तुमचा पिझ्झा घरपोहोच करणाऱ्या अदृश्य ‘जेन-झी’चा चेहरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 04:56 IST2026-03-23T04:56:27+5:302026-03-23T04:56:53+5:30
त्यांच्या हातातल्या पार्सलला त्यांच्यापेक्षा अधिक किंमत असते. त्यांनी स्वतःला अदृश्य करून वस्तू किंवा सेवा पुरवणं अपेक्षित असतं.

तुमचा पिझ्झा घरपोहोच करणाऱ्या अदृश्य ‘जेन-झी’चा चेहरा!
राही श्रु. ग., सीनिअर रिसर्च फेलो जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
यावर्षी जानेवारीमध्ये आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर रेल्वे स्टेशनवरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रेल्वेमध्ये खाण्याचं पार्सल पोहोचवून स्विगीचा डिलिव्हरी कामगार उतरत असताना, ट्रेन वेगाने निघाली आणि काही कळायच्या आत हा कामगार फलाटावर वेडावाकडा पडला. काही सेकंदांच्या अंतराने त्याचा जीव कसाबसा वाचला, मात्र त्यानिमित्ताने सर्वत्र वेगात डिलिव्हरी करणाऱ्या या कामगारांविषयी चर्चा सुरू झाली.
दोन वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये लखनऊमध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी कामगार रात्री खाणं पोहोचवायला गेला असताना, दारू पिणाऱ्या चार माणसांनी त्यांच्या घरी त्याच्याशी भांडण सुरू केलं. त्याचं नाव ‘असलम’ आहे, हे कळल्यावर त्याच्या हातातल्या हेल्मेटने त्याच्या डोक्यावर घाव घातले आणि शिव्या देत त्याच्यावर बंदूक चालवण्याची धमकी दिली. जवळपास दीड तास हे भयंकर नाट्य सुरू होतं. शेवटी असलमनेच खाण्याचे जास्त पैसे लावून ग्राहकांना त्रास दिल्याचा आणि झाला प्रकार तो कुठेही सांगणार नाही, अशा कबुलीचा उल्लेख असलेल्या एका कागदावर त्याची सही घेऊन त्याला सोडून दिलं.
सेवा पुरवणाऱ्या विविध ॲप्लिकेशन्सवरून ‘गिग’ काम करणाऱ्या कामगारांच्या या बातम्या अधूनमधून डोकं वर काढत असतात. आपल्या शहरांमध्ये सगळीकडे दिसणारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गणवेशातले गिग कामगार हे शहरातल्या इमारतींइतकेच इथल्या पर्यावरणाचा अविभाज्य घटक झाले आहेत आणि तरीही ते जणू अदृश्यच असतात. त्यांच्या हातातल्या पार्सलला त्यांच्यापेक्षा अधिक किंमत असते आणि जणू शहरातल्या सुंदर चकचकीतपणाला खराब न करता अलगद उचलून वेगळे करता यावेत, म्हणून त्यांना गणवेशांची सक्ती केली जाते. उच्चभ्रू सोसायट्यांमधल्या रहिवाशांच्या लिफ्टमध्ये आणि मॉलमध्ये त्यांना प्रवेश नसतो. त्यांनी स्वतःला अदृश्य करून वस्तू किंवा सेवा पुरवणं अपेक्षित असतं.
अमेरिकेत ४६% जेन झी ही गिग कामं करते, तर भारतात देशभरातील एकूण गिग कामगारांपैकी तब्बल ४८% कामगार १९ ते २५ या वयोगटातले आहेत. वास्तवाकडे पाठ करून बसलेले उच्चभ्रू लोक म्हणतात, जेन झीना कमिटमेंट नको आहे, वेळांबाबत, कामाबाबत लवचिकता हवी आहे, त्यामुळे ते ही गिग कामं निवडतात. मात्र, या कामगारांच्या डोळ्यात पाहिलं, तर तीव्र अस्थिरता आणि अगतिकता दिसते.
या नव्या ‘प्लॅटफॉर्म भांडवलशाही’मध्ये सोशल मीडिया व इतर व्यवसायांसाठी लिखाण करणं, इंटरनेटच्या माध्यमातून मदत पुरवणं (व्हर्चुअल असिस्टन्स), ॲपवर करण्याच्या तांत्रिक कामांपासून मोटारसायकलवर ग्राहकांना इकडून तिकडे पोहचवण्यापर्यंत विविध कामांचा समावेश होतो. मात्र, यातले सर्वाधिक कामगार विविध सेवा पुरवण्यासाठी शारीरिक श्रम करणारे आहेत.
या कामांमधल्या अदृश्य मुकादमाचं नाव ‘अल्गोरिदम’. फीडबॅक, रेटिंग आणि स्टार्सचा खुराक देऊन त्याला सतत खूश करत राहावं लागतं, नाहीतर तो त्याच्या हातातला आसूड बेदम चालवतो. दलित आणि मुस्लीम कामगारांवर तर तो जीव खाऊन बरसतो. बरं इथे कामगारांना ‘डिलिव्हरी पार्टनर’सारखी गोडगुलाबी नावं देऊन कंपन्या कामगार कायद्यांतून सुखरूप निसटतात. नव्या मंचावर उभ्या या प्लॅटफॉर्म भांडवलशाहीतल्या अदृश्य अल्गोरिदमी मालकांना आपल्यावरचा अन्याय दिसेल का, या प्रश्नासह जेन झी गिग कामगार पुढच्या ऑर्डरच्या दिशेने भरधाव निघाले आहेत.
raheeshrutiganesh@gmail.com