गाव तिथे ग्रंथालय पोहोचवणारा लोकनेता हरपला; गंगाधर पटणे यांच्या कार्याला मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:53 IST2026-01-27T13:51:49+5:302026-01-27T13:53:00+5:30

माजी आमदार गंगाधर पटणे यांचे दि. ११ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश

The foundation of the library movement: Former MLA Gangadhar Patne | गाव तिथे ग्रंथालय पोहोचवणारा लोकनेता हरपला; गंगाधर पटणे यांच्या कार्याला मानाचा मुजरा

गाव तिथे ग्रंथालय पोहोचवणारा लोकनेता हरपला; गंगाधर पटणे यांच्या कार्याला मानाचा मुजरा

- विलास वैद्य, नांदेड
साठोत्तरी कालखंडात राजकारण, समाजकारण, शिक्षण व ग्रंथालयविषयक क्षेत्रांत निष्ठेने कार्य करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांत गंगाधर पटणे यांच्या नावाचा आदराने उल्लेख केला जातो. ग्रंथालय क्षेत्र म्हटले की, गंगाधर पटणे यांचे कृतिशील व्यक्तिमत्त्व सर्वांच्या डोळ्यांसमोर साक्षात उभे राहते.

स्वर्गीय गंगाधर पटणे यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता व ग्रंथालय क्षेत्रांतील कार्याचा मोठा व दीर्घ असा वेधक पट आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात राष्ट्रसेवा दलातून झाली. पुढे जनता दल व जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना सबंध महाराष्ट्र ओळखू लागला. ‘जनक्रांती’ या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी १० वर्षे कार्य केले. या काळात बिलोली शहराचा त्यांनी चेहरा-मोहरा बदलून टाकला. १९७८ साली ते विधान परिषदेवर निवडून गेले; नंतर १९८८ ते २००४ या कालावधीत त्यांनी विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळावर ते सलग ४ वेळेस निवडून आले व १ वर्ष गृहनिर्माण मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर त्यांनी आजवर दिलेले हे योगदान निश्चितच संस्मरणीय आहे.

प्रामुख्याने लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघापुरतेच कार्यमग्न असतात. पटणे साहेब यास अपवाद होते. राजकीय क्षेत्रासोबतच समाजकारण, ग्रंथालय व शैक्षणिक चळवळीशी त्यांचे अतूट नाते राहिले आहे. आपण नेहमी पाहतो की, शिक्षक आमदार प्रामुख्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवतात, पदवीधर आमदार पदवीधरांचे प्रश्न सोडवतात, गंगाधर पटणे साहेबांनी मात्र लोकांच्या सार्वजनिक प्रश्नांसोबतच महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक व ग्रंथालयविषयक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. ग्रंथालय चळवळ त्यांचा अखेरपर्यंत श्वास व ध्यास होता. त्यांचा ग्रंथालय चळवळीबद्दलचा समर्पण भाव पाहून राजकीय व ग्रंथालय क्षेत्रातील लोक त्यांना ‘ग्रंथालयाचे आमदार’ म्हणून ओळखू लागले; हे विशेष होय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय’ या योजनेला साकार रूप प्राप्त करून देण्यासाठी मनस्वी प्रयत्न केले. या योजनेला आणखी मोठा वेग देण्यात आणि साक्षात रूप प्राप्त करून देण्यात गंगाधर पटणे यांचा सिंहाचा वाटा आहे.

मराठवाडा ग्रंथालय संघाच्या उभारणीत अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींची त्याग व बलिदानाची मोठी परंपरा आहे. या परंपरेला तेवढ्याच निष्ठेने व जिद्दीने टिकवण्याचे व पुढे नेण्याचे कार्य पटणे साहेबांनी आयुष्यभर केले. ते महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. मराठवाडा ग्रंथालय संघ व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाला सक्षम रूप प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ग्रंथालयविषयक विविध उपक्रमांत ते जातीने उपस्थित राहत असत. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात अनेक संकटे आली; तरीपण काळजावर दगड ठेवून ते घर, दार, प्रपंच सोडून चळवळीच्या उत्थानासाठी ते हसतमुखाने महाराष्ट्रभर सतत भ्रमंती करत राहिले. हे त्यांनी ग्रंथालय क्षेत्रासाठी दिलेले योगदान निश्चितच स्पृहणीय आहे.

