न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 07:16 IST2025-10-09T07:15:31+5:302025-10-09T07:16:03+5:30
लोकशाही, राज्यघटना आणि राष्ट्रीयत्वावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात ‘जीजी’ आत्मविश्वासाने आणि खमकेपणाने उभे राहिले... तीच त्यांची शिकवण होती!

न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
- योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया
आमच्याकडे थोरल्या बहिणीला ‘जीजी’ म्हणतात. आई गेल्यावर ‘जीजी’ दुसरी आईच बनते आपली. खरे तर तिच्याहून जवळची. कारण आईची सगळी ममता तर ती देतेच; पण आईसारखी फटकारत मात्र नाही. महाराष्ट्रात जायचं म्हटलं की, ख्यातनाम गांधीवादी जी. जी. पारीख यांना- जीजींना भेटावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, असं मला नेहमी वाटे. वयाच्या हिशेबाने खरे तर ते माझ्या आई-वडिलांपेक्षा मोठे; पण त्यांचं वागणं आशीर्वाद देणाऱ्या, प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आणि न बोलता शिकवणाऱ्या थोरल्या बहिणीसारखं.
‘जीजीं’शी माझा प्रत्यक्ष परिचय बऱ्याच उशिरा झाला. ९० च्या दशकात, प्रथम जनआंदोलन समन्वय समिती आणि नंतर समाजवादी जनपरिषदेची स्थापना झाली. त्याच वेळी महाराष्ट्रातील समाजवादी आंदोलनाशी मी प्रथम जोडला गेलो. माझ्या पिढीच्या कार्यकर्त्यांना भाई वैद्य आणि प्रा. विलास वाघ यांच्यासारख्या नेत्यांमुळे अगोदरच्या पिढीचे साहचर्य लाभले. भाई वैद्य यांना माझ्याबद्दल खास जिव्हाळा वाटे. संघटनेला वाहून घेण्याची वृत्ती आणि संघटन कौशल्य शिकावे तर त्यांच्याकडून. प्रत्येक लहानथोर सहकाऱ्याच्या सुख-दुःखात मनापासून साथ देणे, प्रत्येक व्यक्तीत कोणता न कोणता खास गुण शोधणे आणि उत्साहाचा झरा आटू न देणे यांचा वस्तुपाठ होते त्यांचे जीवन. नंतर पन्नालाल सुराणांकडूनही खूप शिकायला मिळाले. देशातील सर्वच समाजवाद्यांनी धडे घ्यावेत, असे बरेच काही महाराष्ट्राच्या समाजवादी परंपरेत आहे. त्या काळात ‘जीजीं’चे दर्शन मला झाले; पण ओळख मात्र होऊ शकली नाही.
‘जीजीं’शी माझी जवळीक गेल्या काही वर्षांत वाढली. समाजवादी जनपरिषद आणि आम आदमी पक्षाचे पर्व संपल्यानंतर. ‘जीजीं’ना भेटलो तेव्हा काँग्रेस समाजवादी पक्षाच्या काळातील समाजवादी आंदोलनाशी आपली नाळ जुळल्यासारखे वाटले. युसूफ मेहेर अली, नानासाहेब गोरे ही नावे मला माहीत होती. ‘जीजीं’च्या रूपाने समाजवादी आंदोलनातील विधायक कार्याच्या प्रवाहाचे प्रत्यक्ष दर्शन मला झाले. राजकारणात राहूनही निवडणुकीच्या राजकारणात मात्र मुळीच पडायचे नाही, हा ‘जीजीं’च्या जीवनाचा अपूर्व पैलू. तो उजेडात आणण्याची नितांत आवश्यकता आहे. ही मर्यादा पाळल्यामुळेच आपली बहुतांश ऊर्जा, जीजी विधायक कार्यात खर्च करू शकले. सर्वसाधारणपणे विधायक कार्य म्हटले की, गांधीवाद्यांचीच नावे घेतली जातात. राजकारणापासून अलिप्त म्हणत म्हणत, असली कामे अखेरीस विद्यमान सत्तेच्या आश्रयाला जातात असा ठपकाही त्यांच्यावर ठेवला जातो. युसूफ मेहेरअली केंद्राच्या माध्यमातून, आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रांसह आदिवासी समाजात ‘जीजीं’नी केलेले काम हे विधायक कार्य आणि राजकारण यांच्या संगमाचे एक अप्रतिम उदाहरण आहे. पर्यावरणाचा प्रश्न त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐरणीवर आणला. सर्व समाजवाद्यांसाठी एक नवा मार्गच त्यातून खुला झाला.
समाजवादी आंदोलनातून पुढे आलेले अनेक नेते आणि संघटना गेल्या तीस वर्षांत भाजपच्या आश्रयाला गेलेल्या आहेत. थेट सामील न झालेल्या काहींनी या ना त्या बहाण्याने संघपरिवाराशी अप्रत्यक्ष संबंध जुळवले आहेत. समाजवादी आंदोलनाला बदनाम करू पाहणाऱ्यांच्या हाती हे एक कोलितच मिळाले आहे. अशा वातावरणात ‘जीजीं’सारखा समाजवादी, द्वेष आणि खोटेपणाच्या राजकारणाविरुद्ध ठामपणे उभा राहिलेला मी पाहिला. आपल्या काळातील सर्वांत घोर अन्यायाविरुद्ध उभे राहणे हाच आपल्या समाजवादी असण्याचा खरा निकष असल्याचे स्मरण त्यांनी सदैव करून दिले.
इतिहासाच्या एका भयावह वळणावर आज आपण उभे आहोत. आपली लोकशाही, राज्यघटना आणि राष्ट्रीयत्वावर घाला पडत आहे. या हल्ल्याविरोधात आत्मविश्वासाने उभे असलेले ‘जीजी’ हे आम्हा सर्वांचे प्रेरणास्रोत! स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला; पण भाजप आणि आरएसएस यांच्या द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध काँग्रेस उभी राहत असल्याचे दिसून येताच नि:संकोचपणे त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेला पाठिंबा दिला. मुंबईत या यात्रेची सांगता होत असताना, ऑगस्ट क्रांती मैदानाचा रस्ता दाखवत, यात्रेला आशीर्वाद देण्याची हिंमत ‘जीजीं’नी दाखवली. या त्यांच्या कृतीने यात्रेत सहभागी असलेल्या आम्हा सर्वांच्या उत्साहात अधिकच भर पडली. वयाच्या अखेरच्या टप्प्यावर बहुतेकांची उमेद खचलेली असते. माणूस आत्मपूजक बनतो. आता रोजच्या संघर्षापासून बाजूला राहून, केल्या कामांच्या पूर्वपुण्याईवर आयुष्य सुखात घालवावे, अशी इच्छा मनावर स्वार होते. ‘जीजीं’नी हा सोपा मार्ग मुळीच निवडला नाही. आपल्या अवघ्या आयुष्याचे खत-पाणी घालून न्याय आणि समतेच्या फुलाफळांची बाग फुलवणाऱ्या एका गौरवशाली समाजवादी परंपरेचे असे ‘अर्थ’पूर्ण दर्शन प्रत्यक्ष अनुभवता आले, हे मला अहोभाग्यच वाटते! ‘जीजीं’ना कृतज्ञ वंदन!
yyopinion@gmail.com