शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 07:58 IST2025-10-02T07:57:49+5:302025-10-02T07:58:37+5:30
समाजाच्या समर्थनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अहर्निश वृद्धिंगत होत राहिले. समाजात संघकार्याची स्वीकृती हळूहळू वाढत गेली.

शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
दत्तात्रेय होसबाळे
सरकार्यवाह,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरंभलेल्या कार्याला आता १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास निश्चितच कठीण, आव्हानांनी व्यापलेला होता. या खडतर प्रवासातल्या अनेक घटना, प्रसंग, तसेच या प्रवासाच्या यशासाठी स्वतःला समर्पित करणारे कार्यकर्ते या सर्वांचे स्मरण आज आवश्यक आहे. देशभक्तीने ओतप्रोत असलेले सुरुवातीचे तरुण कार्यकर्ते शूरवीर योद्ध्यांप्रमाणे संघाच्या कार्यासाठी संबंध देशभरात गेले. अप्पाजी जोशी, दादाराव परमार्थ, बाळासाहेब आणि भाऊराव देवरस, यादवराव जोशी, एकनाथ रानडे... किती नावे आठवावीत! डॉ. हेडगेवार यांच्या सान्निध्यात येऊन, त्यांनी संघाच्या कार्याला आपले जीवनव्रत मानले.
स्वामी विवेकानंदांना एकदा त्यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान विचारण्यात आले होते की, भारतातील बहुतेक लोक निरक्षर आहेत. त्यांना इंग्रजीही येत नाही, मग तुमचे विचार भारतातील लोकांपर्यंत कसे पोहोचतील? त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले की, ज्याप्रमाणे मुंग्यांना साखर शोधण्यासाठी इंग्रजी शिकण्याची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे माझ्या भारतातील लोक त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे कोणत्याही कोपऱ्यात सुरू असलेले पुण्यकार्य लगेच ओळखतात. ते शांतपणे तिथे पोहोचतात. म्हणून, मी काय म्हणतोय ते त्यांना नक्की समजेल.
स्वामीजींचे हे विधान तंतोतंत खरे ठरले. समाजाच्या समर्थनाने संघाचे कार्य अहर्निश वृद्धिंगत होत राहिले. समाजात संघकार्याची स्वीकृती हळूहळू वाढत गेली. संघ कार्याच्या सुरुवातीपासूनच संघ कार्यकर्त्यांना सामान्य कुटुंबांकडून सहकार्य,पाठिंबा मिळाला. स्वयंसेवकांचे कुटुंबच संघ कार्याचे केंद्र राहिले आहे. सर्व माता आणि भगिनींच्या सहकार्यानेच संघकार्य परिपूर्ण झाले आहे.
दत्तोपंत ठेंगडी, यशवंतराव केळकर, बाळासाहेब देशपांडे, एकनाथ रानडे, दीनदयाळ उपाध्याय आणि दादासाहेब आपटे यांसारख्या लोकांनी संघ प्रेरणेने सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात संघटना स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व संघटना आजमितीला लक्षणीयरीत्या विस्तारत असून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात आपली सक्रिय भूमिका बजावत आहेत. या प्रवासात राष्ट्रीय सेविका समितीच्या माध्यमातून मावशी केळकर यांच्यापासून ते प्रमिलाताई मेढे यांसारख्या मातृत्ववान व्यक्तींची भूमिका कालातीत राहिली आहे.
१९८१ मध्ये, तामिळनाडूतील मीनाक्षीपूरम येथे काही गरीब हिंदूंची दिशाभूल करून त्यांना धर्मांतरित करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. कर्णसिंह यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यावर हिंदू जागृती मोहिमेचा भाग म्हणून सुमारे पाच लाख लोक उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत प्रसिद्ध स्वामी चिन्मयानंद, मास्टर तारा सिंह, जैन मुनी सुशील कुमार जी, बौद्ध भिक्षू कुशोक बकुला आणि नामधारी शीख सद्गुरू जगजीत सिंह हे प्रमुख सहभागी होते.
‘हिंदू शास्त्र आणि धर्मग्रंथांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नाही’ हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी श्री गुरुजी गोळवलकर यांच्या पुढाकाराने उडुपी येथे आयोजित केलेल्या विश्व हिंदू संमेलनात पूज्य धर्माचार्यांसहीत सर्व संत, महंत, आचार्य यांची उपस्थिती आणि आशीर्वाद लाभले. ज्याप्रमाणे प्रयाग परिषदेने ‘न हिंदूः पतितो भवेत्’ (कोणताही हिंदू पतित असू शकत नाही) हा ठराव स्वीकारला होता, त्याचप्रमाणे या परिषदेचा नारा होता ‘हिंदवाहः सोदारः सर्वे’. म्हणजेच सर्व हिंदू भारतमातेचे पुत्र आहेत. गोहत्याबंदी असो वा रामजन्मभूमी आंदोलन असो, संघाच्या स्वयंसेवकांना नेहमीच साधू-संतांचे आशीर्वाद लाभले आहेत.
स्वातंत्र्यानंतर लगेचच, जेव्हा तत्कालीन सरकारने राजकीय कारणांसाठी संघकार्यावर बंदी घातली, तेव्हा संपूर्ण समाज संघाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आणीबाणीसारख्या भीषण संकटाच्या वेळीही असाच अनुभव आला. म्हणूनच, अनेक अडथळ्यांवर मात करून संघाचे कार्य अविरत आणि अक्ष्क्षुणपणे पुढे जात आहे. या सर्व गोष्टी संघाच्या कार्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरल्या आहेत.
शताब्दी वर्षात, संघाचे स्वयंसेवक शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी, राष्ट्रसेवेत समाजाच्या सर्व घटकांचा सहकार्य,सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. आगामी वर्षभरात देशभरातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे हे प्राथमिक ध्येय असेल. सज्जन शक्तीचे एकत्रित प्रयत्न देशाच्या सर्वांगीण विकासाचा यशस्वी प्रवास सुनिश्चित करतील.