महाराष्ट्र शासन व शासनाचे ग्रंथालय संचालनालय यांच्यामध्ये प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पटणे साहेबांनी बजावलेली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. राजा राममोहन रॉय योजना, ग्रंथालय परिषद, ग्रंथनिवड समिती, ग्रंथमित्र पुरस्कार योजना आदी शासकीय समित्यांना अधिक सुसंगत रूप प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रामुख्याने १९७० पासून आजपर्यंत ग्रंथालयाचे अनुदान वाढवून घेण्यासाठी त्यांनी अविश्रांत प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर ग्रंथालय चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठीसुद्धा शासन दरबारात पोहोचण्यासाठी आमदार पटणे साहेब हे नेहमी खुले ‘महाद्वार’ बनले; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज महाराष्ट्रातील नगर-महानगर, गाव, तांड्यावस्तीतील ग्रंथालये जी काही डौलात आणि सुस्थितीत अवस्थेत पाहायला मिळतात. त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष श्रेय पटणे साहेबांच्या प्रांजळ नेतृत्वास जाते, ही सर्वमान्य बाब होय. पटणे साहेबांचे वाचन प्रचंड होते. माझ्या सामाजिक व राजकीय कवितांवर ते प्रवासात किंवा प्रत्यक्ष भेटीत नेमक्या प्रतिक्रिया व्यक्त करत असत. एका बाजूला कलंडणाऱ्या वृत्तपत्रातील अग्रलेखावर खासगी बैठकीत ते मोठ्या मिश्कील कोट्या करत असत. वैचारिक वाचनावर त्यांचा विशेष भर होता. त्यांच्याकडे स्वतःची व्यक्तिगत विपुल अशी ग्रंथसंपदा आहे.

गंगाधर पटणे हे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक गुणी ग्रंथालय कार्यकर्त्यांची ‘ग्रंथमित्र’ या पुरस्कारासाठी शासन दरबारी शिफारस केली व त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान प्राप्त करून दिला; परंतु ते स्वतः या सन्मानापासून कोसोमैल दूर राहिले. मात्र कुठलीही फाईल सादर न करता महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये राज्य पातळीवरील ‘विशेष ग्रंथमित्र’ पुरस्काराने त्यांचा आदरपूर्वक गौरव केला, ही आनंदाची व अभिमानाची बाब होय. अशा या उत्तम संपादक, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचे सच्चे पाईक असणाऱ्या, नि:स्वार्थी, निर्मळ दूरदृष्टी असलेल्या थोर ग्रंथालय कार्यकर्त्यास व नेत्यास माझी भावपूर्ण आदरांजली...

Web Title : गाँव-गाँव पुस्तकालय पहुँचाने वाले लोकनेता गंगाधर पटणे का निधन

Web Summary : राजनीति, समाज, शिक्षा और पुस्तकालयों के समर्पित नेता गंगाधर पटणे नहीं रहे। उन्होंने पुस्तकालयों को बढ़ावा दिया, जिससे वे 'पुस्तकालयों के विधायक' कहलाए। महाराष्ट्र में पुस्तकालय आंदोलन और सामाजिक उत्थान में उनका योगदान अमूल्य है। वे कई लोगों के लिए प्रेरणा थे।

Web Title : People's leader who brought libraries to villages, Gangadhar Patne, is lost.

Web Summary : Gangadhar Patne, a dedicated leader in politics, society, education, and libraries, has passed away. He tirelessly promoted libraries, earning the title 'MLA of Libraries.' His contributions to Maharashtra's library movement and social upliftment are deeply valued. He served as an inspiration for many.