- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद
गेल्या काही दशकांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येते की, साधारणपणे दर आठ ते नऊ वर्षांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे राहिलेले दिसते. या आंदोलनांनी केवळ रस्त्यावरची लढाई लढली नाही, तर देशाच्या कायदेशीर चौकटीतही मूलभूत बदल घडवून आणले. या संघर्षाची पाळेमुळे ‘मथुरा’ बलात्कार प्रकरणात आढळतात. पोलिस कोठडीत झालेल्या या अत्याचाराच्या प्रकरणात जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने पोलिसांना निर्दोष सोडले, तेव्हा देशभरात संतापाची लाट उसळली. महिला संघटनांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हजारो पत्र पाठवून दाद मागण्यात आली. या अभूतपूर्व प्रतिसादानंतरच बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली.
असाच एक महत्त्वाचा लढा राजस्थानमधील भवरीदेवी यांच्या निमित्ताने उभा राहिला. बालविवाह थांबवण्याचे धाडसी प्रयत्न केल्यामुळे सूडबुद्धीने त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मात्र, सामाजिक संघटनांच्या पाठबळामुळे भवरीदेवींनी खचून न जाता, अन्यायाविरोधातील एक जिवंत प्रतीक म्हणून स्वतःला झोकून दिले. त्यांच्या या जिद्दीने महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देणाऱ्या कायद्यांचा पाया रचला.
सन २०१२च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणाने तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले. एका चालत्या बसमध्ये झालेल्या अमानूष अत्याचाराने जनसामान्यांच्या भावनांचा बांध फुटला. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत मेणबत्त्या घेऊन निघालेले मोर्चे आणि पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून तरुण पिढीने दिलेला लढा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला. दुर्दैवाने, दहा - अकरा दिवसांच्या संघर्षानंतर निर्भयाचा मृत्यू झाला, पण तिने पेटवलेली मशाल विझली नाही.
या आंदोलनानंतर नियुक्त करण्यात आलेल्या जस्टिस वर्मा समितीच्या शिफारशींमुळे कायद्यात तीन महत्त्वाचे बदल झाले. पहिले म्हणजे, बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीसाठी निश्चित प्रोटोकॉल तयार करण्यात आला. दुसरे, खून आणि बलात्कार अशा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आणि तिसरे म्हणजे, पीडितेची ओळख व नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे कडक नियम लागू झाले.
आज ‘निर्भया’ या नावाने अनेक नाटके आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. काही ठिकाणी या नावाचा वापर दुर्दैवाने मार्केटिंगसाठीही झाले, पण ‘निर्भया’ हे नाव आता केवळ एका व्यक्तीचे राहिले नसून ते अत्याचाराविरूद्धच्या धैर्याचे प्रतीक बनले आहे. आजही अनेक निर्भया आपल्या समाजात न्यायासाठी लढताना दिसतात. कायद्याचे नियम कडक झाले असले तरी आजही आरोपींना शिक्षा होईपर्यंत अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते.‘नव्याने जन्मेन मी’ म्हणणारी निर्भया प्रत्येक आंदोलनाच्या रुपाने आपल्याला पुन्हा भेटत असते. प्रश्न फक्त एवढाच उरतो की, या आंदोलनांना यश मिळून महिलांवरील अत्याचारांचा हा सिलसिला नेमका कधी थांबणार? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. neeilamgorhe@gmail.com