व्हायरल होण्याची किंमत? ५० लाख रुपये आणि एक खून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:59 IST2026-03-17T07:59:19+5:302026-03-17T07:59:43+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे. प्रसिद्धीच्या हव्यासाने जर माणुसकीचाच बळी जात असेल, तर त्या प्रसिद्धीचे मूल्य काय?

व्हायरल होण्याची किंमत? ५० लाख रुपये आणि एक खून!
नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राध्यापक राजाराम लोंढे यांच्या हत्येची घटना ही केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. ती आजच्या समाजात वेगाने वाढत चाललेल्या एका विकृत मानसिकतेचे भयावह प्रतिबिंब आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासाने माणुसकीचा कसा बळी जात आहे, याचे हे धक्कादायक उदाहरण आहे.
तथाकथित ‘रीलस्टार’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या विशाल राठोडने ‘लव्ह अँड डेअर’ नावाचा रिॲलिटी शो बनविण्याच्या बहाण्याने प्रा. लोंढे यांच्याकडून ५० लाख रुपये घेतल्याचे समोर आले. पैसे परत करण्याचा तगादा वाढताच त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला. एका चित्रपटातील कथानकाची नक्कल करत त्याने मित्रांच्या मदतीने प्रा. लोंढे यांच्या हत्येचा कट रचला आणि तो अंमलात आणला. गुन्ह्याची पद्धत पाहून पोलिसही काही काळ चक्रावून गेले. एका सुशिक्षित व्यक्तीचा जीव घेऊनही स्वतःची डिजिटल प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न केला जातो, ही बाब समाजाला अस्वस्थ करणारी आहे.
डिजिटल क्रांतीने संवाद आणि माहितीच्या देवाणघेवाणीला अभूतपूर्व वेग दिला. सोशल मीडियामुळे अभिव्यक्तीचे लोकशाही स्वरूप मजबूत झाले, हे नाकारता येत नाही. मात्र याच माध्यमाने एक वेगळी स्पर्धाही निर्माण केली. लाइक्स, फॉलोअर्स आणि व्ह्यूज यांच्या आकड्यांची. सोशल मीडियावर व्हायरल होणे म्हणजेच यशाचे प्रमाणपत्र असल्याचा एक भ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे क्षणिक प्रसिद्धीसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रसिद्धी मिळवण्यासाठी कष्ट, प्रतिभा आणि समाजोपयोगी कामगिरी आवश्यक मानली जात होती. आज मात्र लक्ष वेधून घेणे हेच अनेकांचे मुख्य ध्येय बनले आहे. थरारक, विचित्र किंवा धक्कादायक कृती करून प्रसिद्धी मिळवण्याचा शॉर्टकट स्वीकारला जात आहे. ‘कंटेंट’च्या नावाखाली हिंसा, धोकादायक स्टंट, अश्लीलता किंवा कायद्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या कृतींचे प्रदर्शन सोशल मीडियावर वाढताना दिसते. या सर्व गोष्टी मनोरंजनाच्या नावाखाली सामान्य मानल्या जाऊ लागल्या आहेत.
या प्रवृत्तीमागे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची रचनादेखील कारणीभूत ठरते. सनसनाटी किंवा वादग्रस्त सामग्री अधिक वेगाने पसरते आणि त्यालाच अधिक प्रतिसाद मिळतो. परिणामी, अधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट अधिक महत्त्वाची असल्याचा चुकीचा संदेश समाजात पसरतो. अल्गोरिदम लोकप्रियतेच्या आकड्यांवर भर देतो; परंतु त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक परिणामांकडे दुर्लक्ष होते.
यातून आणखी एक धोकादायक प्रवृत्ती पुढे येते. गुन्हेगारीचे ग्लॅमरायझेशन. काही गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा ‘डिजिटल सेलिब्रिटी’ म्हणून उभी करण्याचा प्रयत्न करतात. महागड्या गाड्या, शस्त्रांचे प्रदर्शन, धाडसी स्टंट किंवा बेकायदेशीर कृत्यांचे व्हिडीओ यांमधून ते स्वतःभोवती वलय निर्माण करतात. दुर्दैवाने काही तरुण या प्रतिमांना प्रभावी मानू लागतात. त्यामुळे गुन्हेगारीकडे आकर्षण वाढण्याचा धोका निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारीही मोठी ठरते. हिंसक, धोकादायक किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या सामग्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तक्रारीनंतर कारवाई करण्याऐवजी अशा प्रवृत्ती आधीच ओळखून त्यांना रोखण्याची जबाबदारी या प्लॅटफॉर्मनी स्वीकारली पाहिजे.
तितकेच महत्त्वाचे म्हणजे कुटुंब आणि समाजाची भूमिका. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वाढत आहे. त्यांना डिजिटल साक्षरता, नैतिक मूल्ये आणि जबाबदार अभिव्यक्तीचे शिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे. प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा संवेदनशील आणि जबाबदार नागरिक होणे अधिक महत्त्वाचे आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनीही अशा घटनांकडे केवळ गुन्हेगारी म्हणून न पाहता सामाजिक प्रवृत्ती म्हणून पाहणे आवश्यक आहे. गुन्ह्यांचे डिजिटल प्रदर्शन करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
छत्रपती संभाजीनगरातील ही घटना समाजासाठी धोक्याची घंटा आहे. प्रसिद्धीच्या हव्यासाने जर माणुसकीचाच बळी जात असेल, तर त्या प्रसिद्धीचे मूल्य काय? सोशल मीडिया ही संवाद आणि अभिव्यक्तीची साधने आहेत; ती हिंसक महत्त्वाकांक्षेचे व्यासपीठ होऊ नयेत. व्हायरल होण्याच्या हव्यासात जर मानवी संवेदनाच हरवत असतील, तर त्या संस्कृतीचा समाजाने गांभीर्याने पुनर्विचार करणे अत्यावश्यक ठरेल.
nandu.patil@lokmat.com