सांगा... पैसा कुठं गुंतवावा ?

By सचिन जवळकोटे | Published: August 23, 2018 06:33 AM2018-08-23T06:33:12+5:302018-08-23T08:52:12+5:30

अकबरानं विचारलेल्या एका किचकट प्रश्नाचं उत्तर शोधता-शोधता साऱ्यांच्याच नाकीनऊ आलेलं... कारण प्रश्न होताच तसा, ‘पैसा कसा कमवावा?’

Tell me where one should invest money | सांगा... पैसा कुठं गुंतवावा ?

सांगा... पैसा कुठं गुंतवावा ?

Next

शहेनशहा अकबराचा दरबार खचाखच भरलेला. प्रचंड गर्दी असूनही भलताच सन्नाटा पसरलेला. अकबरानं विचारलेल्या एका किचकट प्रश्नाचं उत्तर शोधता-शोधता साऱ्यांच्याच नाकीनऊ आलेलं... कारण प्रश्न होताच तसा, ‘पैसा कसा कमवावा?’ अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. मात्र, अकबराला एकही उत्तर पटलं नाही. शेवटी टाळी वाजवून त्यानं आपल्या सैनिकांना खुणावलं, ‘बिरबल को लेके आओऽऽ,’
मग काय, सैनिकांच्या ताफ्यासोबत बिरबल दरबारात हजर. ‘काय हुकूम जी हुजूर ?’ कुर्निसात करत बिरबलानं विचारलं. त्याला तो प्रश्न सांगून अकबरानं नवी मोहीम सोपविली, ‘चारशे वर्षांनंतरच्या एकविसाव्या शतकात लोकं कसा पैसा कमवत असतील, याचा शोध घ्या.’
बिचारा डोकं खाजवत बिरबल एकविसाव्या शतकातील आधुनिक पुण्यात आला. एका बिल्डरला गाठलं. त्याला तो प्रश्न विचारताच बिल्डर कपाळावर आठ्या घालत विचारू लागला, ‘पैसा कसा कमवावा, याचं मला टेन्शन नाही. अनेक वर्षे पडून राहिलेले प्लॅटस् कसे विकावेत, याचा मी विचार करतोय. जागेत अडकलेला पैसा परत कसा काढावा, याचेच आराखडे रोज आखतोय.’
बिरबल चमकला. त्यानं तिथून थेट मुंबई गाठली. ‘शेअर मार्केट’मधल्या ‘बुल’ समोर एका दलालाला विचारलं, ‘तुम्ही पैसा कसा कमविता?’ आधीच चिंताग्रस्त असलेल्या दलालानं बिरबलाकडं खालून
वर बघत प्रत्युत्तर केलं, ‘देशातल्या अनेक कंपन्यांची वाट लागलीय. त्यामुळं
त्यांच्या शेअर्समध्ये गुंतविलेला पैसा पुन्हा कसा वसूल करावा, याचीच मला चिंता लागून राहिलीय.’
बिरबल पुन्हा गोंधळात. त्यानं थेट सराफ बाजारचा रस्ता धरला. तिथं सोने विकायला आलेल्या दामुअण्णाला विचारलं, ‘सोन्यातून म्हणे पैसा भरपूर कमविता येतो. खरंय का तेऽऽ’ तेव्हा कपाळावरचा घाम पुसत दामुअण्णा म्हणाले, ‘पैसा कमवायचं राहू द्या होऽऽ बाजूला. अगोदर पस्तीस हजारानं घेतलेलं सोनं तीस हजारांत जरी विकलं गेलं तरी नशीब म्हणायचं आमचं.’
मान हलवत बिरबल तिथून सटकला.
जागेत फायदा नाही. शेअर्समध्ये गॅरंटी नाही. सोन्यातही उत्पन्न नाही. आता राहिली हक्काची अन् विश्वासाची जागा म्हणजे बँक़ तेव्हा एखाद्या बँक ग्राहकालाच विचारू या, असा विचार करत त्यानं ‘एटीएम सेंटर’ गाठलं. मात्र तिथं प्रचंड गर्दी. हातात ‘एटीएम् कार्ड’ घेऊन प्रत्येकजण बँक अधिकाºयांशी भांडू लागलेला. बिरबलला वाटलं, वाढीव व्याजदरासाठी ही मंडळी वाद घालताहेत. त्यानं एकाला विचारलं, ‘का होऽऽ’ बँकेत पैसा ठेवून किती नफा कमविला?’
बिरबलकडं रागानं बघत समोरचा जोरजोरात ओरडू लागला, ‘व्याज गेलं खड्ड्यात. आमच्या खात्यातले पैसे म्हणे परस्पर फॉरेनमधल्या खात्यात जमा झालेत. फ्रॉड मंडळी करणार बँक हॅक़.. पण पैसे गायब होणार आमच्या खात्यातले नां?’ आता मात्र बिरबरला पारऽऽ चक्कर आली. तातडीनं तो पुन्हा चारशे वर्षांपूर्वीच्या काळात शिरला. अकबराच्या दरबारात हजर झाला, ‘हुजूरऽऽ पैसा कसा कमवावा, हा प्रश्नच एकविसाच्या शतकात उरला नाही... फक्त पैसा कुठं सुरक्षितपणे साठवावा? या चिंतेनंच साºयांची वाट लागलीय..’
 

Web Title: Tell me where one should invest money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा