Join us  

रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण

शुक्रवारी वानखेडे मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने MI वर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 3:41 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधून मुंबई इंडियन्सचे आव्हान काल अधिकृतपणे संपुष्टात आले... शुक्रवारी वानखेडे मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने MI वर दणदणीत विजय मिळवला. तब्बल १२ वर्षांनी KKR वानखेडे स्टेडियमवर जिंकले. मुंबईचा हा आयपीएल २०२४ मधील ११ सामन्यांतील ८ वा पराभव ठरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ प्रत्येक आघाडीवर कमी पडला, हार्दिकच्या चुकीच्या निर्णयाचा फटका संघाला बसला. त्यात काल माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा प्लेइंग इलेव्हनबाहेर दिसला आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानावर आला. फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना पटणारा नव्हता, परंतु त्यामागचं कारण समोर आल्यावर टेंशन वाढलं आहे.

आयपीएल २०२४ नंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. अशात काल रोहितच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये न खेळण्यामागचं कारण ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी चिंता वाढवणारं ठरू शकतं. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे असूनही तो इम्पॅक्ट प्लेअर का? हा सवाल अनेकांना पडणे साहजिक होते. रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला अन् १२ चेंडूंत ११ धावा करून तंबूत परतला. कोलकाताने हा सामना २४ धावांनी जिंकला.   

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अनुभवी फिरकीपटू पियूष चावला याने रोहितबाबत महत्त्वाची माहिती दिली. चावला म्हणाला, रोहितच्या पाठीत उसण भरली होती आणि त्यामुळे सावधानता म्हणून त्याचे नाव इम्पॅक्ट प्लेअरमध्ये ठेवले गेले. 

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहितला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने ती विश्रांती त्याला मिळू शकते. भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.  या वर्षी मार्च महिन्यातही रोहितच्या पाठदुखीने डोकं वर काढलं होतं आणि इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी तो मैदानावर उतरला नव्हता.   

टॅग्स :आयपीएल २०२४ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्मामुंबई इंडियन्स