चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
By रवी टाले | Updated: December 4, 2025 08:55 IST2025-12-04T08:55:11+5:302025-12-04T08:55:53+5:30
वापरकर्त्याचा अहंगंड गोंजारण्यासाठी एआय चॅटबॉट त्यांना आवडतील, अशीच उत्तरे देऊ लागले आहेत! एआयवर विसंबून घेतलेला ‘निर्णय’ घातक ठरू शकतो.

चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
-रवी टाले (कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला)
‘ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’ ही म्हण माहीत नसलेला मराठी माणूस विरळाच! संगतीमुळे मनुष्यावर चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो, हा त्या म्हणीचा मथितार्थ; परंतु माणसाच्या संगतीत चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा पवळ्या झाल्याचा निष्कर्ष ताज्या संशोधनांतून निघाला आहे. अनेक लोकप्रिय एआय चॅटबॉट वापरकर्त्याला आवडणारी, त्याला हवी तशीच उत्तरे देऊ लागले आहेत. हुजरेगिरी किंवा चापलुसीत एआयने मानवालाही मागे सोडले आहे, असे नव्या अभ्यासांतून समोर आले आहे. संशोधकांच्या वेगवेगळ्या गटांनी या विषयावर प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधांचे निष्कर्ष कमीअधिक फरकाने सारखेच आहेत. एआय चॅटबॉट वापरकर्त्याला खूश करण्यासाठी, त्याचा अहंगंड गोंजारण्यासाठी त्याला आवडतील, अशीच उत्तरे देऊ लागले आहेत, हे या संशोधनांचे सार!
एखादा वापरकर्ता जेव्हा एआय चॅटबॉटला प्रश्न, माहिती विचारतो किंवा सल्ला मागतो, तेव्हा चॅटबॉट खूप सहजतेने वापरकर्त्याच्या भूमिकेशी सहमत होतात किंवा वापरकर्त्याला जे ऐकायचे आहे, तेच सांगतात, मग ते चुकीचे असो, अनैतिक असो किंवा त्या माहितीवर आधारित निर्णय घेण्यात धोका असो! एआयच्या या प्रवृत्तीकडे संकट म्हणून बघायला हवे; कारण मनुष्य हळूहळू एआयवर विसंबून राहू लागला आहे आणि त्याचे प्रमाण भविष्यात वाढतच जाणार आहे. संशोधनांतून असे समोर आले आहे की, वापरकर्ता जेव्हा एखादे चुकीचे किंवा तर्कविहीन विधान करतो, तेव्हा चॅटबॉट तसे निदर्शनास आणून देण्याऐवजी वापरकर्त्याशी सहमती दर्शवतात.
आतापर्यंत एखाद्या गोष्टीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ‘सर्च इंजिन’चा वापर व्हायचा. त्या माध्यमातून विविध पर्याय मिळत आणि त्यापैकी योग्य कोणता, हे वापरकर्ता सारासारबुद्धीचा वापर करून ठरवू शकत असे. एआय चॅटबॉट हाताशी आल्यापासून बहुतांश लोकांनी ‘सर्च इंजिन’चा वापर जवळपास बंदच केला आहे. चॅटबॉटने दिलेली उत्तरे किंवा माहिती ते ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ म्हणून स्वीकारतात. अशात चॅटबॉटने वापरकर्त्यास खूश करण्यासाठी त्याला हवे असलेलेच उत्तर अथवा सल्ला दिला, तर अनर्थ होऊ शकतो.
मानसिक तणाव, एकाकीपणाला तोंड देत असलेले लोक एआयकडे मित्र, सखा म्हणून बघायला लागतात. कोवळ्या वयातील मुले बोलायला कोणी नाही म्हणून एआयशीच बोलत सुटली आहेत. जपानमधील एका युवतीने तर चक्क एआयचा वापर करून तयार केलेल्या ‘क्लाउस’ नामक ‘बॉयफ्रेंड’सोबत लग्नच केले! अशा निरर्थक नात्यांमुळे वास्तव मानवी नातेसंबंधांचा प्रभाव कमी होतो. शिवाय चिकित्सकीय किंवा मनोवैज्ञानिक मदतीऐवजी एआयकडून अवास्तव आश्वासने मिळाल्यामुळे स्थिती अधिकच बिकट बनू शकते.
संशोधनांतून असेही समोर आले आहे की, एखादा वापरकर्ता जेव्हा एआयकडून अभ्यास, आर्थिक, वैवाहिक, वैयक्तिक विकास, आरोग्य इत्यादी बाबींमध्ये सल्ला घेतो, तेव्हा एआयने त्याच्या विचारांना पुष्टी दिल्यास वापरकर्ता तो सल्ला अधिक आत्मविश्वासाने स्वीकारतो; पण जर एआयने चापलुसी करत वापरकर्त्याला आवडेल असा सल्ला दिला असेल आणि तो चूक असेल, तर त्यावर आधारित निर्णय चुकीचे ठरतात. अशा चुकीच्या पुष्टीमुळे वैयक्तिक निर्णयप्रक्रियेत भ्रामक आत्मविश्वास निर्माण होण्याचा धोका असतो. चापलुसी करणारे बॉट वापरणारे नवशिके स्वत:चे चुकीचे दृष्टिकोन टिकवून ठेवतात; कारण बॉटने त्यांना पुष्टी दिलेली असते.
एआय-आधारित माहितीवर अवलंबून राहिल्याने, वैयक्तिक क्षमता, विश्लेषणशक्ती, स्वतंत्ररीत्या विचार करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. जेव्हा अनेक लोक एआयवरून त्यांचे विश्वास किंवा पूर्वग्रहांची पुष्टी करून घेतात, तेव्हा समाजात त्या विश्वासांचा पक्का आधार निर्माण होतो. तो चुकीचा किंवा पूर्वग्रहाधारित असेल, तर तो सामाजिक समज, नैतिकता, वर्तनशैली यांना चुकीच्या दिशेने वळवू शकतो. विशेषतः धर्म, जाती, राजकारण, सामाजिक संघर्ष अशा संवेदनशील बाबींमध्ये हा धोका अधिक संभवतो.
एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण प्रामुख्याने इंटरनेटवरील विदावर आधारित असते; पण विदा शुद्ध, संतुलित किंवा सत्य नसल्यास, त्यावर आधारित एआयचे सल्ले चुकीचे, पूर्वग्रहित किंवा भ्रामक असू शकतात. परिणामी त्यावर अवलंबून असलेली प्रणालीच अंततः अविश्वासार्ह बनू शकते. हे धोके टाळण्यासाठी एआय वापरताना जागरूकता, डिजिटल साक्षरता व विचारक्षमता वाढवणे, एआय विकासक कंपन्यांचे उत्तरदायित्व - नियमन वाढवणे, सामाजिक संवाद आणि मानवी संबंधांचे वर्चस्व टिकवणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे. एआय ही मानवतेसाठी प्रचंड ताकद आहे; पण प्रत्येक शक्तीसोबत जबाबदारीही येत असते. इतिहासात हुजरे आणि चापलूस अनेक प्रबळ साम्राज्यांच्या पतनास कारणीभूत ठरले होते. एआयचा वापर करताना ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे गरजेचे आहे!
ravi.tale@lokmat.com