Join us  

Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 1:23 PM

Nirmala Sitharaman Income Tax : लोकसभा निवडणुकीनंतर इन्कम टॅक्स विभाग काही नियम बदलण्याच्या विचारात असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता. यावर आता अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यांनी ही अफवा असल्याचं सांगत ही पूर्णपणे अटकळांवर आधारित असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इन्कम टॅक्स विभाग काही नियम बदलण्याच्या विचारात असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता. रिपोर्टनुसार, नवं सरकार स्थापन होताच हे बदल लागू केले जातील, असं म्हटलं जात होतं. या रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि शुक्रवारी, ३ मे रोजी बीएसईचा ३० शेअर्सचा बेंचमार्क सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात कोसळला. 

काय म्हणाल्या अर्थमंत्री? 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल केल्याचा दावा करणाऱ्या एका मीडिया चॅनेलचा रिपोर्ट शेअर केला. "या गोष्टी कुठून येतायत, याचं मला आश्चर्य वाटतं. अर्थ मंत्रालयाकडून त्याची फेरतपासणीही करण्यात आली नाही. ही पूर्णपणे अफवा आहे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या ट्विटनंतर मीडिया चॅनेलनं आपल्या एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट डिलीट केली आहे. 

गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण 

युनिफॉर्म टॅक्स योजना इक्विटी गुंतवणूकदारांसाठी नकारात्मक ठरू शकते, कारण डेट गुंतवणूकदारांच्या तुलनेत त्यांच्यावर अनुकूल कर आकारला जातो. या रिपोर्टमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि शेअर बाजारात खळबळ उडाली. शुक्रवारी सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला. तर, व्यवहाराअंती तो ७३३ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. प्रचंड नफावसुलीमुळे शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सव्वा दोन लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

टॅग्स :इन्कम टॅक्सनिर्मला सीतारामन