहिती देणे, यासाठी आजही मानवी कौशल्यांचीच गरज भासते.
आखून दिलेल्या चौकटीत करायचे काम एआय करेल; पण नवनिर्मिती, नीतिमूल्यांशी संबंधित निर्णय आणि भावनिक बुद्धिमत्तेची गरज असेल तिथे त्यासाठी माणूसच लागेल. त्यामुळे एखाद्याला काय माहिती आहे यापेक्षा तो किती पटकन नवीन गोष्ट शिकू शकतो हे जास्त महत्त्वाचे आहे. थोडक्यात, आज कार्यरत असलेल्या प्रत्येकाने आपल्याला सगळे येते या भ्रमात न राहता आजन्म विद्यार्थी म्हणून नवनवीन शिकायची तयारी ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात कोणतेही काम करण्यासाठी कंपन्यांना तंत्रस्नेही असलेले तरी मानवी भावनेची कास न सोडणारे कर्मचारी हवे असतील. गिग इकॉनॉमीमुळे कौशल्य आणि पैसे कमावणे यात फरक करणे सोपे झाले आहे. एकाच नोकरीवर अवलंबून न राहता हायब्रिड करिअर - उदा. नोकरी, फ्रिलान्सिंग आणि उद्योग-व्यवसाय असे एकत्रित करिअर हेच भविष्य आहे.
एआयच्या मदतीने मानवी समस्या सोडवण्यासाठी काम करणे हेही नवीन आहे. शिक्षक पर्सनलाइज्ड शिकवण्या घेऊ शकतात. शेतकरी एआय पॉवर्ड ड्रोन्स वापरून शेतीत अधिक नफा कमवू शकतात. स्वयंसेवी संस्था सॅटेलाइट डेटा वापरून बेकायदेशीर जंगलतोड किंवा ट्रॅफिकिंगसारख्या गोष्टींचा माग काढू शकतात. छोट्या व्यवसायांसाठी एआय लिटरसी कन्सल्टिंग ही स्टार्टअप म्हणून महत्त्वाची संधी आहे. एआयचा विस्फोट अटळ आहे, पण त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो हे आपल्यावर अवलंबून आहे. जे बदलत्या काळाबरोबर स्वतःला बदलायला तयार नाहीत, त्यांचे भवितव्य कठीण आहे. एआयमुळे संधी जाणार नाहीत, त्यामुळे ऑग्मेंटेड इंटेलिजन्सचे युग अवतरेल. भविष्यातले काम, करिअर हे मोड्युलर स्वरूपाचे असेल. नोकरी, फ्रिलान्सिंग आणि उद्योग-व्यवसाय यांच्या मिश्रणातून ते आकाराला येईल. त्यासाठी लागणारी लवचीकता मिळवून देण्यात एआयचा पायाच महत्त्वाचा असेल.