आयटी क्षेत्रात क्रांती घडविणारा ‘पाटील इफेक्ट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:02 IST2026-02-15T07:02:27+5:302026-02-15T07:02:54+5:30
मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवल्याचा इतिहास वाचून आपली छाती अभिमानाने फुलते. विविध क्षेत्रात जगभरात कर्तृत्ववान मराठी माणसांनी आपली छाप उमटवली आहे.

आयटी क्षेत्रात क्रांती घडविणारा ‘पाटील इफेक्ट’!
नंदकिशोर पाटील
संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर
मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवल्याचा इतिहास वाचून आपली छाती अभिमानाने फुलते. विविध क्षेत्रात जगभरात कर्तृत्ववान मराठी माणसांनी आपली छाप उमटवली आहे. उच्च शिक्षण, संशोधन आणि तांत्रिक कौशल्यांच्या जोरावर अनेक मराठी तरुण जगातील आघाडीच्या क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे - राहुल पाटील! कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन करणाऱ्या ‘अँथ्रोपिक’ या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून त्यांनी घेतलेली झेप सध्या जागतिक आयटी क्षेत्राच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
‘अँथ्रोपिक’ने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत रचनेत, क्लाऊड संगणक क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवला आणि आयटी क्षेत्रात अक्षरश: भूकंप यावा, अशी स्थिती निर्माण झाली. गुगल, मेटा, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ऑरेकलपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो पर्यंत; नामांकित आयटी कंपन्यांचे शेअर्स एका रात्रीतून गडगडले. या सर्व क्रांतीकारी बदलामागे राहुल पाटील नावाचा बुद्धिमान मराठी तरुण असल्याचे समोर आले. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याचे असलेले राहुल पाटील हे मराठी भाषक. शालेय शिक्षण बागलकोट येथे झाले. बंगळुरूमधील अभियांत्रिकी शिक्षणानंतर ते ‘एमएस’ करण्यासाठी अमेरिकेत गेले. दोन दशकांहून अधिक काळ जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव संपादन केला. ‘स्ट्राइप’मध्ये तंत्रज्ञान प्रमुख म्हणून अब्जावधी डॉलर व्यवहारांची सुरक्षित प्रक्रिया सुनिश्चित करणारी प्रणाली विकसित करण्यात त्यांचे योगदान आहे.
राहुल पाटील
कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन करणाऱ्या ‘अँथ्रोपिक’ या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून त्यांनी घेतलेली झेप सध्या जागतिक आयटी क्षेत्राच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
सॉफ्टवेअर कंपन्यांचे बाजारमूल्य का गडगडले?
ऑक्टोबर २०२५ मध्ये राहुल पाटील हे ‘अँथ्रोपिक’ या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास करणाऱ्या कंपनीत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून रुजू झाले. ही कंपनी संवेदनशील व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करण्यासाठी ओळखली जाते. आयटी क्षेत्रात उडालेली खळबळ केवळ भीतीमुळे नव्हे, तर ‘अँथ्रोपिक’ने विकसित केलेल्या ‘क्लॉड’ या प्रगत भाषा मॉडेलमुळे आहे.
‘क्लॉड’ केवळ मजकूर निर्मितीपुरते मर्यादित नसून कायदेशीर कागदपत्रांचे विश्लेषण, कोड लेखन, करार तपासणी अशा गुंतागुंतीच्या कामांचे स्वयंचलितपणे व्यवस्थापन करू शकते. त्यामुळे अनेक पारंपरिक आयटी सेवा कंपन्यांसाठी हे आव्हानात्मक ठरले आहे. या तांत्रिक प्रगतीचा आर्थिक परिणामही लक्षणीय ठरला आहे. या कंपनीने केलेल्या प्रगत एआय क्षमतांच्या अधिकृत घोषणेनंतर पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घसरण झाली.
आयटी क्षेत्रात खळबळ?
आयटी कंपन्या प्रामुख्याने मनुष्यबळावर आधारित सेवा मॉडेल वापरतात. कोडिंग, टेस्टिंग, सपोर्ट, डॉक्युमेंटेशन इत्यादी. मात्र ‘अँथ्रोपिक’चे ‘क्लॉड’ सारखे प्रगत एआय मॉडेल हीच कामे काही मिनिटांत, कमी खर्चात करू शकतात. यामुळे सॉफ्टवेअर कन्सल्टिंग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
संभाव्य व्यापक परिणाम
रोजगार संरचनेत बदल : कमी कौशल्याच्या आयटी नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
उच्च कौशल्यांची मागणी वाढ : एआय प्रशिक्षण, मॉडेल मॉनिटरिंग, डेटा सायन्स
शिक्षण क्षेत्रावर प्रभाव : एआय-आधारित संशोधन व शिक्षण साधने
व्यवसाय मॉडेलमध्ये परिवर्तन : “मानव+एआय” सहकार्याची नवी पद्धत
यात नवीन काय आहे?
‘अँथ्रोपिक’ने चॅटबॉट विकसित केला नाही; तर स्वयंचलित निर्णय घेणारी व कामे पूर्ण करणारी प्रणाली विकसित केली. उदा. संपूर्ण कोड प्रोजेक्टचे पुनरावलोकन करणे, कायदेशीर दस्तऐवजांचे विश्लेषण, आर्थिक अहवालांचे अंकेक्षण हे सर्व मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य होत आहे.
‘अँथ्रोपिक’ कंपनी नेमके काय करते?
अमेरिकेतील एआय स्टार्टअप ‘अँथ्रोपिक’ने आणलेल्या क्लाऊड कोवर्क या नव्या चॅटबॉट व्हर्जनमुळे नामांकित आयटी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. या व्हर्जनचे जनक अनिवासी भारतीय राहुल पाटील आहेत. म्हणूनच, जागतिक शेअरबाजारातील पडझडीला ‘पाटील इफेक्ट’ म्हटले गेले. ‘ओपन-एआय’ मधून बाहेर पडलेल्या संशोधकांनी ही कंपनी स्थापन केली.
उद्दिष्ट स्पष्ट होते. एआय केवळ शक्तिशाली नको, तर सुरक्षितही असावा. ‘क्लॉड’ हे त्यांचे प्रमुख मॉडेल केवळ मजकूर तयार करत नाही; तर ते विश्लेषण, तर्क, दस्तऐवज वाचन, कोड लेखन, करार तपासणी, संशोधन संक्षेप, ग्राहक सेवा ऑटोमेशन अशा अनेक गुंतागुंतीच्या कामांसाठी वापरले जाते.
‘अँथ्रोपिक’ला अब्जावध डॉलरची गुंतवणूक मिळाली
आहे या कंपनीने विकसित केलेल्याएआय तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती पाहून गुंतवणूकदारांनी पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हउपस्थित केले.