मेक्सिकोत थेट राष्ट्राध्यक्षांचीच छेडछाड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:51 IST2025-11-12T10:49:13+5:302025-11-12T10:51:14+5:30
Mexico News: मेक्सिको सध्या अनेक कारणांनी गाजत आहे. थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ‘मिस मेक्सिको’ फातिमा बोशला स्पर्धेच्या थायलंडमधील संचालकांनी मंचावरच सर्वांसमोर मूर्ख म्हटलं. हे कमी की काय, म्हणून खुद्द मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांची मेक्सिकोच्या राजधानीत थेट रस्त्यावरच छेडछाड करण्याचा प्रयत्न एका मद्यपीने नुकताच केला.

मेक्सिकोत थेट राष्ट्राध्यक्षांचीच छेडछाड!
मेक्सिको सध्या अनेक कारणांनी गाजत आहे. थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ‘मिस मेक्सिको’ फातिमा बोशला स्पर्धेच्या थायलंडमधील संचालकांनी मंचावरच सर्वांसमोर मूर्ख म्हटलं. हे कमी की काय, म्हणून खुद्द मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांची मेक्सिकोच्या राजधानीत थेट रस्त्यावरच छेडछाड करण्याचा प्रयत्न एका मद्यपीने नुकताच केला.
या दोन्ही घटनांवरून मेक्सिको सध्या चांगलंच गाजत आहे. देशाची महिला राष्ट्राध्यक्षच सुरक्षित नसेल, त्यांनाच जर छेडछाडीला सामोरं जावं लागत असेल तर सामान्य जनतेचं काय, असा प्रश्न जगभरातून विचारला जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांच्यासोबत एक व्यक्ती छेडछाड करत आहे, त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत आहे, असं दिसतं आहे. ही घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया राजधानी मेक्सिको सिटी येथे राष्ट्रीय राजवाड्यातून शिक्षण मंत्रालयाकडे एका बैठकीसाठी पायी जात होत्या. क्लॉडिया यांनी यासंदर्भात पोलिसांकडेही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, खुद्द देशाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत असं होणं अतिशय धक्कादायक आहे. चिल्लर गुंडांचीही हिंमत इथपर्यंत पोहोचली असेल, तर मग देशातल्या सर्वसामान्य युवतींची सुरक्षा कुठं आहे? कोणत्याही पुरुषाला महिलांच्या वैयक्तिक सीमांचं उल्लंघन करण्याचा अधिकार नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशाची आणखी बदनामी नको म्हणून अनेक खात्यांवरून तो आता हटवण्यात आला आहे. मेक्सिकोमध्ये लैंगिक हिंसा आणि ‘माचो’ संस्कृती खोलवर रूजलेली आहे. महिलांवर अन्याय, अत्याचार होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. त्याला चाप बसवण्याच्या दृष्टीने आता गुंडापुंडांना जरब बसविण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर जोरात हालचाली सुरू झाल्या आहेत.
क्लॉडिया या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत, भर रस्त्यात त्यांच्यासोबत छेडछाडीची घटना घडल्यानंतरही त्या विचलित झालेल्या नाहीत. त्यांचं म्हणणं आहे, मी लोकांमध्ये राहणारी सर्वसामान्य महिला आहे. मी लोकांमध्येच राहू इच्छिते. त्यामुळे माझ्या सुरक्षा व्यवस्थेत काहीही बदल केला जाणार नाही. ही घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्षांचं सुरक्षा पथक त्यांच्या जवळ नव्हतं. छेड काढणारी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांनीच त्याला अडवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानिमित्तानं राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया यांनी ‘री-व्हिक्टिमायझेशन’चा मुद्दा उपस्थित करत मेक्सिकन वृत्तपत्र रिफॉर्मावर तीव्र टीका केली. त्यांचं म्हणणं आहे, या घटनेचा फोटो प्रकाशित करणं माध्यमांच्या नैतिक मर्यादांचं उल्लंघन आहे. मी त्या वृत्तपत्राकडून माफीची अपेक्षा करते.
या घटनेनंतर महिला मंत्रालयानं निवेदन जारी करत महिलांना लैंगिक हिंसेच्या प्रकरणांची तक्रार करण्याचं आणि माध्यमांनीही महिलांच्या सन्मानाला ठेच न पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे. शासकीय आकडेवारीनुसार, मेक्सिकोत २०२४मध्ये ८२१, तर यावर्षी सप्टेंबरपर्यंत ५०१ महिलांची हत्या करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते मात्र प्रत्यक्ष संख्या यापेक्षा खूप जास्त आहे.