शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंसाठी तीन प्रश्न; ज्याची उत्तरं ठरवतील मनसेचं भवितव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 11:36 IST

भविष्यात विचारसरणीशी निगडित एखाद्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे फाटल्यास, शिवसेना पातळ केलेले हिंदुत्व पुन्हा एकदा घट्ट करू शकते. त्या वेळी मनसेची भूमिका काय असेल?

 काही वर्षांपूर्वी एका खासगी वाहिनीवर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका प्रसारित झाली होती. एका उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांमधील संघर्ष आणि त्यामधून उद्भवणारे विनोदी प्रसंग, असे त्या मालिकेचे स्वरूप होते. आज अचानक त्या मालिकेची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन राजकीय पक्षांनी गुरुवारी मुंबईत आयोजित केलेले दोन स्वतंत्र कार्यक्रम त्यासाठी निमित्त ठरले. यानिमित्ताने ठाकरे कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला. राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर थेट प्रहार केला नसला तरी, त्या पक्षाच्या मतपेढीवर डल्ला मारण्याचा इरादा नक्कीच उघड केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तर घरातीलच व्यक्तीने विश्वासघात केल्याचे सांगून, थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. ठाकरे कुटुंबातील या संघर्षाची पहिली ठिणगी बाळासाहेबांच्या हयातीतच पडली होती. पुढे त्या संघर्षातूनच राज ठाकरे यांनी मनसेला जन्म दिला. राजकीय पक्ष म्हणून मनसेला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यशही मिळाले होते; मात्र ते वृद्धिंगत करण्यात त्या पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले. ठोस दिशा व धोरणांचा अभाव, धरसोड वृत्ती आणि प्रतिक्रियात्मक राजकारण यामुळे मनसेची घसरण झाली, असा निष्कर्ष काढता येतो. राज ठाकरे यांच्या गुरुवारच्या मुंबईतील भाषणातूनही पुन्हा एकदा धरसोड वृत्तीचाच परिचय घडला. मनसेचा प्रतिस्पर्धी क्रमांक एक शिवसेनाच आहे; पण तरीही मनसेची संपूर्ण वाटचाल शिवसेनेच्याच पावलांवर पाऊल ठेवून होत आहे. सातत्याने प्रतिक्रियात्मक राजकारण केल्याचा परिणाम समोर येऊनही, राज ठाकरे पुन्हा एकदा त्याच मार्गाने निघाले असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.
 

मराठी अस्मितेला हात घालूनच शिवसेनेची सुरुवात झाली होती. त्या मुद्द्यावर बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर १९८४ मध्ये देशातील इतर विरोधी पक्षांप्रमाणेच शिवसेनेचीही वाताहत झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे रामजन्मभूमी वादाच्या निमित्ताने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत, गांधीवादी समाजवाद बासनात गुंडाळून ठेवला, त्याप्रमाणेच शिवसेनेनेही मराठी अस्मिता बाजूला सारून हिंदुत्वाची वाट चोखाळली. त्यातूनच मग भाजप आणि शिवसेनेचे सूर जुळले. मनसेने स्थापनेनंतर शिवसेनेने बाजूला सारलेला मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेचे हिंदुत्व पातळ झाल्याचे बघून भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे.


नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन, पाकिस्तानी व बांगलादेशी मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची मागणी, पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा, हे सगळे संकेत मनसेची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाल्याचेच द्योतक आहेत. या टप्प्यावर मनसेच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. पहिला, यानंतर तरी मनसेचा दिशा व धोरणाचा प्रवास थांबणार आहे का? दुसरा, हिंदुत्वाने शिवसेनेला जसे राज्यव्यापी अस्तित्व लाभले तसे ते मनसेला लाभणार आहे का? आणि तिसरा, यानंतर तरी मनसेचे प्रतिक्रियात्मक राजकारण थांबणार आहे का? यापैकी पहिला व तिसरा प्रश्न परस्परांशी निगडित आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अनेक वर्षांपासूनच्या ध्येयधोरणांसोबत तडजोड केली असली तरी, गुरुवारच्या छोटेखानी भाषणात, आमचा रंग भगवा आणि अंतरंगही भगवेच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावूनही शिवसेना हिंदुत्वास सोडचिठ्ठी देण्यास तयार नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात विचारसरणीशी निगडित एखाद्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे फाटल्यास, शिवसेना पातळ केलेले हिंदुत्व पुन्हा घट्ट करू शकते. त्या वेळी केवळ शिवसेनेच्या विरोधासाठी मनसे हिंदुत्वालाही सोडचिठ्ठी देणार का? शिवसेनेला राज्यव्यापी अस्तित्व लाभण्यात, हिंदुत्वासोबतच भाजपसोबतच्या युतीचाही वाटा होता. भाजप मनसेला ती संधी देईल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच मनसेचे भविष्य दडलेले आहे. आज तरी ती उत्तरे काळाच्या उदरात दडलेली आहेत. ती समोर येतील तेव्हा येतील. तोपर्यंत ठाकरे व्हर्सेस ठाकरे मालिकेचे आणखी काही भाग महाराष्ट्राला बघायला मिळतील, हे निश्चित!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे